Next
किल्ला सुस्थितीत राखण्यासाठी महिपतगडावर होते ध्वजवंदन
प्रशासन आणि ग्रामस्थांचा आदर्श उपक्रम
संदेश सप्रे
Sunday, August 19, 2018 | 06:05 PM
15 0 0
Share this story

महिपतगडावर स्वातंत्र्यदिनी झेंडावंदन करताना पोलिस व महसूल विभागाचे कर्मचारी.देवरुख : शिवराय आणि शंभूराजे यांच्या पराक्रमाचा केवळ अभिमान बाळगणे किंवा राजकीय कारणांसाठी त्यांच्या नावाचा वापर करणे, या गोष्टी सर्रास पाहायला मिळतात; मात्र शिवरायांनी बांधलेल्या वा त्यांनी जिंकलेल्या गड-किल्ल्यांची दुरुस्ती, डागडुजीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जाते. समाजापासून सरकार, प्रशासनापर्यंतच्या सर्व पातळ्यांवर याबद्दलची उदासीनता दिसून येते. या पार्श्वभूमीवर, रत्नागिरी जिल्ह्याच्या संगमेश्वर तालुक्यातील देवरुखजवळच्या कुंडी-निगुडवाडी गावांचा आदर्श घेण्यासारखा आहे. या गावांच्या सीमेवर महिपतगड (मेहमानगड) आहे. हा किल्ला सुस्थितीत रहावा आणि येथे साफसफाई होऊन इथल्या ऐतिहासिक वस्तू, वास्तू व्यवस्थित राखण्यासाठी या गडावर दर वर्षी प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्यदिन आणि महाराष्ट्र दिनाला ध्वजवंदन केले जाते. प्रशासनासह स्थानिक ग्रामस्थ यासाठी पुढाकार घेतात.

संगमेश्वर तालुक्याच्या दक्षिणेस असलेल्या सह्याद्रीच्या कड्यावर महिपतगड वसला आहे. आकाराने तसा छोटाच असला, तरी त्या काळी महत्त्वाचा किल्ला म्हणून याची ओळख होती. दक्षिण जिंकण्यास निघालेले शिवाजी महाराज आणि मावळे या किल्ल्यावर विश्रांतीसाठी येत, असे जाणकार सांगतात. या भागात गेलेले पाहुणे मावळे स्वाऱ्या करून दमले, की इथे येत आणि इथल्या मोठ्या भुयारात विश्रांती घेत. म्हणूनच या किल्ल्याला मेहमानगड म्हणूनही ओळखले जाते.

आजही किल्ल्याचे प्रवेशद्वार, तटबंदी, बाहेरचे तळे, भुयाराचा बराचसा भाग, बुरुज, तोफा, भवानीमाता मंदिर, हनुमानासह इतर देवतांची मंदिरे, घोडेतलाव, पिण्याच्या पाण्याचे तळे इथे पाहायला मिळते. उंचीने लहान असूनही किल्ल्यावरून दिसणारे अरबी समुद्राचे विहंगम दृश्य पर्यटक आणि गिर्यारोहकांना इथे आकर्षित करते. चढण्यास बऱ्यापैकी सोपा आणि पोहचण्यास लागणारा कमी कालावधी यामुळे पावसाळा वगळता इथे शिवप्रेमी, पर्यटक, ग्रामस्थांची वर्दळ असते. निगुडवाडी आणि कुंडी या दोन्ही गावांतून इथे जाता येते.

गडाची साफसफाई व्हावी, यासाठी दर वर्षी स्थानिक ग्रामस्थ आणि प्रशासन गडावर २६ जानेवारी, एक मे आणि १५ ऑगस्टला ध्वजवंदन करतात. यासाठी महसूल आणि पोलिस विभाग पुढाकार घेतात. पावसाळा वगळता उर्वरित दोन ध्वजवंदनावेळी ग्रामस्थ जमेल तेवढी गडाची सफाई करतात आणि इथल्या ऐतिहासिक वस्तू, वास्तू सुस्थितीत ठेवण्यास हातभार लावतात. 

नुकत्याच झालेल्या स्वातंत्र्यदिनावेळी पोलिस हेड कॉन्स्टेबल प्रशांत शिंदे, तलाठी मस्तान जादगर, निगुडवाडी पोलिस पाटील मनोहर जाधव, कोतवाल बाबू कदम आणि ग्रामस्थांनी ध्वजवंदन केले. ग्रामस्थ आणि प्रशासनाला पुरातत्त्व विभाग आणि लोकप्रतिनिधींची साथ लाभली, तर असे भग्न गड-किल्ले सुस्थितीत राहण्यास मदत होणार आहे. यासाठी गरज आहे ती राजकीय इच्छाशक्तीची आणि शिवरायांवरील खऱ्या प्रेमाची. यासाठी कुंडी-निगुडवाडीतील ग्रामस्थांचा आदर्श उत्तम ठरेल यात शंका नाही.

संपर्क : 
धीरेंद्र मांजरेकर (पोलिस पाटील, कुंडी) : ९४०३५ ०६८१९ 
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link