Next
‘हरचिरी-उमरे हायस्कूलचा हीरक महोत्सव नव्या इमारतीत साजरा करणार’
माजी विद्यार्थ्यांनी केला शाळेच्या कायापालटाचा संकल्प
BOI
Friday, September 28, 2018 | 03:17 PM
15 0 0
Share this article:

माजी विद्यार्थी मेळाव्यात बोलताना संघटनेचे अध्यक्ष महेंद्र झापडेकर. शेजारी रामचंद्र केळकर, महेश गांगण आदी.

रत्नागिरी :
शाळा म्हणजे विद्येचे माहेरघर. तेथे आपण सुसंस्कारित होतो. शाळेचे आपल्यावर असलेले फार मोठे ऋण कधीही फेडता येत नाही; मात्र ते व्यक्त करणे हे कर्तव्य असते. हेच मनात ठेवून, शाळेशी असलेले ऋणानुबंध जपण्यासाठी रत्नागिरी तालुक्यातील हरचिरी-उमरे हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा मेळावा नुकताच आयोजित करण्यात आला होता. शाळेचे सध्या ५७वे वर्ष सुरू असून, हीरक महोत्सवापूर्वी नवी इमारत उभारून त्यात हा महोत्सव उत्साहाने साजरा करण्याचा संकल्प या मेळाव्यात करण्यात आला.

हरचिरी पंचक्रोशी एज्युकेशन सोसायटी संचलित महात्मा गांधी दुय्यम शिक्षण मंदिर, हरचिरी-उमरे ही प्रशाला ५७ वर्षांची झाली आहे. शाळेतील माजी विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन मेळावा घेण्यासंदर्भात १३ मे २०१८ रोजी पहिली बैठक झाली होती. त्यामध्ये या मेळाव्यासंबंधी नियोजन झाले होते आणि त्यानुसार नुकताच हा मेळावा पार पडला. बहुसंख्य माजी विद्यार्थी प्रशालेत एकत्र आले. प्रशालेचे शिक्षक श्री. गांगण, श्री. कळंबटे, श्री. शिंदे, श्री कदम, श्री. शेट्ये व अन्य शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी कार्यक्रमासाठी मोलाचा हातभार लावला. 

शिंदे सरांनी ओघवत्या भाषेत सूत्रसंचालन केले. व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कांबळे, सचिव रवींद्र भाट्ये, माजी विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष महेंद्र झापडेकर, सचिव रामचंद्र केळकर, खजिनदार अभय (भाई) दळी, मुख्याध्यापक तथा माजी विद्यार्थी महेश गांगण उपस्थित होते. मान्यवरांनी सरस्वती मातेच्या व संस्थेचे आद्य संस्थापक दिवंगत जोशी सर (मिशीवाले) यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. दिवंगत माजी विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

तीन मजली इमारत उभारण्याचा संकल्प
माजी विद्यार्थी संघटनेचे सचिव रामचंद्र केळकर यांनी शाळेच्या इमारतीबाबत व अन्य भौतिक सोयीसुविधांच्या असलेल्या कमतरतेबाबत चिंता व्यक्त केली. नऊ खोल्यांची तीन मजली इमारत उभी करण्याचा संकल्प त्यांनी माजी विद्यार्थ्यांसमोर ठेवला. याकरिता अंदाजे एक कोटी रुपये खर्च अपेक्षित असून, त्याचा प्लॅन तयार असल्याचे सांगितले. हा निधी गोळा करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले.

अध्यक्षीय भाषणातून महेंद्र झापडेकर यांनी शाळेच्या नऊ खोल्यांच्या इमारतीसाठी एक कोटी रुपये निधी संकलन करण्यासाठी विविध पर्याय सर्वांसमोर ठेवले. स्वतः किमान १० लाख रुपयांचा भरघोस निधी उपलब्ध करण्याचा मानस व्यक्त केला. माजी विद्यार्थ्यांनी नियोजित कामात स्वतःला झोकून देऊन काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.

माजी विद्यार्थी सुनील दळी यांनी १००१ रुपये देणगी देऊन पहिले देणगीदार होण्याचा मान मिळविला. महिला प्रतिनिधी दामिनी भिंगार्डे यांनी सुंदर शब्दांत शाळेप्रति असलेले आपले विचार व्यक्त केले. शाळेच्या ५७ वर्षांच्या इतिहासात साजरे न झालेले रौप्य, सुवर्णमहोत्सव विसरून नवीन इमारतीत शाळेचा हीरक महोत्सव साजरा करण्याचे स्वप्न पाहून ते पूर्ण करण्याचा संकल्प या मेळाव्यात करण्यात आला.

विलास भातडे, गुरुनाथ गोविलकर, चांदेराईचे माजी सरपंच दादा दळी यांनीही विचार व्यक्त केले. मुख्याध्यापक गांगण यांनी शाळेची गुणवत्ता उत्तम कशी आहे, याबद्दल माहिती दिली. संस्थेचे सचिव व सर्वांत ज्येष्ठ पदाधिकारी रवींद्र (दादा) भाट्ये यांनी संस्थेच्या व शाळेच्या विकासात असलेले अडथळे सांगून शाळेचा विकास संथ गतीने झाल्याची खंत व्यक्त केली. संस्थेचे अध्यक्ष रवींद्र कांबळे यांनी माजी विद्यार्थी म्हणून व संस्थेचे अध्यक्ष म्हणून जे काही सहकार्य लागेल ते देण्याची तयारी दर्शवली. 

या कार्यक्रमाला मोरेश बारे व उमरे ग्रामस्थ, महेश खाके, शिवदास लिंगायत, ताडपत्री इम्तियाज बंदरी, धामस्कर, अल्ताफ खान यांचे सहकार्य लाभले. यो. ग. शेट्ये यांनी आभारप्रदर्शन केले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search