Next
ना आदमी का कोई भरोसा...
BOI
Sunday, December 16, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

११ डिसेंबर २०१८ रोजी ज्येष्ठ अभिनेते दिलीपकुमार यांनी ९७व्या वर्षात पदार्पण केले. त्या निमित्ताने, ‘सुनहरे गीत’ सदरात आज पाहू या त्यांच्यावर चित्रित झालेल्या ‘ना आदमी का कोई भरोसा’ या गीताचा...
.............
गेल्या ११ डिसेंबरला सुप्रसिद्ध अभिनेते दिलीपकुमार यांनी आपल्या वयाची ९६ वर्षे पूर्ण केली. एके काळी गौरवर्णाचा, गोंडस चेहऱ्याचा, काळेभोर केस असलेला, धारदार नाक असलेला आणि पाणीदार डोळे असलेला हा अभिनेता आता वयोमानानुसार बदलून गेला आहे. प्रत्येकाच्या बाबतीतच असे घडते. काळापुढे काहीच टिकत नाही; पण दिलीपकुमार यांच्या सद्यस्थितीबद्दल फक्त करुणा आणि करुणाच वाटते. कारण सर्व अवयव गलितगात्र झालेला हा अभिनेता एकेकाळी आकर्षक व लोकप्रिय होता, हे खरे वाटत नाही. तशी त्यांची लोकप्रियता आजही आहे. ‘रूटीन चेकअप’साठी त्यांना रुग्णालयात नेले, तरी प्रसिद्धीमाध्यमे त्याची बातमी देतात. 

पतिव्रता धर्म कसोशीने पाळणाऱ्या सायराजी दिलीपसाहेबांची सेवा-शुश्रुषा करत आहेत. त्यांचे जेवण म्हणजे पातळ पेज, त्यांची स्वच्छता, त्यांची मोजकी हालचाल या सर्व बाबतींत सायराजी दक्ष आहेत. अशा या अभिनेत्याला त्याच्या वाढदिवसानिमित्ताने शुभेच्छा! परमेश्वर त्यांना आरोग्य देवो, ही प्रार्थना!

दिलीपकुमार म्हणजे अभिनयाची पाठशाळा, अशी त्यांची ख्याती चित्रपटप्रेमींच्यात आहे. त्यात किती तथ्य आहे, असे नव्या पिढीतील एखाद्या चित्रपटप्रेमीला वाटले, तर त्यासाठी त्याला इतिहासात डोकवावे लागेल. तेव्हा त्याला काय दिसेल? - 

महंमद सरवरखान पठाण या पेशावर येथील फळविक्रेत्याचा मुलगा ‘युसुफ’ याचा जन्म ११ डिसेंबर १९२२ रोजी झाला. त्याचे बालपण नाशिकजवळच्या देवळालीमध्ये गेले. दुसऱ्या महायुद्धानंतर युसुफ आणि त्याचे कुटुंबीय मुंबई येथे स्थायिक झाले. डॉ. मसानी युसुफला ‘बॉम्बे टॉकीज’मध्ये घेऊन गेले. युसुफचे हिंदी व उर्दू भाषेवर प्रभुत्व होते. बॉम्बे टॉकीजची सर्वेसर्वा देविकाराणी हिला युसुफमध्ये अभिनेत्याची लक्षणे जाणवली. युसुफ नट बनण्यास योग्य वाटला; पण त्याचे युसुफ हे नाव योग्य वाटेना. ते नाव बदलावे असे तिने सुचविले. युसुफच्या वडिलांनीही या गोष्टीला दुजोरा दिला. कारण पठाण समाजातील कोणी सिनेमात गेला, हे कळले तर आपल्यावर समाजाचा रोष राहील, अशी भीती त्यांना वाटत होती. आणि देविकाराणीने युसुफला ‘दिलीपकुमार’ हे नाव दिले. ‘ज्वार भाटा’ या चित्रपटाचा तो नायक झाला. ते वर्ष होते १९४४. त्यामध्ये त्याची नायिका होती मृदुला. हा चित्रपटच नव्हे, तर नंतर आलेला ‘प्रतिमा’ हा १९४५चा चित्रपटही चालला नाही. 

नंतर आलेला ‘मिलन’ मात्र बऱ्यापैकी चालला. त्या वेळी बॉम्बे टॉकीजबरोबरचा करार संपला; पण ‘मिलन’चे दिग्दर्शक नितीन बोस यांच्याकडून दिलीपकुमारने अभिनयाचे प्राथमिक धडे घेतले. नंतर १९४७च्या ‘जुगनू’मध्ये त्या वेळची प्रसिद्ध गायिका, अभिनेत्री नूरजहाँन त्याची नायिका होती. या चित्रपटातील ‘यहाँ बदला वफा का...’ या युगलगीताने दिलीपकुमार या नावाला प्रसिद्धी मिळवून दिली. 

नंतर मग अनोखा प्यार, शहीद, नदिया के पार शबनम, अंदाज, मेला अशी एकापेक्षा एक चित्रपटांची रांग लागली आणि म्हणता म्हणता ‘अभिनयाचा बादशहा दिलीपकुमार’ असे नामाभिधान त्याला मिळाले. मधुबाला, नर्गिस, कामिनी कौशल, वैजयंतीमाला अशा एकेक टॉपच्या नायिकांबरोबरचे दिलीप कुमार यांचे चित्रपट रसिकांना आवडू लागले. परंतु एक प्रकार असा झाला, की अनेक चित्रपटांच्या कथानकातील दु:खी नायकाच्या (ट्रॅजेडी किंग) भूमिका दिलीपकुमार यांच्या वाट्याला आल्या. त्या त्यांनी तन्मयतेने, अप्रतिमपणे साकार केल्या. परंतु त्यामुळे त्यांच्यावर ‘ट्रॅजेडी किंग’चा शिक्का बसला. एवढेच नव्हे, तर त्यांना एकाच प्रकारच्या दु:खी नायकाच्या भूमिका करून नैराश्याने ग्रासले. 

सर्वांत विलक्षण बाब म्हणजे दिलीपकुमार ट्रॅजेडी किंग म्हणून प्रसिद्ध झाले, त्याच वेळी हिंदी चित्रपटातील नायिकांपैकी मीनाकुमारी ट्रॅजेडी क्वीन म्हणून प्रसिद्ध झाली होती; पण या दोघांना एकत्र आणून एखादी सुंदर दु:खांत कथा घेऊन एकही चित्रपट त्या काळात निर्माण झाला नाही. उलटपक्षी दिलीपकुमार व मीनाकुमारी यांचे ‘आझाद’, ‘कोहिनूर’ यांसारखे चित्रपट आले, ते मनोरंजनात्मक आणि हसत्या-खेळत्या नायक-नायिकेचे होते. 

दिलीपकुमार यांनी अभिनयामधील विविधताही दाखवली आणि समोर अभिनयसंपन्न दुसरा अभिनेता असला, तरी त्यांनी कोणत्याही दबावाखाली न जाता आपली भूमिका उत्कृष्टपणे साकार केली. भूमिकेची गरज असेल त्याप्रमाणे ते कधी सतार शिकले, तर कधी टाळ वाजवण्यास शिकले. वैजयंतीमालाबरोबर नृत्य करताना त्यांनी नृत्यसुद्धा शिकून घेतले. ‘मुसाफिर’ चित्रपटात ते लता मंगेशकर यांच्याबरोबर गाणेही गायले आहेत. दिलीपकुमार यांच्या अभिनयाबरोबर त्यांचे चित्रपटातील संवादही प्रेक्षकांना भावले होते. 

वाढत्या वयाबरोबर प्रमुख नायकांच्या भूमिकांकडून दिलीपकुमार चरित्र नायकांच्या भूमिकेकडे वळले. अभिनयाची त्यांची ही दुसरी इनिंगही लोकप्रिय ठरली. क्रांती, सौदागर, कर्मा, विधाता, शक्ती, मजदूर, मशाल, किला असे त्यांचे चित्रपट पडद्यावर आले. त्यांच्या या दुसऱ्या इनिंगच्या वेळी दिलीपकुमार यांना घेऊन चित्रपट करण्याचे अनेक नवीन चित्रपट निर्मात्यांनी ठरवले. त्यापैकी रास्ता, कलिंगा, आर्य चाणक्य या चित्रपटांचे मुहूर्त झाले; पण ते चित्रपट पूर्ण होऊ शकले नाहीत. त्यांच्या दुसऱ्या इनिंगमधील ‘किला’ हा शेवटचा चित्रपट १० मे १९९८ रोजी पडद्यावर झळकला.

आणि नंतर तब्येतीच्या कारणाने त्यांनी चित्रपटांत काम करणे थांबवले. १९४४ ते १९९८ या ५४ वर्षांच्या काळात त्यांनी विविध प्रकारच्या भूमिका करून नायक दिलीपकुमार व चरित्र नायक दिलीपकुमार अभिनयात किती श्रेष्ठ आहे, हे दाखवून दिले. आज मात्र ते वृद्धापकाळातील एक वेगळ्या अवस्थेचे जीवन जगत आहेत. 

या ५४ वर्षांच्या काळात त्यांच्या वाट्याला जी गीते आली, त्यामध्ये हिंदी चित्रपटगीताच्या सुवर्णकाळातील अनेक मधुर गीतांचा समावेश आहे. नंतरही त्यांनी पडद्यावर साकारलेली गीते लोकांना भावली होती. त्या अनेक गीतांतून एक गीत सुनहरे गीत म्हणून दर्शवणे इतर मधुर गीतांवर अन्यायकारक ठरेल. तरीही एका गीताचा भावार्थ व सौंदर्य आपण बघू या.

नशीब फक्त व्यक्तीचे नसते, तर ते एखाद्या कलाकृतीचेही असू शकते. ए. भीमसिंह दिग्दर्शित ‘आदमी’ हा चित्रपट १९६८मध्ये प्रदर्शित झाला. तो जेव्हा तयार होत होता, तेव्हा त्या चित्रपटासाठी कथानकाच्या अनुषंगाने गीतकार शकील बदायुनी यांनी सहा गीते लिहिली होती. संगीतकार नौशाद यांनी ती साजेशा संगीतात गुंफली होती. या चित्रपटात दिलीपकुमार आणि मनोजकुमार असे दोन नायक होते. सिम्मी आणि वहीदा रेहमान या नायिका होत्या.

शकील बदायुनींनी लिहिलेल्या सहा गीतांपैकी ‘ना आदमी का कोई भरोसा...’ हे गीत प्रथम मनोजकुमारवर चित्रित करायचे ठरले होते. त्यामुळे ते महेंद्र कपूर यांच्याकडून गाऊन घेण्यात आले होते; पण आयत्या वेळी झालेल्या बदलांमुळे ते मोहम्मद रफी यांचेकडून गाऊन घेतले गेले. गीत तयार होऊन रेकॉर्ड बाजारात येईपर्यंत असेही बदल घडतात. म्हणूनच वाटते, की कलाकृतीचेही नशीब असते. 

या गीतात शकीलने एक कटू सत्य सांगितले आहे. अनेकदा निष्कारण नाराज झालेले अगर अंत:करणाला भळभळणाऱ्या जखमा देऊन गेलेले काही ‘मेरे अपने’ आठवतात, तेव्हा तर हे गीत ऐकताना मोहम्मद रफी काळजाला हात घालतात. नौशाद यांचे संगीत शकीलच्या शब्दांना अंत:करणात घुसवते व त्या वेळचा दिलीपकुमार यांचा अभिनय - फक्त चेहऱ्यावरील भाव - कारण कथानकाच्या अनुषंगाने ते व्हीलचेअरच आहेत - तो त्यांचा अभिनय ‘ट्रॅजेडी किंग’ या पदवीला सार्थ असाच.

शकील तरी काय अप्रतिम लिहितो बघा -

तेरी मोहब्बत पे शक नहीं है 
तेरी वफाओं को मानता हूँ
मगर तुझे किसकी आरजू है 
मैं ये हकीकत भी जानता हूँ

तुझ्या प्रेमाबद्दल शंका नाही, संशय नाही. तुझ्या निष्ठेलाही मानतो मी; पण तुला कोणाची आस आहे, इच्छा आहे ते सत्य (आता मला) लक्षात आले आहे. (हं! काय दुर्दैव! तुला मी माझी समजत होतो.) 

या कडव्याने गीत सुरू होते व पुढे - 

ना आदमी का कोई भरोसा 
ना दोस्ती का कोई ठिकाना 
वफा का बदला है बेवफाई
अजब जमाना है ये जमाना

(या स्वार्थी, मतलबी जगात) माणसाचा काहीच भरवसा राहिलेला नाही. मैत्रीचा ठिकाणा नाही. (ज्याच्याशी मैत्री करावी अशी व्यक्ती नाही) निष्ठेच्या बदल्यात (या जगात) धोका प्राप्त होतो. (खरंच) हे जग, हा जमाना अजब आहे. 

जगाचे असे दाहक अनुभव आल्यामुळेच आता - 

न हुस्न में अब वो दिलकशी है 
न इश्क में अब वो जिंदगी है 
जिधर निगाहें उठा के देखूं
सितम है, धोका है, बेरुखी है 
बदल गए जिंदगी के नग्में, 
बिखर गया प्यार का तराना

सौंदर्यात आता मला रस राहिलेला नाही. प्रेम, प्रीतीपूर्ण जीवन मला आता हवेसे वाटत नाही. (कारण) जिथे म्हणून मी पाहतो, तेथे जुलूम (सितम) आहे, धोका आहे, उपेक्षा (बेरुखी) आहे. (या उपेक्षेमुळे, धोक्यामुळे) माझे जीवनगाणेच आता बदलून गेले आहे. (मी गुणगुणत होतो ते) प्रेमगीत विखरून गेले आहे. 

आणि अशा या जीवनात मला आता काय हवे, तर...

दवा के बदले में जहर दे दो 
उतार दो मेरे दिल में खंजर 
लहू से सिंचा था जिस चमन को 
उगे है शोले उसी के अंदर 
मेरे ही घर के चिराग ने खुद, 
जला दिया मेरा आशियाना

(या असल्या स्वार्थी, धोकेबाज जगात मला आता राहायचे नाही. म्हणूनच मला) औषधाऐवजी विष द्या (अन्यथा) माझ्या हृदयात खंजीर खुपसा (व मला मारून टाका. आता जगून तरी मी काय करू? कारण मी माझ्या) रक्ताचे शिंपण करून जो (प्रीतीचा) बगीचा फुलवला होता, त्याच्या खाली (धोकेबाजपणाच्या, दगाबाजीच्या, उपेक्षेच्या) ज्वाला उगवल्या, वर आल्याया (आणि माझे केवढे दुर्दैव बघा, की माझ्या घरातील दिव्यानेच माझे घरटे जाळून टाकले. खरेच हा जमाना अजब आहे. 

हे गीत दु:खी हृदयाची तडफड सांगणारे असले, तरी त्याचे संगीत, चाल, गाणाऱ्या मोहम्मद रफींच्या स्वरातील प्रभावीपणा आणि पडद्यावरचा दिलीपकुमार यांचा अभिनय - सारेच ‘सुनहरे’.

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
S G chandorkar About 192 Days ago
Nice
0
0

Select Language
Share Link
 
Search