Next
‘ज्येष्ठांचे जीवन सुसह्य होण्यासाठी शासन प्रयत्नशील’
सामाजिक न्याय व विशेष साह्यमंत्री राजकुमार बडोले यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Tuesday, June 18, 2019 | 01:19 PM
15 0 0
Share this article:


मुंबई : ‘ज्येष्ठ नागरिकांचे जीवन सुसह्य होण्यासाठी शासन प्रयत्नशील असून, स्वयंसेवी संस्था व शासन एकत्रितरित्या प्रयत्न करत आहेत; तसेच ज्येष्ठ नागरिक धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्व स्तरांवर प्रयत्न होणे आवश्यक आहे,’ असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष साह्यमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

ज्येष्ठ नागरिक छळ प्रतिबंधक जागृती दिनानिमित्त सामाजिक न्याय व विशेष साह्य विभाग आणि हेल्पेज इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने वडाळ्यातील विद्यालंकार इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी येथे चर्चासत्राचे आयोजन केले होते. त्याच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.


बडोले म्हणाले, ‘आधुनिक जीवनशैलीमुळे विभक्त कुटुंबपद्धत सुरू झाली असून, त्यामुळे दिवसेंदिवस ज्येष्ठ नागरिकांची संख्या वाढत चालली आहे. राज्यात आजमितीस सव्वा कोटी ज्येष्ठ नागरिकांची संख्या आहे. त्यात ५३ टक्के महिला आहेत. ज्येष्ठ नागरिकांना त्यांचे आरोग्य, आर्थिक, सामाजिक सुरक्षा या सर्व समस्यांवर तोडगा काढण्यासाठी ज्येष्ठ नागरिक धोरण तयार करण्यात आले आहे. या धोरणामध्ये केवळ ज्येष्ठ नागरिकांना सर्वतोपरी मदत देणे नसून त्यांच्या अनुभवाचा व ज्ञानाचा फायदा समाजाला कसा होईल याचाही विचार करण्यात आला आहे. ज्येष्ठ नागरिकांना विविध योजनांव्दारे मदत करण्याच्या सूचना शासनाच्या विविध विभागांना देण्यात आल्या आहेत.’

‘श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत एक हजार ६६० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. आई-वडील व ज्येष्ठ नागरिक यांच्या चरितार्थ व कल्याणासाठी अधिनियम २००७ची प्रभावी अंमलबजावणी सुरू आहे. अनुदानित व मातोश्री वृद्धाश्रमांतर्गत गरजू, गरीब व निराधार ज्येष्ठ नागरिकांना राहण्याची सुविधा व सर्वतोपरी मदत देण्यात येते. या वृद्धाश्रमांना दरमहा देण्यात येणाऱ्या मदतीमध्ये वाढ करण्यात आली आहे. राज्यातील वृद्धाश्रमांची दर तीन महिन्यांनी तपासणी करण्यासाठी लवकरच एक समिती स्थापन केली जाईल,’ अशी माहिती बडोले यांनी दिली.


‘सामाजिक प्रबोधन करून तरुणांमध्ये ज्येष्ठांबद्दल आदर व स्नेहाची भावना रुजवण्याचा प्रयत्न सुरू आहे. समाजातील प्रत्येकाने ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्याची आवश्यकता असून, या सन्मानातूनच भविष्यातील पिढीचाही योग्य सन्मान राखला जाईल,’ असे त्यांनी सांगितले.

या प्रसंगी ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी काम करणाऱ्या चंद्रकांत जोशी, विजय औंदे व विजय गणाचार्य यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी आयोजित केलेल्या ‘ज्येष्ठ नागरिकांची समाजातील प्रतिमा व अपेक्षा’ या विषयावरील चर्चासत्रात विविध मान्यवरांनी सहभाग घेतला. या वेळी ज्येष्ठ सिने अभिनेते विजू खोटे, ज्येष्ठ सिने अभिनेत्री सुषमा शिरोमणी, हेल्पेज इंडियाचे प्रकाश बोरगावकर, फेस्कॉमचे विजय औंदे व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search