Next
‘कृष्णाच्या परराष्ट्र धोरणाच्या अभ्यासाची गरज’
प्रेस रिलीज
Monday, June 25, 2018 | 12:19 PM
15 0 0
Share this story

​​

पुणे : ‘भारताच्या परराष्ट्र धोरणनीतीवर पहिले पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांचा आदर्शवाद आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसा तत्त्वाचा पगडा आहे. हा असणे चुकीचे नसले, तरी महाभारतातील कृष्णाच्या परराष्ट्र धोरणाच्या अभ्यासाची आपल्याला गरज आहे,’ असे मत परराष्ट्र धोरण विश्लेषक डॉ. शैलेंद्र देवळाणकर यांनी व्यक्त केले.       

मनोविकास प्रकाशन यांनी प्रकाशित केलेल्या संत साहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे लिखित ‘या सम हा- योगेश्वर कृष्णाचे वैचारिक चरित्र’ या पुस्तकाचे प्रकाशन भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिरात नुकतेच झाले. त्यावेळी ते बोलत होते. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिराचे मानद सचिव डॉ. श्रीकांत बहुलकर, मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर, आशिष पाटकर, पुस्तकाच्या अनुवादिका पूर्णिमा लिखिते आदी या वेळी उपस्थित होते.

एक ईश्वरी अवतार म्हणून नव्हे, तर मानव म्हणून श्रीकृष्ण वाचकांच्या समोर आणण्याचा प्रयत्न या पुस्तकाच्या माध्यमातून डॉ. मोरे यांनी केला असून महाभारतातील कृष्ण, त्याचे तत्वज्ञान, कृष्णनीती आदी अनेक गोष्टींचे विवेचन यामध्ये केले असल्याचे डॉ. सदानंद मोरे या वेळी सांगितले.

ते म्हणाले, ‘अंतर्गत आणि परराष्ट्र धोरण हे कोणत्याही राष्ट्रासाठी महत्त्वाचे असून, त्यावरूनच त्या राष्ट्राची आंतरराष्ट्रीय ओळख निर्माण होत असते. भारतीय राजकीय विचारप्रणाली ही काही हजार वर्षांपूर्वी प्रगत होती आणि त्याचे कौशल्याधारित वर्णन महाभारतात कृष्णाच्या उदाहरणात आढळते. कृष्ण याच राजकीय विचारप्रणालीचे उत्तम उदाहरण आहे.’

‘१८१५ साली व्हिएन्ना येथे झालेल्या परिषदेमध्ये राजनीतीचा पाया रचला गेला असे मानले जाते. त्यानंतर हेन्री किसिंजर यांनी अमेरिका आणि चीन यांच्यातील संबंध सुधारण्यावर भर दिला अशी अनेक उदाहरणे आपल्याला पहायला मिळतात; मात्र अशीच किंबहुना त्यांपेक्षा अधिक ताकदीची उदाहरणे भारतीय राजकारणात कृष्ण, विदुर, भीष्म, अक्रूर यांच्या रूपाने आढळतात. त्यामुळे महाभारताचा आणि कृष्णाच्या कृष्णनीतीचा अभ्यास करणे देखील महत्त्वाचे आहे. या पुस्तकाच्या निमित्ताने डॉ. मोरे यांनी हाच कृष्ण आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे,’ असे डॉ. देवळाणकर यांनी नमूद केले.  

‘मोरे यांनी अलौकिक श्रीकृष्णाला देवघरातून बाहेर काढले आणि व्यक्ती म्हणून पाहण्यासाठी वाचकांसमोर ठेवले आहे. श्रीकृष्णाच्या विचारांचा वैज्ञानिक वेध घेण्याची संधी या निमित्ताने सर्व वाचकांना उपलब्ध झाली असून, यामुळे जे काही चांगले घडते ते पश्चिमी भूमीतच घडते या आपल्या पारंपारिक मानसिकतेतून बाहेर येण्याची एक संधीच आपल्याला मिळाली आहे,’ असे त्यांनी सांगितले.  

‘महाभारत आणि कृष्णाच्या नीतीत आपल्याला आंतरराष्ट्रीय राजकारणाचे मूलाधार दिसतात. महाभारतामध्ये राजकीय तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे आजच्या भारतीय परराष्ट्र धोरणात कृष्णाची वास्तविकता, वैचारिकता आणि राजकीय विचारप्रणाली यांचा समावेश करायला हवा. राष्ट्राचे हित सांभाळण्यासाठी अपधर्माचा वापर करावा लागला, तरी चालेल या कृष्णाच्या मुत्सद्देगिरीची आज आपल्याला गरज आहे. रमजानच्या काळात काश्मीरमध्ये आपण शस्त्रसंधी केली; पण त्याच काळात आपल्या जवानांवर तब्बल ६६ हल्ले झाले आणि त्यात ५ सामान्य नागरिकांचाही मृत्यू झाला, हिंसाचार झाला​,’ हे उदाहरण देखील डॉ. देवळाणकर यांनी दिले.

मनोविकास प्रकाशनचे अरविंद पाटकर यांनी प्रास्ताविक केले. अमृता मोरे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link