Next
बर्फनदी.. झोपलेला राक्षस..
BOI
Saturday, January 27 | 02:39 PM
15 0 0
Share this story


‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’मधील ‘बिअर ग्रिल्स’ नेहमी ग्लेशियरचं वर्णन हे झोपलेला राक्षस म्हणून करतो. ग्लेशियर म्हणजे बर्फाची नदी. शेकडो वर्षांपासून गोठलेला तो बर्फ असतो. अगदी हळुवार गतीने समोर सरकत असतो. या बर्फनदीच्या खाली पाण्याचा प्रवाह कायम असतो. वरून बर्फ आणि खालून पाणी.. नदी वाहत असते. ही बर्फनदी म्हणजे मला एक चिंतन करणारी, ध्यानमग्न योगीच वाटते... स्वच्छंद भ्रमंती करणाऱ्या एका तरुण लेखकाच्या अमरनाथ भटकंतीच्या ‘अमरनाथ ट्रेक’ या ट्रॅव्हलॉगचा हा चौदावा भाग..
....................................
नीट तासलेल्या चार-साडेचार फूट लांबीच्या त्या दोन्ही लाठ्या होत्या. क्रिकेट स्टंपप्रमाणे तळाशी निमुळतं त्रिकोनी धातूचं आवरण होतं. त्या टीन टप्परच्या आवरणामुळे लाठी टेकवताना पकड घट्ट व्हायची, शिवाय निमुळत्या टोकाची झीजही व्हायची नाही. नीट तासलेली असल्याने लाठीच्या रेषा, शिळका निघत नव्हत्या. त्यामुळे हातात पक्के पकडताना हाताला ती लाठी टोचत नव्हती.

मी आपला ‘लाठी मार्च’ कायम ठेवला. अर्धा तास मी न थांबता चालत होतो. कुठेही मला चढ दिसला नाही. थंडी किंचितही जाणवत नव्हती. चार लाकडं रोवून वर प्लास्टिकचं छप्पर टाकून काही लोक लिंबू सरबत, कोणी विविध प्रकारचे तेल विकत होते. कोणी केळी आणि काही फळं विकायला बसले होती. कुठे काश्मिरी पेहरावातील काही माणसं मिनरल वॉटरच्या बाटल्या, इतर हिरवे, काळे, केशरी, पिवळे ब्रँडेड कंपनींचे शीतपेये विकायला बसलेली होती. सर्वच अत्यंत महाग. एका यात्रेकरूने एक पाचशे मिलीची पिवळ्या रंगाच्या शीतपेयाची बाटली घेतली. त्याचे त्याला शंभर रुपये द्यावे लागले. शिवाय एक लिटर पाण्याची बाटली ५० रुपयांना मिळत होती. 

माझ्याजवळ पाणी नव्हतं. हिमालयात थंडीमुळे तहान लागत नाही. यामुळे शरीरात पाणी, द्रवपदार्थ पुरेसे जात नाहीत. परिणामतः डिहायड्रेशन होण्याची शक्यता असते. शिवाय पायांमध्ये क्रम्स येण्याचीही भीती वाटते. पाणी शरीरात न गेल्याने मांसपेशींमध्ये लॅक्टिक अॅसिड वाढतं. त्यामुळे मसल्स आखडतात. चालणं कठीण होऊ शकतं. वेदना वाढतात. एक पाऊलही पुढे टाकणं शक्य होत नाही. अगदी उभंही राहणं अशक्य होऊ शकतं. यापुढील खूप भयंकर अवस्थाही गाठली जाऊ शकते. 

बऱ्याचदा क्रिकेट मॅचमध्ये खेळाडूंना हा त्रास झालेला पाहायला मिळतो. अगदी मैदानावर स्ट्रेचर आणून खेळाडूला पॅवेलिअनमध्ये नेले जाते, तात्काळ उपचार केले जातात. सचिन तेंडुलकरला नव्वदच्या दशकात हा त्रास नेहमी व्हायचा. त्यानंतर मॅचच्या आदल्या रात्री तो गजर लावून मध्यरात्री उठून एक लिटर पाणी प्यायचा आणि पुन्हा झोपायचा. क्रिकेट किडा असल्याने मला हे माहित होतं. त्यामुळे मी याबाबत जागरूक होतो. पाणी घेणं गरजेचं असल्याने एका बाटलीसाठी पन्नास रुपये देऊन पुढे निघालो. अमरनाथ यात्रा असो वा केदार-बद्रीनाथ यात्रा असो वा समुद्रसपाटीपासून उंचीवरील कोणताही ट्रेक असो, सर्व ट्रेकर्स आणि यात्रेकरूंनी नेहमी आठवण ठेऊन पाणी पिण्याची दक्षता घ्यावी. हे सांगण्यासाठीच हा लेख प्रपंच. 

पाण्याच्या एक लीटरच्या बाटलीची आता हातातील सामानात भर पडली. वजन आणखी वाढलं. एका हातात एक बाटली आणि लाठी सांभाळत दुसऱ्या हातातील लाठी जमिनीवर टेकवत मार्गक्रमण करू लागलो. पाठीवरील बॅगवतीचं पोट फुगलेलं होतं. तिच्यात आणखी सामान टाकणं म्हणजे धोका पत्करणं होतं. त्यामुळे एका हातात लाठी आणि बाटली सांभाळणं फार जिकिरीचं झालेलं होतं. तशा अवस्थेत मी एक किमी अजून चाललो. तेवढ्यात एक सुंदर झरा समोर दिसला. जोरदार प्रवाहात तो कोसळत होता. जणू आजवर स्वतःला रोखून धरलेल्या त्याने स्वतःला पुर्णपणे मोकळं सोडलं होतं.

समोर दुसऱ्या बाजूने सुंदर मोठं ग्लेशियर म्हणजे बर्फनदी होती. मधोमध तिच्यात एक भोक पडलं होतं. त्यातून आवेगात नदीचा प्रवाह बाहेर पडत होता. ‘मॅन व्हर्सेस वाईल्ड’मधील ‘बिअर ग्रिल्स’ नेहमी ग्लेशियरचं वर्णन हे झोपलेला राक्षस म्हणून करतो. ग्लेशियर म्हणजे बर्फाची नदी. शेकडो वर्षांपासून गोठलेला तो बर्फ असतो आणि अगदी हळुवार गतीने समोर सरकत असतो. या बर्फनदीच्या खाली पाण्याचा प्रवाह कायम असतो. वरून बर्फ आणि खालून पाणी.. नदी वाहत असते. ग्लेशियर मला फार आवडतं. ही बर्फनदी म्हणजे मला एक चिंतन करणारी, ध्यानमग्न योगीच वाटते. समाधी न लावलेली. पण ध्यानात असलेली. वरून गाढ साधनेत मस्त असल्याची जाणीव कायम आणि आतून श्वासोच्छ्वासाचा पाण्याचा प्रवाह कायम गतिमान. 

नदीलाही जबरदस्त खळखळाट होता. पाण्याला राहून राहून उमाळा येत होता. काठावर येऊन प्रवाह आदळत होता. पाण्याचे थेंब अधून मधून अंगावर उडत होते. दगडांवर आदळत शुभ्र फेसाळतं पाणी सूर्यप्रकाशात चमकत होतं. आजूबाजूला हिरवेगार वृक्ष, वेली होते. खडक दगडांमधून रस्ता जात होता.  काळ्या हिरव्या पार्श्वभूमीवर शुभ्र रुपेरी,  चकाकतं नदीचं पाणी, पहाडातला झरा मस्तीत सुटला होता. 

चैतन्यमय झरा आणि नदी या तरुण मंडळींवर वृद्ध ग्लेशियर जणू लक्ष ठेऊन होतं. वार्धक्यामुळे अनेक पावसाळे- उन्हाळे- हिवाळे बघितल्यामुळे केस पांढरे झाले होते. परिपक्वता आली होती. त्यामुळे ते शांत होतं. काहीसा उथळ, नाठाळ झरा आणि नदी मात्र पावसाळ्यातील पाण्याने अपरिपक्वतेतून उड्या मारत होते. पावसाळा, उन्हाळा संपला, की नदी पुन्हा बर्फात गुडूप. झरा अदृश्य. त्यामुळे आता हा त्यांचा काळ होता.

माझ्या हातातील पूर्ण भरलेली बाटलीही सूर्यप्रकाशात चमकत होती. बाटलीमध्ये पाणी, समोर खळाळतं पाणी. पन्नास रूपयाचं ते प्रोसेस्ड तथाकथित मिनरल वॉटर. समोर निसर्गानं मिनरल वॉटरचा अखंड वाहता खजिना ठेवला होता. लोक तिथे फोटो काढत होते. तो ‘स्वावलंबी फोटों’चा म्हणजे सेल्फी स्पॉट  झाला होता. 
मी एक निर्णय घेतला. तो निर्णय चुकीचा की योग्य हे पुढचे दोन दिवसच ठरवणार होते. मी माझ्या हातातली एक लाठी तिथेच ठेऊन देण्याचा निर्णय घेतला...
(क्रमशः) 
- अभिजित पानसे
मोबाइल : ८०८७९ २७२२१ 
ई-मेल : abhijeetpanse.1@gmail.com

(‘अमरनाथ ट्रेक’ हा ट्रॅव्हलॉग दर शनिवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर क्रमशः प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/V6rLmU  या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link