Next
‘डॉ. केळकर कुटुंबीयांचे कार्य अभिमानास्पद’
BOI
Monday, July 02, 2018 | 12:45 PM
15 0 0
Share this storyपुणे :
‘डॉ. श्रीकांत केळकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अत्यंत साध्या, मध्यमवर्गीय परिस्थितीतून अथक परिश्रमांच्या जोरावर उभ्या केलेल्या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॅल्मॉलॉजी’चा (एनआयओ) आज झालेला विस्तार पाहिला, तर माणूस थक्क होतो. डॉ. केळकर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी समाजाच्या सेवेचं घेतलेलं हे व्रत खरोखरच देशासाठी अभिमानास्पद आहे. डॉ. आदित्य आणि डॉ. जाई ही डॉक्टरांची पुढची पिढी तो वारसा त्याच समाजभानाने पुढे नेत आहे, ही गोष्ट वाखाणण्याजोगी आहे,’ असे गौरवोद्गार भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांनी काढले. डॉ. आदित्य श्रीकांत केळकर यांनी लिहिलेल्या ‘आय बुक - डोळ्यांविषयी सर्व काही...’ या पुस्तकाचे आणि ‘ई-बुक’चे प्रकाशन एक जुलै २०१८ रोजी पुण्यात झाले. त्या वेळी ते बोलत होते. 

बुकगंगा पब्लिकेशन्सने हे पुस्तक प्रकाशित केले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री मृणाल कुलकर्णी, प्रसिद्ध अभिनेते सुनील बर्वे, बुकगंगा पब्लिकेशन्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर, डॉ. श्रीकांत केळकर, अरुणा केळकर, डॉ. आदित्य केळकर आणि डॉ. जाई केळकर यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. शेरेटन ग्रँड हॉटेलच्या मॅजेस्टिक सभागृहात ‘डॉक्टर्स डे’ला झालेल्या या सोहळ्याला पुण्यातील प्रसिद्ध डॉक्टर, मान्यवर व्यक्तींची उपस्थिती होती.

डॉ. कदम म्हणाले, ‘माझे आणि डॉ. श्रीकांत केळकरांचे खूप जुने स्नेहाचे संबंध आहेत. कोणताही आर्थिक पाठिंबा नसताना डॉक्टरांनी २५ वर्षांपूर्वी पुण्यात ‘एनआयओ’ची स्थापना केली. हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या रुग्णाला त्याच्या डोळ्यांची स्पष्ट व खरी माहिती देऊन त्याच्यावर योग्य तो उपचार करण्याची पद्धत डॉक्टरांनी घालून दिली. त्यामुळे आजदेखील ‘पुण्यात डोळ्यांच्या उपचारांसाठी कुठे जायचं, तर ‘एनआयओ’मध्ये,’ असं पुणेकर म्हणतात. डॉक्टरांबरोबरच त्यांच्या पत्नी अरुणा यांनीही अथक परिश्रम घेऊन एनआयओ नावारूपाला आणली. आता त्यांच्या शाखा घोले रोड आणि औंध अशा दोन ठिकाणी झाल्या आहेत. त्यांची पुढची पिढी डॉ. आदित्य आणि डॉ. जाई त्यांचा हा वारसा समर्थपणे पुढे नेत आहेत.’

‘सध्याच्या संगणक आणि स्मार्टफोनच्या जगात डोळ्यांची काळजी घेणे हे खूप गरजेचेआहे. डॉ. आदित्य यांनी डोळ्यांची काळजी कशी घ्यावी, याबद्दल ‘आय बुक’ या पुस्तकात सोप्या मराठीत माहिती दिली आहे. डोळ्यांचे आजार होण्याआधीच काळजी घेण्याची माहिती मिळणार असल्याने समाजाला या पुस्तकाचा नक्कीच खूप उपयोग होईल,’ असेही डॉ. कदम म्हणाले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला ‘एनआयओ’च्या कार्यावर आधारित लघुपट दाखवण्यात आला. प्रास्ताविकात डॉ. जाई केळकर म्हणाल्या. ‘‘एनआयओ’च्या माध्यमातून काम करताना हे लक्षात आलं, की रुग्णांमध्ये डोळ्यांबाबत अजूनही अनेक गैरसमजुती आहेत. त्याबद्दल कोणीच जनजागृती करत नाही. त्यामुळे ‘आय बुक’ हा या जनजागृतीचाच एक भाग आहे. उपचारांबरोबरच सामाजिक भान राखत ‘एनआयओ’च्या वतीने गेल्या १० वर्षांत सेवाकार्यासाठी तीन कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. त्यामध्ये गरजू रुग्णांना सवलतीच्या दरांत उपचार देणे, डोळ्यांच्या शस्त्रक्रिया सवलतीत करणे यांचा समावेश आहे. त्याचबरोबर डोळ्यांबाबत जागृती करण्यासाठी आम्ही ‘व्हिजन मॅरेथॉन’ स्पर्धेचे आयोजनही करतो.’

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी म्हणाल्या, ‘मी आयुष्यात पहिल्यांदा पाहिलेले नेत्ररोगतज्ज्ञ म्हणजे डॉ. श्रीकांत केळकर. आई मला लहानपणी त्यांच्याकडे घेऊन आली होती. माझ्या कुटुंबाचे आणि केळकर कुटुंबीयांचे खूप जुने संबंध आहेत. त्यामुळे मला ‘एनआयओ’च्या कामाबद्दल माहिती आहे. मला असं वाटतं, की त्या काळातील बहुतांश पुणेकरांनी ‘एनआयओ’मधूनच उपचार घेतले असतील. डॉ. श्रीकांत आणि आदित्य यांच्या कामाचे कौतुक आहेच; पण आपल्या नवऱ्याचीच आवड आपली मानून त्यासाठीच झोकून देणाऱ्या अरुणा काकू आणि डॉ. जाई यांचाही गौरव आपण करायला हवा. अशा महिला पाठीशी असल्याने केळकर कुटुंबाने या क्षेत्रात देशात गौरव होईल, असे काम उभे केले आहे. डॉ. आदित्य यांनी हे पुस्तक मराठीत लिहिले याचा मला खूप आनंद झाला. त्या निमित्ताने सामान्य मराठी माणसाला डोळ्यांबद्दल इत्थंभूत माहिती मिळेल.’

मृणाल यांनी पती-पत्नीतील संबंधांवर एक कविता सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढवली. ‘मंदार जोगळेकर यांनी बुकगंगा पब्लिकेशनच्या माध्यमातून मराठी साहित्य छापील तसंच नव्या पिढीच्या इलेक्ट्रॉनिक बुकच्या माध्यमातून जगभर पोहोचवले आहे. त्यांच्या या कामाबद्दल मराठी माणसांनी त्यांचे आभार मानावेत तेवढे थोडे आहेत,’ असेही त्या म्हणाल्या.

अभिनेते सुनील बर्वे म्हणाले, ‘डोळ्यांचं आणि नटाचं वेगळंच नातं असतं. उत्तम नट व्हायचं असेल, तर आपल्या भावना डोळ्यांतूनही दिसायला हव्यात. त्यामुळे आजच्या या डोळ्यांवरील पुस्तकाशी मी अशा पद्धतीने जोडला गेलो आहे. दुसरी गोष्ट म्हणजे माझ्या वडिलांच्या उपचारांसाठी १९८४मध्ये माझा डोळ्यांच्या हॉस्पिटलशी संबंध आला. आता ‘एनआयओ’मध्ये उपलब्ध असलेले अद्ययावत तंत्रज्ञान त्या वेळी नव्हते. त्यामुळे माझ्या वडिलांना खूप त्रास सहन करावा लागला. तेव्हा ते तंत्रज्ञान असते, तर माझ्या वडिलांनाही त्रास कमी झाला असता. या सगळ्यामुळे नेत्रतज्ज्ञांविषयी मला विशेष आपुलकी वाटते. सामान्य माणसाला डोळ्यांबाबत पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे डॉ. आदित्य यांनी या पुस्तकात दिली आहेत त्यामुळे ते नक्कीच उपयोगी ठरेल.’

‘बुकगंगा’चे मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार जोगळेकर म्हणाले, ‘मराठीमध्ये वैद्यकीय विषयांवरची पुस्तके खूप कमी आहेत. डोळ्यांवरील उपचारांच्या क्षेत्रातील अधिकारी व्यक्तीने डोळ्यांबद्दल सविस्तर माहिती समाजासमोर मांडणे खूप गरजेचे होते. त्यामुळे हे विशेष पुस्तक प्रकाशित करण्याची आम्ही लगेच तयारी दर्शवली. डॉ. आदित्य यांच्या ज्ञानासोबतच त्यांचा या क्षेत्रातील अनुभव या पुस्तकाच्या रूपाने वाचकांसमोर येतो आहे. त्यामुळे मला अधिक आनंद वाटतो. बुकगंगा पब्लिकेशन्सतर्फे छापील, ई-बुक, ऑडिओ बुक अशा विविध माध्यमांतून मराठी साहित्य जगभर पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न असतो. आतापर्यंत इंग्रजी पुस्तके आपण मराठीत अनुवादित करत होतो; पण ‘आय बुक’चा इंग्रजीत अनुवाद करून तो प्रकाशित करावा अशी वेळ आता आली आहे. ‘एनआयओ’ची यशोगाथाही पुस्तक रूपाने प्रकाशित करण्याचा मनोदय मी ‘बुकगंगा’च्या वतीने व्यक्त करतो. डॉ. श्रीकांत केळकर यांनी परवानगी दिल्यास तो प्रकल्पही लवकरच सत्यात अवतरेल.’

पुस्तकाबद्दल लेखक डॉ. आदित्य म्हणाले, ‘मी पुण्यातल्या नूतन मराठी विद्यालयाचा विद्यार्थी आहे. त्यामुळे मला मराठीत पुस्तक लिहिणे सोपे गेले. सध्या रुग्ण गुगलवर डोळ्यांबद्दल माहिती वाचतात; पण ती इंग्रजीतून उपलब्ध होते. ही माहिती मराठीतून उपलब्ध करून देणे, हा हे पुस्तक लिहिण्यामागचा उद्देश आहे. आईवडिलांच्या तसेच पत्नी डॉ. जाईच्या सहकार्यामुळेच हे पुस्तक पूर्ण होऊ शकले. हे पुस्तक वाचकांनाही आवडेल अशी अपेक्षा आहे.’

‘डॉक्टर्स डे’ निमित्त रुबी हॉल क्लिनिकचे प्रमुख डॉ. परवेझ ग्रँट, डॉ. पी. एम. बुलाख, डॉ. संजय पाटील, डॉ. दिलीप कामत, डॉ. पंडित मॅडम, डॉ. सुवर्णा जोशी, डॉ. व्ही. एन. करंदीकर, डॉ. अरविंद भावे, डॉ. संजय गुप्ते यांचा या वेळी गौरव करण्यात आला. पुस्तक लेखनात मदत केल्याबद्दल डॉ. ऐश्वर्या मुळ्ये यांचाही सत्कार करण्यात आला. ‘एनआयओ’च्या वतीने ‘बुकगंगा’चे मंदार जोगळेकर, सुप्रिया लिमये यांचाही सत्कार करण्यात आला. अरुणा केळकर यांनी आभार मानले. 

(‘आय बुक - डोळ्यांविषयी सर्व काही’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी किंवा त्याचे ई-बुक डाउनलोड करण्यासाठी कृपया खालील लिंकवर क्लिक करा.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link