Next
वो भूली दास्तां...
BOI
Sunday, February 24, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

हरहुन्नरी कलावंत ओमप्रकाश यांचे जन्मशताब्दीचे वर्ष सध्या सुरू असून, २१ फेब्रुवारी रोजी त्यांचा स्मृतिदिन होऊन गेला. त्या निमित्ताने, ‘सुनहरे गीत’ सदरात आज आस्वाद घेऊ या त्यांनी निर्मिती केलेल्या ‘संजोग’ चित्रपटातील ‘वो भूली दास्तां’ या गीताचा...
.............
‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या रसिक व जागरूक वाचकांना सलाम! ‘सुनहरे गीत’बद्दलच्या प्रतिक्रिया आतापर्यंत अनेकांनी फोनवरून संपर्क साधून दिल्याच. परंतु १० फेब्रुवारी २०१९ रोजी प्रसिद्ध झालेल्या जाँ निसार अख्तर या गीतकारांवरील लेखामध्ये त्यांच्या मुलाचे नाव जावेद असे लिहिण्याऐवजी अनवधानाने माझ्याकडून सलीम असे लिहिले गेले होते. माझी ही चूक पुणे येथील अभ्यासू, जाणकार विजय कुलकर्णी व सातारा येथील चित्रपटप्रेमी राजीव लावंधरे यांनी माझ्या निदर्शनास आणून दिली. म्हणूनच यांच्यासारख्या ‘बाइट्स ऑफ इंडिया’च्या रसिक व जागरूक वाचकांना सलाम करून मी पुढील ‘सुनहरे गीत’ कोणते, याकडे वळतो.

२०१८-२०१९ हे वर्ष अनेक कलावंतांच्या जन्मशताब्दीचे वर्ष आहे. यामध्ये चरित्र अभिनेते ओमप्रकाश यांचाही समावेश आहे. १९ डिसेंबर १९१९ ही त्यांची जन्मतारीख आहे. २१ फेब्रुवारी १९९८ रोजी त्यांचे निधन झाले. नुकत्याच होऊन गेलेल्या त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त या हरहुन्नरी कलावंताबद्दल आपण थोडे जाणून घेऊ या. 

ओमप्रकाश यांना चरित्र अभिनेता म्हटले म्हणजे झाले, अशी वस्तुस्थिती नाही. हा कलावंत नायक, खलनायक, चरित्र अभिनेता, चित्रपट निर्माता, दिग्दर्शक आणि विनोदी अभिनेताही होता. त्यांच्या विनोदी भूमिकांचे प्रमाण थोडे जास्त असल्यामुळे पटकन ओमप्रकाश कोण, तर ‘विनोदी अभिनेता ना!’ असेच म्हटले जाते; पण विविध प्रकारच्या भूमिकांतून अभिनयाचे विविध पैलू दाखवणारे हे व्यक्तिमत्त्व तसे फार वेगळे होते.

लाहोर येथे सधन कुटुंबात जन्मलेल्या ओमप्रकाश बक्षी यांना लहानपणापासून चित्रपटांचेच आकर्षण होते. आपण सिनेमात जाऊन अभिनेता व्हावे, असे त्यांना वाटत होते; पण मार्ग सापडत नव्हता. वयाच्या सतराव्या वर्षी त्यांनी लाँड्री व्यवसाय सुरू केला; पण दोन वर्षांतच तो बंद करून ते लाहोरच्या रेडिओ स्टेशनवर नोकरीस गेले. तेथे होणाऱ्या नाटकांमध्ये एक कलाकार म्हणून ते बऱ्यापैकी रमले; पण काही काळातच तेही त्यांनी बंद केले; पण बहुधा त्यामधील त्यांचे काम पाहून प्रसिद्ध चित्रपट निर्माते दलसुखलाल पंचोली यांनी त्यांना बोलावून घेतले आणि आपल्या ‘दासी’ चित्रपटातील एक भूमिका त्यांना देऊ केली. १९४४मध्ये ‘दासी’ प्रदर्शित झाला आणि चांगला चाललाही! नंतर धमकी, शहर से दूर, पगडंडी, आयी बहार, असे काही चित्रपट त्यांना मिळत गेले. १९४७च्या फाळणीवेळी ते लाहोर सोडून मुंबईला आले; पण एक-दोन वर्षे मुंबईतील चित्रपट जगतात त्यांना काम मिळाले नाही.

१९४८मध्ये निर्माते जयंत देसाई यांनी त्यांना ‘लखपती’ या चित्रपटात खलनायकाचे काम दिले. ओमप्रकाश यांचे त्यापूर्वीचे एक-दोन चित्रपट देसाई यांनी पाहिले होते. त्यामुळेच हा कलावंत व त्याचे गुण त्यांनी जाणले होते. आणि जयंत देसाईंचा तो अंदाज खरा ठरला व ‘लखपती’मधून ओमप्रकाश यांना प्रसिद्धी मिळून त्यांची वाटचाल सुरू झाली. ती अखंड सुरूच राहिली.

ओमप्रकाश यांची बोलण्याची विशिष्ट ढब, आवाजातील चढ-उतार, त्यात मधूनच आणलेला हेतुपुरस्सर चिरकेपणा आणि जबरदस्त टायमिंग या उपजत वैशिष्ट्यांमुळे हा कलावंत समोर कोणताही अभिनेता असला तरी आपला प्रभाव पाडून जात असे! ओमप्रकाश नायक म्हणून शोभणारा चेहरा घेऊन आले नव्हते; पण तरीही ‘घंघरू’ या १९५२च्या चित्रपटात त्यांनी प्रौढ नायकाची भूमिका केली होती.

त्यांचा खलनायक आक्रस्ताळेपणा न करताही छोट्याशा कृतीतून प्रेक्षकांच्या मनात चीड निर्माण करायचा. (१९५२चा अनहोनी) ओमप्रकाश यांच्यातील विनोदी अभिनेता बघायचा असेल, तर खूप भूमिका आहेत. मुसाफिरखाना, तेरे घर के सामने, प्यार किए जा, आझाद अशी अनेक चित्रपटांची नावे सांगता येतील. ओमप्रकाश यांचा गंभीर भूमिकेतील लाजवाब अभिनय पाहण्यासाठी, दिल अपना और प्रीत पराई, खानदान, ज्युली, चरणदास, जंजीर, शराबी, नमक हलाल असे चित्रपट पाहणे अनिवार्य ठरते. धुआँ, हावडा ब्रिज, दस लाख, बुढ्ढा मिल गया, अशा काही चित्रपटांत ओमप्रकाश यांना आपण पडद्यावर गातानाही बघतो आणि गाण्याच्या आशयाप्रमाणे चेहऱ्यावरील भाव हे त्यांचे वैशिष्ट्य जाणवते.

अभिनयाव्यतिरिक्त ओमप्रकाश यांनी ‘लाइट अँड शेड’ ही स्वतःची निर्मितीसंस्था काढून, दुनिया गोल है, चाचा झिंदाबाद, संजोग, जहाँ आरा, गेट वे ऑफ इंडिया, कन्हैया अशा काही चित्रपटांची निर्मितीही केली होती. त्यातील काही चित्रपट त्यांनी स्वतः दिग्दर्शितही केले होते. परंतु उत्कृष्ट गीते आणि वेगळी कथानके असलेले हे चित्रपट प्रचंड लोकप्रियता मिळवू शकले नव्हते, एवढेच ओमप्रकाश यांचे दुर्दैव होते. परंतु त्यांची चित्रपटसृष्टीतील एकूण कारकीर्द यशस्वी आणि देदीप्यमान ठरली. जातिवंत, उत्कृष्ट अभिनेता म्हणूनच त्यांचे नाव आदराने घेतले जाते! अशा या कलावंताला अभिवादन करून त्यानेच निर्मिती केलेल्या चित्रपटातील एक सुनहरे गीत अनुभवू या! 

ओमप्रकाश यांनी निर्मिती केलेला ‘संजोग’ हा चित्रपट १९६१मध्ये प्रदर्शित झाला होता. प्रदीपकुमार आणि अनिता गुहा हे त्याचे नायक-नायिका होते. प्रमोद चक्रवर्ती यांनी तो चित्रपट दिग्दर्शित केला होता. राजेंद्रकृष्ण यांनी लिहिलेली आठ गीते या चित्रपटासाठी मदनमोहन यांनी संगीतबद्ध केली होती. त्यामधीलच एक अप्रतिम गीत जे लता मंगेशकर यांनी अत्यंत समर्पक स्वरांत गाऊन राजेंद्रकृष्ण यांच्या शब्दांना अंतःकरणापर्यंत पोहोचवले होते. जोडीला मदनमोहन यांचे संगीतही प्रभावी होते.

एका दु:खी प्रेमिकेचे (प्रियकराचेसुद्धा असू शकते) हे गीत! ही प्रेमिका आपल्या भावना कशा प्रकारे व्यक्त करते बघा -

वो भूली दास्ताँ लो फिर याद आ गई 
नजर के सामने घटा सी छा गई 

मी विसरू पाहत होते, ती (माझी) दु:खद प्रेमकहाणी पुन्हा एकदा माझ्या मनाच्या अंगणात स्मृतिरूपाने आली आहे (आणि त्यामुळे) माझ्या दृष्टीपुढे कृष्णमेघांमुळे निर्माण झालेली अंधुकशी छाया पसरली आहे.

आपण विसरू पाहत असलेली ती गत काळातील सुखस्वप्ने पुन्हा आठवल्यामुळे ‘ती’ स्वतःच्याच मनाला प्रश्न विचारते, 

कहाँ से फिर चले आए ये कुछ भटके हुए साए 
ये कुछ भूले हुए नग्में जो मेरे प्यारने गाए 
ये कुछ बिछडी हुई यादें, ये कुछ टूटे हुए सपने 
पराए हो गए तो क्या, कभी ये भी तो थे अपने 
न जाने इनसे क्यों मिलकर नजर शरमा गई 

(माझ्या कधी काळच्या प्रीतीच्या सुखद दिवसांच्या) दूर गेलेल्या छाया कोठून बरे पुन्हा माझ्या जवळ आल्या आहेत (व मला त्रस्त करत आहेत). मी प्रीतीभरल्या मनाने गायलेली गीते, जी मी विसरून गेले होते, ती गीते आणि माझ्यापासून दूर गेलेल्या (त्या सुखद दिवसांच्या) आठवणी आणि भंगलेली माझी काही स्वप्ने, की जी आता मला परकी आहेत, पण कधी काळी ती माझी स्वतःची होती (हे सगळे मला आज आठवत आहे)? आणि आज ते सारे आठवुन माझी नजर खेदाने (की दु:खाने) का झुकली आहे? 

स्वत:च उभ्या केलेल्या प्रश्नांच्या भोवऱ्यात सापडलेली ती गत काळातील ‘त्या’ सुखद दिवसांच्या आठवणीत बुडून जाऊन म्हणते - 

उम्मीदों के हँसीं मेले, तमन्नाओं के वो रेले 
निगाहों ने निगाहोंसे अजब कुछ खेल ये खेले 
हवा में जुल्फ लहाराई, नजर पे बेखुदी छाई 
खुले ये दिल दरवाजे मोहब्बत भी चली आई 
तमन्नाओं की दुनियापर जवानी छा गई

सौख्याची आशा, उमेद यांची (मनात जणू) जत्राच/मेळेच भरले होते. (मन विविध) इच्छांनी भरले होते. (तशातच त्यांच्या व माझ्या) नजरांनी काही वेगळे खेळ खेळले (नेत्रकटाक्षांनी प्रीती फुलली) माझा केशकलाप त्या (प्रेमाच्या) सुखद हवेत फुलून गेला (आणि) नजरेसमोर (प्रीतीची) धुंदी पसरली. (हे सर्व घडत असताना माझ्या) मनाचे/हृदयाचे दरवाजे उघडेच होते. (त्यामुळे त्यांच्याविषयीची) प्रेमभावता थेट मनातच येऊन बसली. माझ्या इच्छांच्या जगामध्ये तारुण्याच्या (प्रेमसुलभ) भावना पसरून राहिल्या. 

प्रीतीच्या सुखद दिवसांच्या आठवणी आठवल्यानंतर ‘ती’ पुन्हा वास्तवाकडे येते व हे सर्व का व कसे घडले, हा प्रश्न तिला पडतो आणि तेव्हा ती म्हणते - 

बडे रंगीन जमाने थे, तराने ही तराने थे
मगर अब पूछता है दिल वो दिन थे या फसाने थे 
फक्त एक याद है बाकी, बस एक फरियाद है बाकी 
वो खुशियाँ लूट गई, लेकिन दिल ए बरबाद है बाकी 
कहाँ थी जिंदगी मेरी, कहाँ पर आ गई 

(त्यांच्याबरोबरच्या प्रेमाचे ते) रंगीबेरंगी दिवस होते, तो रंगीत काळ होता (आणि त्या वेळी ओठावर फक्त प्रीतीची सुखद) गाणीच गाणी होती; पण आता माझे मनच मला विचारते आहे, की (खरंच) ते सुखद दिवस होते, की ती एक गोष्ट होती, कथा होती (जी आता राहिली नाही.) ते (प्रीतीचे) सौख्य (काळाने) लुटून नेले; पण (माझे) उद्ध्वस्त/ दु:खी मन - हृदय मात्र तेवढे माझ्याजवळ आता राहिले आहे. (खरेच) कोठे होते माझे जीवन (आणि) आता कोठे आले आहे? (प्रेमाच्या प्राप्तीनंतर विरहाच्या या काळाचा विचार केला, की वाटते की या जीवनप्रवाहात मी कोठून कोठे वाहत गेले आहे.) 

राजेंद्रकृष्ण यांचे समर्पक शब्द, शब्दांना न्याय देणारी चाल आणि वाद्यांची संगत हे कर्तृत्व मदनमोहन यांचे आणि लता दीदींचा आवाज! सर्व काही केवळ मनाला भिडणारे नव्हे, तर मनाला पटणारे व मनात खोलवर रुतून बसणारे! 

अशी गाणी असणारे चित्रपट निर्माण करणारे ओमप्रकाश! ‘संजोग’खेरीज गेट वे ऑफ इंडिया, कन्हैया, जहाँ आरा यांच्या बाबतीतही हेच म्हणावे लागेल! अशा हरहुन्नरी ओमप्रकाश यांना विनम्र अभिवादन!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Rajiv Lawanghare, satara. About 145 Days ago
Pathakji sir, really very informative and descriptive article. We got many unknown information about the omprakashi. Thanks🙏🙇
0
0

Select Language
Share Link
 
Search