Next
...ही शाळा लावतेय मुलांना मराठीची गोडी
BOI
Wednesday, February 28 | 05:29 PM
15 0 0
Share this story

पंढरपूर : पोटाची खळगी भागवण्यासाठी कोण काय करील याचा काही नेम नाही. प्रत्येक जण काहीही करून आपली भूक भागवत असतो; रोपळे (ता. पंढरपूर, जि. सोलापूर) शालेय विद्यार्थ्यांना मात्र वाचनाची भूक लागली आहे. त्यामुळे येथील रयत शिक्षण संस्थेच्या श्री शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयातर्फे पुस्तक भिक्षा उपक्रम सुरू करण्यात आला असून, त्याला चांगला प्रतिसाद मिळत आहे. मुलांना वाचनाची गोडी लागण्यासाठी आणि त्यांचे मराठी भाषेचे ज्ञान अधिक समृद्ध होण्यासाठी या उपक्रमाचा हातभार लागत आहे. गेल्या वर्षापासून हा उपक्रम सुरू आहे.

या विद्यालयातील विद्यार्थ्यांना मराठी भाषेबद्दल प्रेम निर्माण व्हावे, म्हणून त्यांना अवांतर वाचनाची गोडी लावण्यात आली आहे. त्यासाठी शाळेच्या ग्रंथालयातील पुस्तके उपलब्ध करून दिली जात आहेत. प्रत्येक वर्गासाठी वार ठरवून पुस्तकांची देवाण-घेवाण केली जाते. सर्वांत जास्त पुस्तके वाचणाऱ्या विद्यार्थ्याला बक्षीस दिले जाते. त्यामुळे पुस्तके वाचण्याची जणू अहमहमिकाच सुरू झाली आहे. शाळा सुटल्यावर प्रत्येक वर्गाचा स्वतंत्र गट करून मैदानावर बसवून त्यांच्याकडून प्रकट वाचन करून घेतले जात आहे. वाचन-लेखन उत्कृष्ट व्हावे म्हणून दररोज एक परिच्छेद शुद्धलेखन करण्याचा गृहपाठ दिला जातो. गटप्रमुख नेमून गृहपाठ तपासून घेतला जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांचे अक्षर वळणदार होऊ लागले असून, त्यांना व्याकरणदृष्ट्या जास्तीत जास्त शुद्ध लिहिता येऊ लागले आहे.

विद्यार्थ्यांना ग्रंथालयाव्यतिरिक्त वर्गग्रंथालयाच्या माध्यमातून पुस्तके वाचण्यास देण्यात येत आहेत. या योजनेअंतर्गत मराठी भाषा विभागाचे एम. बी. पुजारी यांच्या संकल्पनेतून ‘पुस्तक भिक्षा योजना’ राबविली जात आहे. तिला पालक, विद्यार्थी व शिक्षकांची चांगली साथ मिळत आहे. विद्यार्थ्यांचा गट पाडून उंबरठा भेट दिली जाते. विद्यार्थी पुस्तकांची भिक्षा मागतात. यातून सुमारे ३५० पुस्तके मिळाली. ती वर्गग्रंथालयात ठेवून मुलांना वाचण्यास उपलब्ध करून दिली जातात. या उपक्रमातून विद्यार्थ्यांमध्ये वाचनाचा छंद निर्माण झाला. या छंदामधून पुढे स्पर्धांची तयारी सुरू झाली. वक्तृत्व व निबंध स्पर्धेत संस्था शाळा, विविध मंडळे सामाजिक संघटनेच्या माध्यमातून स्पर्धा होतात. त्यात मोठ्या संख्येने विद्यार्थी आपला सहभाग नोंदवतात. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या उपक्रमामुळे विद्यार्थांना सभाधीटपणा मिळाला. त्यामुळे जिल्हा आणि राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सहभाग घेण्याचे आणि चांगले यश मिळविण्याचे येथील विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढले आहे.

विद्यालयात थोर महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी व इतर शालेय कार्यक्रमांचे सूत्रसंचलन विद्यार्थ्यांकडे दिले जाते. त्यामुळे कार्यक्रम उठावदार तर होतोच. परंतु मुले उत्तम प्रकारे  निवेदन करू लागली आहेत. त्याचबरोबर मराठी भाषा समृद्धी सप्ताहात विविध कार्यक्रम आयोजित करून मराठी भाषेबद्दल गोडी वाढवली जाते. प्रमाणभाषेत केव्हा बोलायचे आणि बोलीभाषेत केव्हा बोलायचे, हे मुलांना कळू लागले आहे.
विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये असणाऱ्या सुप्त गुणांना संधी दिली पाहिजे, म्हणून सोलापुरातील नामवंत कवी मारुती कटकधोंड, माधव पवार, वंदना कुलकर्णी व गझलकार बद्दीउजमा बिराजदार यांना बोलावून विद्यार्थ्यांपुढे काव्यसंमेलन घेण्यात आले. त्या कार्यक्रमात विद्यालयातील १२ बालकवी सहभागी झाले होते. या काव्यसंमेलनामुळे विद्यार्थ्यांना प्रेरणा मिळाली. त्यामुळे दर आठवड्याला वर्गात कविता करणाऱ्या विद्यार्थ्याची कविता वर्गात कापडी फलकावर लावली जाते. तसेच महिन्यातून एकदा सर्वांच्या कविता एकत्र वाचण्यास प्रेरणा दिली जाते. यातूनच भोसे (क) (तालुका पंढरपूर) येथे नुकत्याच पार पडलेल्या पहिल्या राज्यस्तरीय बालसाहित्य संमेलनात इयत्ता पाचवीतील प्रगती मोहन काळे, इयत्ता सहावीत शिकणारा साहिल मोहन काळे व इयत्ता नववीतील चैत्राली प्रशांत आंद या तीन विद्यार्थांना निमंत्रित बालकवी म्हणून आपल्या कविता सादर करण्याचा मान मिळाला.

मुलांसाठी मराठीचा स्वतंत्र कक्ष तयार करण्यात आला आहे. त्यात मराठी भाषेची वैशिष्ट्ये, व्याकरण, अध्ययन-अध्यापन पद्धती आदींचे तक्ते तयार करण्यात आले आहेत. इतरही अनेक उपक्रम राबविले जात आहेत. हे उपक्रम मुख्याध्यापक एस. एम. बागल व पर्यवेक्षक टी. बी. ताटे यांच्या मार्गदर्शनाखाली भाषा विभागप्रमुख बी. एम. पुजारी चांगल्या प्रकारे राबवतात.

(मराठी राजभाषा दिनानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध झालेले सर्व लेख, कविता आणि व्हिडिओ https://goo.gl/qgDdWU या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)

(रोपळे येथील श्री शिवाजीभाऊ बाबा पाटील विद्यालयात २७ फेब्रुवारी २०१८ रोजी विद्यार्थ्यांचे कविसंमेलन झाले. त्याची झलक पाहा सोबतच्या व्हिडिओत...)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
वैशाली वराडे About 290 Days ago
अप्रतिम उपक्रम
1
0
VINAYAK PANDURANG KHATAKE About 290 Days ago
अतिशय उत्कृष्ट उपक्रम सुरू आहे
0
0
Data Bhau - Shri Datta eregeshan shetem About 291 Days ago
Danyavad mohanrav, marathi dinanimt tumi chan batmi bytes of India var dilIi tyavarun marathi var tumche Prem aahe he disun aale phar chan Vatle.
0
0

Select Language
Share Link