Next
पिंपरी-चिंचवडमध्ये पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया
प्रेस रिलीज
Friday, July 13, 2018 | 12:22 PM
15 1 0
Share this story

रोबोटिक शस्त्रक्रिया यशस्वी केलेली डॉक्टरांची टीमपिंपरी : येथील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय रुग्णालय व संशोधन केंद्र येथे ‘डा विन्सीएक्सआय’ कंपनीचे अत्याधुनिक चौथ्या पिढीच्या रोबोटच्या साहाय्याने २५ जून रोजी नुकतीच पहिली रोबोटिक शस्त्रक्रिया करण्यात आली.

आंबेगाव येथील ४० वर्षीय महिलेला दोन आठवड्यांपूर्वी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तिला एका मूत्रपिंडामध्ये सहा सेमी या आकाराचा काटेरी व शिंगांसारखा मूत्रखडा तसेच दुसऱ्या मूत्रपिंडात लहान मूत्रखडा असल्याचे तपासणीनंतर दिसून आले होते. त्यामुळे मूत्रपिंडाचे कार्य व्यवस्थित होत नव्हते; तसेच त्यांना फार वेदना होत होत्या. दुसऱ्या मूत्रपिंडामधील मूत्रखडा लेप्रोस्कोपिक सर्जरीद्वारे काढण्यात आला. पहिल्या मूत्रपिंडातील खड्याचा आकार मोठा असल्याने तो काढण्यासाठी रोबोटिक सर्जरीचा वापर करण्यात आला.

ही शस्त्रक्रिया करण्यासाठी शरीरामध्ये पाच मिमीची पाच छिद्र करून मूत्रपिंडातील खडा बाहेर काढण्यात आला. हीच शस्त्रक्रिया नेहमीच्या पद्धतीने केली असता जास्त म्हणजे १५ सेमीचा कट द्यावा लागला असता. यामुळे संसर्ग होण्याची शक्यता निर्माण झाली असती आणि रक्तस्त्राव होऊन रुग्णाला वेदनेचा त्रासही सहन करावा लागला असता; तसेच त्याचप्रमाणे आजारपणातून बरे होण्यास व जखम भरण्यास फार वेळ लागला असता. हे सर्व टाळण्यासाठी रोबोटिक सर्जरीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. सर्व तपासण्या व ऑपरेशन यशस्वी झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

या रोबोटिक शस्त्रक्रियेसाठी युरोलॉजी विभागाचे डॉ. एस. पी. कांकलिया डॉ. व्ही. पी. साबळे, डॉ. वी. पी. सावंत, डॉ. सुनील म्हस्के, डॉ. हिमेश गांधी, डॉ. दीपक माने, डॉ. अभिरुद्रा मुळे, डॉ. मेहुल सिंह तसेच निवासी डॉक्टर्स आणि भूलतज्ज्ञ विभागाचे डॉ. पी. एस. गरचा, डॉ. शीतल व डॉ. भूषण यांनी परिश्रम घेतले.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पी. डी. पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ सोसायटीच्या उपाध्यक्षा भाग्यश्री पाटील यांच्या प्रयत्नातून रुग्णालयात पिंपरी-चिंचवड शहरातील पहिले रोबोट स्थापित करण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जे. एस. भवाळकर, शैक्षणिक संचालिका डॉ. वत्सलास्वामी,  वैद्यकीय अधीक्षक डॉ. एच. एच. चव्हाण, या वेळी उपस्थित होते.
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link