Next
एका प्रेरणादायी पुस्तकाचे प्रकाशन
BOI
Friday, February 23 | 12:57 PM
15 0 0
Share this story

‘कहाणी ऋषीची - अन् अरुणाचीही’ या पुस्तकाचे प्रकाशन करताना (डावीकडून) अशोक कोठावळे, अच्युत गोडबोले, ऋषी शहानी आणि मृणाल कुलकर्णीमुंबई : ‘कहाणी ऋषीची - अन् अरुणाचीही’ या एका प्रेरणादायी पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच विलेपार्ले (पूर्व) येथील लोकमान्य सेवा संघाच्या गोखले सभागृहात झाले. मराठी मित्र मंडळ व मॅजेस्टिक पब्लिशिंग हाउस यांच्या संयुक्त विद्यमाने झालेला हा कार्यक्रम अतिशय हृद्य झाला.

बांद्रा येथे राहणाऱ्या अरुणा शहानी यांना ऋषी नावाचा, डाउन सिन्ड्रोम (Down Syndrome) झालेला मुलगा आहे. अरुणा यांचे पती प्रेम आणि त्या स्वतः अत्यंत काळजीपूर्वक आणि ममत्वाने त्याचा सांभाळ करतात. अरुणा यांनी ऋषीच्या संगोपनाविषयी रिफ्लेक्शन्स (१९९४), व्हेन टुमॉरो कम्स (२००८), ए टॉल पिग्मी (२०१४) अशी तीन इंग्रजी पुस्तके लिहिली आहेत.

शहानी ज्या बागेत फिरायला जातात त्याच बागेत त्यांची मैत्रीण म्हणजेच आचार्य अत्रे यांची कन्या मीनाताई देशपांडे फिरायला येतात. तेव्हा मीनाताईंचीही ऋषीसोबत मैत्री झाली. ऋषीची गोष्ट मराठीमध्ये आली पाहिजे, असे मीनाताईंना वाटले. त्यानंतर सुधा गद्रे यांनी तीन इंग्रजी पुस्तकांचा मराठीत अनुवाद केला. ‘कहाणी ऋषीची – अन् अरुणाचीही’ या नावाने ‘मॅजेस्टिक पब्लिशिंग हाउस’तर्फे अशोक कोठावळे यांनी हे पुस्तक प्रकाशित केले.

ऋषी आज ३६ वर्षांचा आहे. तो पोहणे, बॅडमिंटन, नृत्य, वाद्यवादन यात पारंगत आहे. ऑलिम्पिकमध्ये त्याने पोहण्यात सुवर्णपदक जिंकले आहे! त्याला कॅन्सर झाला होता; पण त्यावरही त्याने मात केली! तो स्वतःही या प्रकाशन समारंभाला स्टेजवर उपस्थित होता आणि त्याचे आई-बाबा, मित्रमंडळी प्रेक्षकांत होते. सुरुवातीला त्याने सिंथेसायझरवर गाणी वाजवून सर्वांना सुखद धक्काही दिला. त्याची प्रेरणादायी कहाणी या पुस्तकात आहे.

अभिनेत्री मृणाल कुलकर्णी विशेष मुलांच्या क्षेत्रात काम करतात. त्यांनी भाषणात सांगितलेल्या एका प्रसंगाने उपस्थित सारेच जण हेलावून गेले. त्या विशेष मुलांच्या संस्थेत गेल्या होत्या. तिकडे एका सात-आठ वर्षांच्या मुलाची आई केक कापत होती. त्यांना वाटले, की त्या मुलाचा वाढदिवस असेल. त्यांनी तसं विचारलं, तर आई कौतुकाने म्हणाली, ‘तीन महिन्यांच्या सततच्या प्रयत्नानंतर माझ्या मुलाने आपल्या शर्टाचे बटन स्वतः लावले,’ असे उत्तर त्यांनी दिल.

संगणकतज्ज्ञ अच्युत गोडबोले यांनी या पुस्तकातील कहाणी स्वतःच्या आयुष्याशी समांतर जाणारी आहे, असे भावपूर्ण शब्दांत सांगितले. त्यांना ऑटिझमग्रस्त मुलगा असून, अशा मुलांसाठी ते शाळा चालवतात. आपण लेखक कसे झालो, हेही त्यांनी सांगितले. प्रकाशक अशोक कोठावळे, अनुवादक सुधा गद्रे यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले.

(‘कहाणी ऋषीची - अन् अरुणाचीही’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link