Next
पुस्तकांच्या गावाने रचला इतिहास
BOI
Friday, May 05, 2017 | 07:00 PM
15 3 0
Share this article:

भारतातील पहिल्या पुस्तकांच्या गावाचे उद्घाटन करताना मान्यवर

सातारा : ‘वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी व समृद्ध करण्यासाठी साहित्यिक व प्रकाशकांनी भिलारमध्ये येऊन कार्यक्रम घडवून आणावेत,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. ‘यापुढे सहलीसाठी पसंतीचे ठिकाण म्हणून या गावाकडे निश्चितपणे पाहिले जाईल. आजवर स्ट्रॉबेरीच्या नावाने ओळखले जाणारे थंड हवेच्या ठिकाणी वसलेले भिलार हे गाव आता पुस्तकांचे गाव म्हणून ओळखले जाणार असून, भिलारवासीयांनी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देशात आपली आगळीवेगळी ओळख प्रस्थापित केली आहे,’ असे ते म्हणाले. 

भारतातील पहिल्या पुस्तकांच्या गावाचे उद्घाटन गुरुवारी, चार मे रोजी रोजी भिलार येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. देशातील पहिले पुस्तकाचे गाव ही आगळी-वेगळी सुंदर संकल्पना राबवून ती कार्यान्वित केल्याबद्दल मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे व भिलार गावच्या ग्रामस्थांचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले. ‘भिलारने देशात या निमित्ताने वेगळा इतिहास रचला आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात एकीकडे वाचनसंस्कृती कमी होते की काय, अशी भीती व्यक्त होत असताना, भिलारवासीयांनी ‘नाही.. आपल्याला वाचनसंस्कृती पूर्वजांनी दिलेली आहे. ती कमी होऊ देणार नाही,’ असा संदेश दिला आहे. आज गावामध्ये उत्साह व आनंदाचे वातावरण आहे. महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक गावात आले आहेत. प्रत्येकाच्या घरासमोर रांगोळी सजली आहे. भिंतीवर बोलके चित्र काढलेले आहे. जो कोणी गावात येईल, तो या गावाच्या प्रेमात पडल्याशिवाय राहणार नाही,’ असा आशावाद मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

‘या गावातील प्रत्येक घर सदासर्वकाळ पुस्तकाचे घर असणार आहे. या गावातल्या लोकांनी पुस्तकालाच आपले कुटुंब मानले आहे. या ठिकाणी येणाऱ्यांना यापुढे स्ट्रॉबेरीच्या चवीबरोबरच वाचनाची भूक भागवण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्रात वाचनसंकृती नवीन नाही. मराठी ही समृद्ध भाषा आहे. या भाषेचे आकर्षण अन्य भाषिकांनाही असते. मराठीची प्रशंसा अन्य भाषेतील साहित्यिकांनी वेळोवेळी केली आहे. मराठी भाषेत जेवढी संमेलने होतात, तेवढी अन्य भाषेत पाहायला मिळत नाहीत. आज भिलारवासीयांनी नवीन पाऊल टाकत असताना हा इतिहासही रचलेला आहे,’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. भिलारबद्दलच्या आपल्या भावना व्यक्त करत असतानाच मुख्यमंत्र्यांनी, ‘यापुढे साहित्यिक व प्रकाशकांनी या ठिकाणी येऊन प्रकाशन समारंभ घ्यावा. मीसुद्धा त्या कार्यक्रमाला निश्चित येईन,’ असे आश्वासनही दिले.

या कार्यक्रमाचे उद्घाटन आगळ्यावेगळ्या पद्धतीने झाले. यावेळी ‘पुस्तकाचं गाव भिलार’ यावर आधारित चित्रफीत दाखवण्यात आली. या चित्रफितीतून भिलारवासीयांनी दाखवलेल्या औदार्याची माहिती मिळते. प्रारंभी भिलारच्या सरपंच वंदना भिलारे यांच्या निवासस्थानी जाऊन आणि काही घरांना भेटी देऊन मुख्यमंत्र्यांनी माहिती जाणून घेतली. 

या वेळी शालेय शिक्षण व मराठी भाषा विभागाचे मंत्री विनोद तावडे, सार्वजनिक बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर, साताऱ्याचे पालकमंत्री विजय शिवतारे, मराठी भाषा विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील, सरपंच वंदना भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.
 
15 3 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search