Next
निखळ नातं..
BOI
Saturday, February 17 | 06:45 AM
15 0 0
Share this story


आशुतोष आणि त्याचा भाऊ दोघेही फक्त आणि फक्त आईचंच ऐकायचे. आई सांगेल तसंच राहायचं, वागायचं. कायमंच आई सांगेल ती पूर्व दिशा असं एकंदरीत चित्र होतं. आशुतोषचा पगारसुद्धा वडिलांच्या आणि त्याच्या जॉईंट अकाऊंटला जमा व्हायचा. पायलला तिच्या मनाप्रमाणे काहीच करता येत नसत... ‘मनी मानसी’ सदरात आज पाहू या नात्यांमध्ये येणाऱ्या दुराव्याबद्दल...
...........................................
पायलला घेऊन तिचे आई-वडील समुपदेशनासाठी आले. पायल २६-२७ वर्षांची नोकरी करणारी एक चुणचुणीत मुलगी होती. तीन वर्षांपुर्वी तिचं आणि आशुतोषचं लग्न झालं. आशुतोष एका मोठ्या कंपनीत नोकरी करायचा. पायलसुद्धा एका कंपनीत लग्नाआधीपासूनच नोकरी करत होती. आशुतोष आणि पायलचं रीतसर घरच्यांच्या पसंतीने लग्न झालेलं. लग्नानंतरचे काही महिने अगदी छान गेले. पायलला काही गोष्टी खटकल्या. पण नंतर बदलेल सगळं हळूहळू आणि नीट होईल, असं म्हणत तिने त्याकडे दुर्लक्ष केलं.

काही दिवस गेल्यानंतरही मात्र या सगळ्यात काहीच बदल झाला नाही. उलट पायलची घुसमट वाढत गेली आणि १५ दिवसांपूर्वी माहेरी येऊन तिने घटस्फोटाचा विचार करत असल्याचे आई-वडिलांना सांगितले. आई-वडिलांसाठी हा मोठा धक्काच होता. त्यांनी कसंबसं  स्वतःला सावरलं आणि तिची समजूत काढून तिला समुपदेशनासाठी घेऊन आले. आई-वडिलांशी आणखी आवश्यक बोलणं झाल्यावर त्यांना बाहेर बसवून पायलशी संवाद साधायला सुरुवात केली. थोडसं जुजबी बोलणं झाल्यावर पायलला रडू कोसळलं. तिला सावरण्यासाठी वेळ देता यावा, म्हणून त्या सत्रात अधिक न बोलता तिला मोकळं होऊ दिलं. पुढच्या सत्रांमध्ये हळूहळू तिच्या या निर्णयामागील कारण उलगडत गेलं.

लग्न झाल्यानंतरचे काही महिने मस्त गेले. परंतु त्यानंतरच्या काळात पायलला काही गोष्टी खुपच खटकायला लागल्या. आशुतोषचं एकत्र कुटुंब. त्यात आशुतोष, त्याचे आई-वडील, मोठा भाऊ, त्याची बायको-मुलं अशी एकूण सात-आठ जणं. आशुतोषच्या आईचा स्वभाव खूपच हुकुमशाही स्वरूपाचा होता. वडिलांचा स्वभाव तसा नसला तरी आईच्या नियमांना, मुद्द्यांना त्यांची संमती असायची. 

आशुतोष आणि त्याचा भाऊ दोघेही फक्त आणि फक्त आईचंच ऐकायचे. आई सांगेल तसंच राहायचं, वागायचं. कायमंच आई सांगेल ती पूर्व दिशा असं एकंदरीत चित्र होतं. आशुतोषचा पगारसुद्धा वडिलांच्या आणि त्याच्या जॉईंट अकाऊंटला जमा व्हायचा. कधी पैसे काढायचे असले, काही खरेदी करायची असली तरी आईकडून पैसे घ्यावे लागत, शिवाय का.? कुठून.? कशाला.? किती खर्च होणार.? या सगळ्याची उत्तरंही द्यावी लागायची. पायलला तिच्या मनाप्रमाणे काहीच करता येत नसत. तिने कोणतीही इच्छा व्यक्त केली, की आशुतोष म्हणायचा आईला विचार. अगदी कपडे, राहणं, बाहेर जाणं हे सगळंच केवळ आईच्या म्हणण्याप्रमाणेच चालायचं. पायलने हे त्याला समजावायचा बऱ्याचदा प्रयत्न केला, पण त्यामुळे त्या दोघांमध्ये खूप वाद व्हायचे. पायलचं म्हणणं समजून घ्यायला आशुतोष तयारच नव्हता. तुला नसेल पटत, तर जा निघून. असं तो तिला सारखं म्हणायचा. या साऱ्याला कंटाळूनचं त्या दिवशी ती माहेरी निघून आली आणि हा घटस्फोटाचा निर्णय तिने घेतला. पायलबरोबर बोलणं झाल्यावर तिच्या आई-वडिलांना या साऱ्याची कल्पना देण्यात आली. 

काही दिवसांनी आशुतोषलादेखील समुपदेशनासाठी बोलावण्यात आले. सुरुवातीला त्याचा घरच्यांचा अर्थातच या साऱ्याला विरोध होता. परंतु नंतर पायलच्या आई वडिलांच्या प्रयत्नांमुळे आशुतोष कसाबसा समुपदेशनाला आला. सुरुवातीच्या काही सत्रात, या सगळ्यांत पायलचीच चूक आहे असंच तो भासवत राहिला. तो त्यावर अगदी ठाम होता. परंतु नंतर काही मानसोपचार पद्धतींचा वापर करत सत्र घेतल्यावर त्याला हळूहळू समस्या लक्षात येऊ लागली. आपलं नेमके कुठे चुकलं आणि चुकतंय हे त्याच्या लक्षात आलं. अर्थातच पायलचीदेखील सत्रं घेण्यात आली. समस्या सोडवण्यासाठी तिला तिच्यात काही बदल करायला  सांगण्यात आले. 

आशुतोषच्या आई-वडिलांनाही या समुपदेशन प्रक्रियेत सामील करून घेतले. आशुतोषच्या आईच्या स्वभावामुळे अर्थातच त्यांचा प्रतिसाद मिळण्यास वेळ लागला. पण हळूहळू साऱ्यांच्याच प्रयत्नांमुळे समस्येची तीव्रता कमी होत गेली. कुटुंब टिकवण्यासाठी साऱ्यांनीच केलेल्या बदलांमुळे आणि प्रयत्नांमुळे आशुतोष आणि पायलचं नातं पुन्हा छान खुललं आणि पुढे टिकलंही..

(केसमधील नावे बदलली आहेत.) 

 - मानसी तांबे-चांदोरीकर 
मोबाइल : ८८८८३ ०४७५९ 
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com 

(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत.)

(दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link