Next
पोषण : तनाचे-मनाचे
BOI
Wednesday, January 10 | 09:45 AM
15 1 0
Share this story


पोषण ही एक सर्वसमावेशक अशी संकल्पना आहे. पोषण म्हटले की शरीराचे पोषण असे चटकन आपल्या डोक्यात येते; पण फक्त शरीराचे पोषण पुरेसे नाही. मनाचे पोषणसुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. खरे तर शारीरिक व मानसिक पोषण चांगले झाले, तरच एक चांगली व्यक्ती घडत असते. म्हणूनच मानवी शरीर, आहार आणि मन या नात्याबद्दलच्या विविध गोष्टी सांगणारे, आहारतज्ज्ञ आश्लेषा भागवत यांचे ‘पोषणमंत्र’ हे नवीन सदर आजपासून सुरू करत आहोत. 
..................

अन्नपदार्थांची पोषणमूल्ये वाढवणारी अनेक नवनवी उत्पादने आपण टीव्हीवर पाहतो आणि घेतो. त्यातून काही प्रमाणात शरीराचे पोषण होतेही; मात्र मनाच्या पोषणाचे काय..? मनाचे जाणीवपूर्वक पोषण होण्याची गरज कोणालाच वाटत नाही. मनाला पोषक अशा फार थोड्या गोष्टी होत असतात. आपण कुटुंबासह महिन्यातून एकदा सिनेमा पाहायला, दर आठवड्याला हॉटेलमध्ये अगदी कटाक्षाने जातो; पण कोणी मुद्दाम मुलांना दर आठवड्याला एखादे चांगले पुस्तक वाचायला देणे, शाळेत जे विज्ञान शिकतो त्यातील पाने आणि फुलांचा बागेत जाऊन अभ्यास करणे, ट्रेकिंगला जाणे, गड-किल्ल्यांची माहिती देणे, थोर लोकांची महती सांगणे यातले काहीही करत नाही. खरे तर शारीरिक व मानसिक पोषण मिळूनच एक चांगली व्यक्ती तयार होत असते. 

शरीर ज्या घटकांचे बनलेले आहे, ते घटक शरीराला अखंडपणे पुरवत राहणे, हा पोषणाचा एक भाग आहे. शरीराची दैनंदिन गरज असलेले वरण, भात, पोळी, भाजी हे पदार्थ म्हणजे अगदी साधे मूलभूत पोषण झाले. आजच्या धावपळीच्या व स्पर्धेच्या युगात, शारीरिक व मानसिकदृष्ट्या तंदुरुस्त राहण्यासाठी अनेक बारीकसारीक पोषणतत्त्वांची गरज असते. हे सर्व मिळण्यासाठी आहारामध्ये सर्व पदार्थ आलटून पालटून मिळतात ना, हे बघणे खूप गरजेचे आहे. त्याप्रमाणे त्यांचे प्रमाण किती असावे, हा भागही खूप महत्त्वाचा आहे. सुक्या मेव्याचे प्रमाण व वरण-भात, भाजी-पोळी यांचे प्रमाण हे स्पष्ट करते, की सुक्या मेव्यात असलेली पोषणतत्त्वे अतिमहत्त्वाची तर आहेतच; पण ती अतिसूक्ष्म व तुलनेने कमी प्रमाणात लागणारीही आहेत. उदाहरणार्थ, प्रथिने अमायनो आम्लांची बनलेली असतात. एकूण अमायनो आम्लांपैकी काही शरीरात तयार होतात, तर काही अन्नातून मिळतात. 

अन्नामधील प्रथिनांचे स्रोत म्हणजे डाळी, कडधान्ये. आपल्या जेवणामध्ये याचा भरपूर प्रमाणात वापर असावाच; पण याव्यतिरिक्त काही सूक्ष्म आम्ले जी शरीरात निर्माण होत नाहीत, ती फक्त सुक्या मेव्यात असतात आणि स्नायूंच्या कार्यात त्यांचे अतिशय महत्त्व आहे. त्यामुळे अदलून-बदलून रोजच सुका मेवा थोड्या प्रमाणात घेतला पाहिजे, ज्यायोगे शरीराचे सर्वसाधारण नव्हे, तर संपूर्ण पोषण होईल. खनिजे व जीवनसत्त्वांचेही असेच खूप प्रकार आहेत. ते एकाच प्रकारच्या अन्नातून मिळत नाहीत. त्यामुळे फळे व भाज्या खाताना सर्व प्रकार खाणे होते आहे की नाही याकडे गृहिणीने लक्ष देणे आवश्यक आहे. अंजीर, पीच, द्राक्षे, ओली खारीक अशी फळे ताजी व सुकी अशा दोन्ही प्रकारात मिळतात. फळ ताजे व सुके अशा दोन्ही रूपांत मिळत असले, तरीही त्याच्या दोन्ही स्वरूपांतील पोषणमूल्यांमध्ये खूप फरक पडतो. इथे कोणते जास्त चांगल्या दर्जाचे व कोणते दुय्यम दर्जाचे अशी तुलना चुकीची ठरेल. भाज्यांमध्येसुद्धा फळभाज्या, पालेभाज्या, सॅलड असे विविध प्रकार खावेत. म्हणजे जे पोषकतत्त्व एकात नाही, ते दुसऱ्यातून मिळून जाते. तांदूळसुद्धा एकाच प्रकारचे वापरण्यापेक्षा आलटून पालटून वेगवेगळे वापरावेत. या सगळ्याचे कारण एकच, की एका प्रकारच्या अन्नधान्यात जे नाही, ते दुसऱ्यात आहे. अशा पद्धतीने आपण शरीराचे पोषण करू शकतो. 

सर्व पोषकतत्त्वे उत्तम प्रकारे हव्या त्या पद्धतीने मिळत राहिल्यास आपले शरीर तंदुरुस्त राहीलच; पण त्यासोबत मेंदूचीही कार्यक्षमता वाढेल. चांगल्या आचार-विचारांसाठी सात्त्विक अन्न लागते. त्यामुळे मनाचे सात्त्विक पोषण होईल. जन्मापासून २१ वर्षांपर्यंतचे पोषण हे शारीरिक व मानसिक वाढ, मेंदूची तल्लखता, भावनिक वाढ, अशा अनेक वाढींशी संबंधित आहे. पुढे लग्न झाल्यावर चाळिशीपर्यंत जननसंस्थेसंबंधीचे पोषण महत्त्वाचे आहे. आयुर्वेदात तर याला विशेष महत्त्व आहे. आज अनेक विवाहित जोडप्यांना मूल होण्यास अडचणी येताना दिसतात. त्याची अनेक कारणे असली, तरीही काही पोषणमूल्यांचा लहानपणापासून असणारा अभाव हेदेखील त्याचे एक कारण आहे. 

चाळिशीनंतर महिलांच्या रजोनिवृत्तीच्या काळातील पोषण खूपच महत्त्वाचे आहे. लोह, कॅल्शियम, ई, क, ड जीवनसत्त्वे आदींचा अभाव ९० टक्के स्त्रियांमध्ये सरसकट पाहायला मिळतो. थायरॉइड ग्रंथीच्या कार्यात आयोडीन या खनिजाचे महत्त्वाचे कार्य आहे; पण आज अनेक स्त्रियांना हायपर किंवा हायपोथायरॉइडचा त्रास असतो. हाडांची ठिसूळता, स्नायूंचे आकुंचन-प्रसरण होण्याची क्षमता, मानसिक अस्वास्थ्य, इत्यादी त्रास आजकाल सर्वसामान्य आहेत. प्रत्येक त्रासासाठी (म्हणजे त्रास न होण्यासाठी) काय पोषण असावे हे सांगणे अवघड असले, तरीही वर सांगितल्याप्रमाणे सर्व अन्नघटकांचा आलटून-पालटून आहारात समावेश असणे व संतुलित आहार हेच त्याचे उत्तर आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे चाळिशीत सुरू झालेल्या त्रासाचे कारण हा खरे तर पाच-सहा वर्षांपूर्वी सुरू झालेल्या कुपोषणाचा परिणाम असतो. त्यावर अॅलोपॅथीसारखा तातडीने उपाय होत नाही. एकसष्टीचा मोठा वाढदिवस साजरा करताना पहिल्या शुभेच्छा या आरोग्यसंपन्नतेसंबंधी असतात अन मग इतर शुभेच्छा. कारण पूर्वीपेक्षा आता आरोग्याच्या तक्रारींमध्ये खूपच वाढ झाली आहे. 

ही सगळी परिस्थिती पाहता, नियमित संतुलित आहार, व्यायाम, भरपूर पाणी, चाळिशीनंतर काही आरोग्यविषयक चाचण्या करणे आवश्यकच असते. मनाच्या पोषणासाठी उत्तम विचार असलेल्या लोकांशी मैत्री, उत्तम पुस्तके, ध्यान, प्राणायाम, उत्तम विचारांचे आदानप्रदान, छंद जोपासणे, चिडचिड, थकवा, मानसिक तणाव येणाऱ्या गोष्टींपासून लांब राहणे आवश्यक आहे. शरीराने शक्य नसल्यास मनाने तरी या त्रासदायक गोष्टींपासून दूर राहणे शक्य आहे. यासाठी सकारात्मक प्रयत्न हवेत. हेच मनाचे पोषण होय. 

- आश्लेषा भागवत
मोबाइल : ९४२३० ०८८६८ 
ई-मेल : ashlesha0605@gmail.com

(लेखिका पुण्यातील आहारतज्ज्ञ आहेत.) 
 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Mahesh Gadre About 316 Days ago
Well written !
0
0
Tai About 316 Days ago
Mast मनाच्या पोषणा विषयी अजून थोडे हवे असे वाटते
0
0

Select Language
Share Link