Next
भा. रा. भागवत, वि. भा. देशपांडे, उत्तम कांबळे
BOI
Thursday, May 31 | 03:45 AM
15 0 0
Share this story

एकीकडे फास्टर फेणे, बिपिन बुकलवार आणि नंदू नवाथे यांसारख्या मानसपुत्रांच्या एकाहून एक विलक्षण धमाल साहसकथा लिहिताना, दुसरीकडे ज्यूल्स व्हर्न, रॉबर्ट लुई स्टीव्हन्सन, मार्क ट्वेन, लुई कॅरोल, आर्थर कॉनन डॉयल, हॉवर्ड पाईल, रॅबिले, जॉन रुडॉल्फ वाइज आणि चार्ल्स डिकन्ससारख्या ग्रेट लेखकांच्या जागतिक कीर्तीच्या कादंबऱ्यांची स्वैर भाषांतरं करून बच्चेकंपनीवर कायमस्वरूपी गारूड करणारे भा. रा. भागवत, नाट्यविषयक पुस्तकांसाठी प्रसिद्ध असणारे वि. भा. देशपांडे आणि पत्रकार आणि लेखक उत्तम कांबळे यांचा ३१ मे हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी...
......
भास्कर रामचंद्र भागवत 

३१ मे १९१० रोजी इंदूरमध्ये जन्मलेले भास्कर रामचंद्र म्हणजेच भा. रा. भागवत हे बाळगोपाळांचे सर्वांत लाडके आणि मराठी बालसाहित्यकारांमधले सर्वांत लोकप्रिय लेखक व अनुवादक! मराठी बाळगोपाळांचं भावविश्व समृद्ध करण्यात त्यांच्याइतकी भरीव कामगिरी दुसऱ्या कोणत्याच साहित्यिकाने केली नसेल! बच्चेकंपनीची नस अचूक पकडून त्यांना भावेल, आपली वाटेल अशी वाक्यरचना त्यांना उत्तम जमायची आणि त्यामुळे ते बच्चेकंपनीचे खूप जवळचे लेखक बनले होते.

एकीकडे फास्टर फेणे, बिपिन बुकलवार आणि नंदू नवाथे यांसारख्या त्यांच्या मानसपुत्रांच्या एकाहून एक विलक्षण धमाल साहसकथा, तर दुसरीकडे ज्यूल्स व्हर्न, रॉबर्ट लुई स्टीव्हन्सन, मार्क ट्वेन, लुई कॅरोल, आर्थर कॉनन डॉयल, हॉवर्ड पाईल, रॅबिले, जॉन रुडॉल्फ वाइज आणि चार्ल्स डिकन्ससारख्या ग्रेट लेखकांच्या जागतिक कीर्तीच्या कादंबऱ्यांचे मराठी अनुवाद किंवा स्वैर भाषांतरं आणि त्याबरोबर पूर्णपणे स्वतंत्र अशा - भुताळी जहाज, ब्रह्मदेशच खजिना, खजिन्याच्या बेटांवर संजूराजू, खजिन्याचा शोध - यांसारख्या धमाल कादंबऱ्यांमुळे भागवतांनी बच्चेकंपनीवर केव्हाच कायमस्वरूपी गारूड केलं होतं. 

अगदी बालवयातच लेखनाला सुरुवात करणाऱ्या भागवतांनी पुढे पत्रकारिताही केली. सुरुवातीला त्यांचे माझा विक्रम, वैतागवनातील वाफारे असे विनोदी कथासंग्रह प्रसिद्ध झाले होते. त्यांनी बाळगोपाळांसाठी ‘बालमित्र’ नावाचं पाक्षिकही चालवलं होतं. बालपणापासूनच इंग्लिश साहित्याची आवड जोपासल्यामुळे त्यातूनच त्यांनी पुढे मुलांना भावेल असंच उत्तमोत्तम इंग्लिश साहित्य मराठीमध्ये अनुवादित केलं.

आनंदी आनंद गडे, असे लढले गांधीजी, एक होते सरोवर, भटांच्या वाड्यातील भुतावळ, ढोरगावचा चोर, दुर्मिळ तिकिटाची साहसयात्रा, हजीबाबाच्या गोष्टी, हरीण बालक, झपाटलेला प्रवासी, जंगल बुकातली दंगल, खजिन्याचा शोध, मूर्तीच्या शोधात मोना, नंदू करतोय मोत्याची शिकार, उमलती कळी, भाराभर गवत यांसारखी त्यांची अनेक पुस्तकं प्रसिद्ध आहेत. 

२७ ऑक्टोबर २००१ रोजी त्यांचं निधन झालं.

(भा. रा. भागवत यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. ‘फास्टर फेणे’ चित्रपटाबद्दल वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
.............  

डॉ. विश्वनाथ भालचंद्र देशपांडे 

३१ मे १९३८ रोजी जन्मलेले डॉ. विश्वनाथ भालचंद्र म्हणजेच वि. भा. देशपांडे हे नाट्यकला आणि कलाकार यांच्यासंबंधी लेखन करणारे साहित्यिक आणि नाट्यसमीक्षक म्हणून ओळखले जातात. ते महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पदाधिकारीही होते. 

नाटक नावाचे बेट, नाट्यभ्रमणगाथा, निळू फुले, वारसा रंगभूमीचा, भावलेली नाटके, गाजलेल्या रंगभूमिका, मराठी कलाभिरुची, मराठी नाटक - नाटककार काळ आणि कर्तृत्व (३ खंड), मराठी नाटक : स्वातंत्र्योत्तर काळ (१९४७-१९९०), मराठी नाटक आणि रंगभूमी : पहिले शतक, मराठी नाट्यकोश, माझा नाट्यलेखन दिग्दर्शनाचा प्रवास, नाटकातली माणसं, नाटकीय वेध, नाटककार खानोलकर, नाट्यपंचम, नाट्यमित्र, नाट्यरंग, नाट्यव्यक्तिरेखाटन, निवडक नाट्यप्रवेश (सामाजिक), निवडक नाट्यप्रवेश (पौराणिक), स्मरणगंध, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

त्यांना नाट्यगौरव पुरस्कार, नाट्यदर्पण पुरस्कार, माधव मनोहर पुरस्कार, रंगत संगत सन्मान, वि. स. खांडेकर नाट्यसमीक्षक पुरस्कार, तसंच पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांचे पुरस्कार लाभले आहेत. 

नऊ मार्च २०१७ रोजी त्यांचा पुण्यात मृत्यू झाला.

(वि. भा. देशपांडे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)
.........

उत्तम कांबळे
 
३१ मे १९५६ रोजी टाकळीवाडीमध्ये (कोल्हापूर) जन्मलेले उत्तम कांबळे हे पत्रकार आणि साहित्यिक म्हणून प्रसिद्ध आहेत. अत्यंत खडतर परिस्थितीला तोंड देत त्यांनी आपलं शिक्षण पूर्ण केलं होतं. सकाळ वृत्तपत्रामध्ये बातमीदार ते संपादक अशा विविध पदांवर काम करत असतानाच त्यांचं लेखन बहरलं. 

आई समजून घेताना, अखंड घालमेल, अनिष्ट प्रथा, आरपार कॉम्रेड, अव्यक्त माणसांच्या कथा, बुद्धाचा ऱ्हाट, देवदासी आणि नग्नपूजा, एक पोकळी असतेच, एका स्वागताध्यक्षाची डायरी, जगण्याच्या जळत्या वाटा, जागतिकीकरणात माझी कविता, कथा माणसांच्या, कावळे आणि माणसं, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे. 

१९८४ साली ठाण्यात झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. त्यांनी इतरही अनेक साहित्य संमेलनांची अध्यक्षपदं भूषवली आहेत. 

त्यांना १९९३ सालचा दर्पण पुरस्कार मिळाला आहे. तसंच आंबेडकर लोकपत्रकारिता पुरस्कार, आशादीप पुरस्कार, मुंबई मराठी पत्रकार संघाचा पुरस्कार, प्रबोधनमित्र पुरस्कार, महाराष्ट्र गौरव पुरस्कार लोकजागर पुरस्कार समता पुरस्कार, डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती पुरस्कार असे विविध संस्थांचे पन्नासहून अधिक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत. 

(उत्तम कांबळे यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link