Next
‘विकासाच्या मुद्द्यावरच ‘भाजप’ नगर महापालिका सर करणार’
प्रेस रिलीज
Wednesday, November 28, 2018 | 04:01 PM
15 0 0
Share this article:

अहमदनगर : ‘केंद्रातील आणि राज्यातील भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सरकारने केलेल्या पारदर्शी कारभारामुळे अहमदनगर महापालिकेतही ‘भाजप’ची सत्ता आल्यास विकासाच्या अनेक वाटा खुल्या होणार आहेत. विकासाच्या दृष्टीने येथे करण्यात आलेल्या सर्व बाबी लक्षात घेता या निवडणुकीत तरुण मतदार ‘भाजप’लाच विजयी करतील आणि विकासाच्या मुद्द्यावरच ‘भाजप’ नगर महापालिका सर करेल,’ असा विश्वास खासदार दिलीप गांधी यांनी व्यक्त केला.

नगर महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून, ‘भाजप’ने येथे जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजप सरकारने येथे केलेल्या कामांचा आढावा खासदार गांधी यांनी घेतला. ते म्हणाले, ‘गेली कित्येक वर्षे महापालिका क्षेत्रात राहूनही पुरेसे पाणी, चांगले रस्ते, आणि मुलभूत सुविधांपासून वंचित राहिलेल्या नगरकरांना आता बदल हवा आहे. विशेषत: तरुण मतदारांमध्ये बदलाबाबत चर्चा होताना दिसत आहे. ‘भाजप’ने सध्या देशात आणि राज्यात विकास हाच प्रमुख मुद्दा घेऊन सुरू केलेल्या राजकारणाचे नगरमधील मतदारांनाही आकर्षण असून, अहमदनगर महापालिकेचा कारभारही त्याच पद्धतीने व्हावा, अशी अपेक्षा सर्वसामान्य मतदारांमधून व्यक्त केली जात आहे.’

‘उच्च शिक्षण घेऊन स्मार्ट होत असलेल्या आणि स्मार्ट फोन वापरणाऱ्या तरुण पिढीला नगर शहराचा कायापालट व्हावा अशी मनोमन इच्छा आहे. स्मार्ट पिढीच्या या अपेक्षांना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वात प्रथम सकारात्मक प्रतिसाद दिला असल्याचे गांधी यांनी नमूद केले.

ते म्हणाले, ‘उच्चविद्याविभूषित तरुणाईला अधिकाधिक रोजगार मिळावेत यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया यांसारखे उपक्रम धडाक्याने राबवण्यास सुरुवात केली आहे. महिला, शेतकरी, युवक हा विकासाचा केंद्रबिंदू मानून केंद्र आणि राज्यातील ‘भाजप’ सरकारने अनेक योजना राबविल्या. त्याच्या परिपाक म्हणून भारत ही जगातील सहाव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनली आहे. इतर महापालिकांमध्ये विशेषत: ‘भाजप’ची सत्ता असलेल्या शहरांमध्ये दिसत असलेले विकासाचे हे चित्र आता नगरमधील तरुण मतदारांनाही आकर्षित करू लागले आहे. आगामी महापालिका निवडणूक फक्त नागरी पायाभूत सुविधांच्या चर्चेपुरती मर्यादित न राहता या निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिक्षण, रोजगार आणि आरोग्य यांसारख्या प्रश्नांचाही विचार व्हावा, अशी अहमदनगर येथील युवक वर्गाची इच्छा आहे. शहर आणि आसपासच्या परिसराचा विकास होण्याची प्रक्रिया अधिक व्यापक व्हावी, अशी या तरुणांची अपेक्षा आहे.’

‘शहर चहुबाजूने विस्तारत असल्याने पायभूत सुविधांची उभारणी करण्याचे मोठे आव्हान महापालिकेसमोर असणार आहे. हे सर्व आव्हान यशस्वीपणे पेलण्यासाठी तेवढ्याच सक्षम नेतृत्वाची गरज आहे. ‘भाजप’च्या स्थानिक नेतृत्वात ती क्षमता आहे; मात्र दुर्दैवाने आतापर्यंत ‘भाजप’ला महापालिकेत स्वबळावर नेतृत्व करण्याची संधी मिळालेली नाही; मात्र आता केंद्रातील, तसेच राज्यातील ‘भाजप’च्या नेतृत्वाखालील सरकारने केलेल्या पारदर्शी कारभारामुळे नगर महापालिकेतही ‘भाजप’ची सत्ता आल्यास विकासाच्या अनेक वाटा खुल्या होऊ शकतील, असे या तरुणाईला वाटणे स्वाभाविक आहे,’ असे गांधी सांगितले.

‘गेल्या काही दिवसांत मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांमुळे नगरपासून २५ किलोमीटर अंतरावरील पारनेर तालुक्यातील सुपा गाव आता औद्योगिक हब होण्याच्या दिशेने वाटचाल करू लागले आहे. त्यांच्या प्रयत्नातूनच या परिसरात अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांनी गुंतवणुकीला सुरुवात केली आहे. त्यामुळे या परिसरातील रोजगार वाढणार आहे. या सर्व बाबी लक्षात घेता यंदाच्या निवडणुकीत नगरमधील तरुण मतदार ‘भाजप’लाच विजयी करेल,’ असा विश्वास खासदार गांधी यांनी व्यक्त केला.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search