Next
‘सीप’ तर्फे सातव्या ‘पुणे कनेक्ट’चे आयोजन
‘फ्युचर ऑफ वर्क’ ही यंदाची संकल्पना
BOI
Friday, October 19, 2018 | 04:54 PM
15 0 0
Share this article:

पुणे : येथील ‘सॉफ्टवेअर एक्सपोर्टर्स असोसिएशन ऑफ पुणे’ अर्थात ‘सीप’ यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी ‘पुणे कनेक्ट’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. उपक्रमाचे हे सातवे वर्ष असून, येत्या शनिवारी, दि. २० ऑक्टोबर रोजी कोरेगाव पार्क येथील हॉटेल वेस्टीन येथे हा कार्यक्रम पार पडणार आहे.

पुणे शहराच्या दृष्टीने उपयुक्त तंत्रज्ञानप्रणाली, त्यांचा संभाव्य ग्राहक, गुंतवणूकदार, भागीदार, सल्लागार आणि इतर सहयोगी संस्था यांनी एकत्र येत काहीतरी भरीव कामगिरी करावी या उद्देशाने ‘पुणे कनेक्ट’ या उपक्रमाला २०११ पासून सुरुवात झाली. सध्या कोणत्याही व्यावसायिक क्षेत्राचा विचार केला तर त्यावर डिजिटल तंत्रज्ञानाचा प्रभाव हा मोठ्या प्रमाणात असल्याचे लागलीच जाणवते. याच बाबींचा लक्षपूर्वक विचार करीत या वर्षी ‘पुणे कनेक्ट’ या उपक्रमासाठी डिजिटल टेक्नॉलॉजी अर्थात डिजिटल तंत्रज्ञान हा मुद्दा केंद्रस्थानी घेण्यात आला आहे. त्यानुसार ‘पुणे कनेक्ट’ उपक्रमामध्ये टेक स्टार्टअपमधील लहान, मोठ्या आणि मध्यम आकाराच्या कंपन्यांचा समावेश करण्यात आला आहे.

या विषयी माहिती देताना सीपचे उपाध्यक्ष व पुणे कनेक्टचे समन्वयक प्रशांत के. एस म्हणाले, ‘फ्युचर ऑफ वर्क’ ही या वर्षीच्या ‘पुणे कनेक्ट’ची संकल्पना असून, या अंतर्गत हा उपक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहोत. उपक्रमासाठी चार विषय घेण्यात आले असून, त्यामध्ये लीडरशीप (नेतृत्व), टेक्नॉलॉजी (तंत्रज्ञान), रिसर्च आणि इनोव्हेशन (संशोधन व नूतनीकरण) व स्टार्ट अप यांचा समावेश आहे. यामध्ये अनुभवी व्यावसायिक नेतृत्व, उद्योजक, संशोधक, शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञ हे सध्याची डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन्सच्या नवीन कल्पना कशा हाताळाव्यात, ब्लॉकचेन आणि डेटा एंटरप्रायझेसचे अॅप्लीकेशन्स, उद्योग - शैक्षणिक सहकार्याने नेतृत्व, संशोधन आणि नवकल्पना यांचा बदलणारा चेहरा आणि सामाजिक विकासात तंत्रज्ञानाचा सहभाग या विषयांवर मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत.’

‘या वर्षीची पुणे कनेक्ट उपक्रमाची ही सातवी आवृत्ती ही आमच्यासाठी महत्त्वाची आहे, कारण सीप यावर्षी २० व्या वर्षात पदार्पण करीत आहे. डिजिटल जगामध्ये क्रांती घडवून आणणाऱ्या ‘स्टार्टअप्स’ना प्रोत्साहन आणि पाठींबा देणे, तसेच पुण्याला तंत्रज्ञानावर आधारीत नाविन्यपूर्ण उद्योगांचे जागतिक दर्जाचे केंद्र बनविणे हा ‘पुणे कनेक्ट’ या उपक्रमाचा उद्देश आहे. गेली वीस वर्षे पुणे शहराच्या तंत्रज्ञान विषयक इकोसिस्टीमच्या वृद्धीसाठी सीप प्रयत्नशाली असून त्यासाठी सर्वोतोपरी सहकार्य करण्यास नेहमीच तयार असते’, असे सीपचे अध्यक्ष समीर सोमण यांनी नमूद केले.

‘पुणे कनेक्ट’ या उपक्रमामध्ये जागतिक संशोधन केंद्रे, माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील सेवा देणाऱ्या कंपन्या, गुंतवणूकदार, शैक्षणिक संस्था, तसेच उत्पादन, सेमी कंडक्टर आणि दूरसंचार क्षेत्रातील अभियांत्रिकी संशोधन व विकास केंद्रे यांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असतो. भविष्यात तंत्रज्ञान आणि उपाय तसेच संपर्क वाढविण्याची संधी म्हणून ‘पुणे कनेक्ट’ या उपक्रमाकडे पथदर्शी उपक्रम म्हणून पहिले जाते. 

‘पुणे कनेक्ट २०१८’ या उपक्रमासंदर्भात अधिक माहिती www.puneconnect.com या संकेतस्थळावर मिळू शकेल. या उपक्रमात सहभागी होण्यासाठी पूर्वनोंदणी आवश्यक असून, त्यासाठी इच्छुकांनी वरील संकेतस्थळावर संपर्क साधावा, असे आवाहन सीपच्या वतीने करण्यात आले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search