मुलांच्या बदलत्या वागण्याकडे पालकांनी वेळीच लक्ष देणं खूप महत्त्वाचं असतं. त्यातही त्याला समजावण्याची आणि योग्य गोष्टी शिकवण्याची त्या दोघांचीही पद्धत सारखीच असावी याचं कटाक्षानं पालन केलं पाहिजे, अन्यथा मुलांना त्या गोष्टीचं गांभीर्य राहत नाही... ‘मनी मानसी’ सदरात या वेळी पाहू या मुलांच्या वर्तनसमस्येबद्दल...
..........................
माझ्या ओळखीचे एक शिक्षक एक दिवस मला भेटायला आले. सुरुवातीला थोड्या गप्पा झाल्या. त्यानंतर त्यांनी त्यांच्या कॉलेजमधल्या एका विद्यार्थ्याबद्दल म्हणजेच अभिमानबद्दल बोलायला सुरुवात केली. मागच्या वर्षी ११वीत असताना अभिमान त्यांच्या वर्गात आला. सुरुवातीला तो त्यांना अगदी शांत आणि समजुतदार वाटायचा. त्यांनी सांगितलेलं प्रत्येक काम तो तत्परतेनं करायचा. कधी टाळाटाळ नाही, की आळशीपणा नाही. त्यामुळे सरांना अभिमानचं खूप कौतुक होतं.

कॉलेजमध्ये तो नवीन होता तोपर्यंत म्हणजेच जेमतेम सहा महिनेच त्याचं हे चांगलं वागणं टिकलं. नंतर हळू हळू त्याचं गैरहजेरीचं प्रमाण वाढू लागलं, तो अभ्यासात मागे पडू लागला, त्याचं गैरवर्तन वाढलं आणि पाहता पाहता तो पूर्णच बदलून गेला. सरांनी त्याला खूप समजावलं, पण अभिमान जेमतेम दोन-तीन दिवस नीट वागायचा, की पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. शेवटी त्याची काळजी वाटल्यानं त्यांनी अभिमानच्या वडिलांना फोन केला. फोनवरील एकूण संवादातुनच सरांच्या लक्षात आलं, की वडिलांचं त्याच्याकडे विशेष लक्ष नाही. त्यांची फोनवरची उत्तरं उडवा-उडवीची होती. त्यामुळे सरांनी पुन्हा त्याला समजावण्याचा प्रयत्न केला. परंतु त्याचा काहीच उपयोग झाला नाही. या साऱ्या प्रयत्नांत ११वीचं वर्ष असंच निघून गेलं. अभिमान जेमतेम ३५ टक्क्यांनी पास झाला. इतके कमी मार्क मिळूनही त्याच्या वागण्यात मात्र काहीच बदल झाला नाही. आता काय करावं, हे न कळल्याने सर भेटायला आले होते.
सरांचं सगळं बोलणं ऐकल्यावर असं जाणवलं, की अभिमानच्या कुटुंबातच काहीतरी समस्या असावी, पण त्याबाबच मिळालेली माहिती इतकी अपूर्ण होती, की निश्चित निदान करणं अशक्य होतं. मी सरांना त्याला भेटायला पाठवायला सांगितलं. तो एकटा येणार नाही याची सरांना खात्री असल्यानं, एक दिवस ते स्वतःच अभिमानला घेऊन आले. त्याला ओळख करून देऊन आत पाठवले व ते बाहेर बसले.
ते त्याला अचानकच घेऊन आल्याने तो जरा घाबरला होता. म्हणून सुरुवातीला थोड्या गप्पा मारून त्याचा ताण दूर केला आणि मग भेटीमागील कारण सांगितलं. त्या संपूर्ण सत्रात तो फार बोलला नाही, म्हणून त्याला पुन्हा भेटायला येण्यास सांगितलं. पुढील दोन्हीही वेळेस सरंच त्याला घेऊन आले. परंतु दुसऱ्या सत्रातही तो काहीच बोलला नाही. सरांनी पुर्वी सांगितलेलं त्याचं सगळं वर्तन सत्रादरम्यान लक्षात येत होतं. तो प्रतिसाद देत नसल्यानं सरांनी आणि मी अभिमानच्या पालकांना फोन करून भेटण्यासाठी बोलावून घेतलं. सुरुवातीला त्यांनी टाळाटाळ केली, परंतु नंतर भेटायला येण्याची तयारी दाखवली आणि पुढच्या आठवड्यात अभिमानचे आई-बाबा भेटायला आले.

भेट झाल्यावर प्रथम त्यांना अभिमानच्या अयोग्य वर्तनाची जाणीव आहे का हे जाणून घेतलं. या चर्चेतून असं लक्षात आलं, की अभिमान आठवीपासूनच असा वागायला लागला होता. त्याच्या या वागण्याला जरब बसावी म्हणून वडील त्याच्याशी जरा कडक वागत होते. सुरुवातीला याचा उपयोग झाला, परंतु नंतर अभिमान वडिलांचंदेखिल ऐकेनासा झाला. वडील ओरडायला लागले, किंवा काही सांगायला लागले की तो घरातून निघून जाण्याच्या धमक्या द्यायचा. चिडून घरातून निघून जायचा, दिवस-दिवस घराबाहेर राहायचा. त्यामुळे वडिलांनी त्याच्याशी बोलणं सोडून दिलं. त्यामुळे नंतर आई त्याला समजावून सांगायची, पण आईचा स्वभाव फारच शांत असल्यानं अभिमान तिचंही ऐकत नव्हता. वडील रागावले आणि अभिमान चिडला, की आई वडिलांना शांत राहायला सांगायची आणि अभिमानला पाठीशी घालायची.
अशी अनेक उदाहरणं हल्ली ऐकायला मिळतात. अभिमानच्या बाबतीत सांगायचं झालं, तर पालकांमध्ये नसलेली एकवाक्यता आणि त्याचे अभिमानच्या वर्तनावर झालेले परिणाम, त्यामुळे त्याच्या वर्तनात आलेली बेफिकीरी आणि वेळीच नियोजन न केल्याने त्याच्या समस्यांमध्ये झालेली वाढ ही समस्या लक्षात आली. यानुसार अभिमानच्या पालकांनाही सत्रादरम्यान या समस्येची, त्याच्या तीव्रतेची आणि भविष्यातील संभाव्य धोक्यांची जाणीव करून दिली, तसंच त्यावरील उपयांबाबतही मार्गदर्शन केलं आणि अपेक्षित बदलही सुचवले. यानंतर काही महिन्यांनी अभिमानचे वडील स्वतःहून भेटायला आले आणि त्यांनी सांगितलं, की सुरुवातीला तुम्ही सुचवलेल्या बदलांप्रमाणे वागताना अभिमानने खूप विरोध केला, पण आम्ही सातत्यानं तसंच वागत राहिल्यानं आता त्याच्यात हळू हळू बदल दिसून येत आहेत.
(केसमधील नाव बदलले आहे.)
- मानसी तांबे - चांदोरीकर
ई-मेल : tambe.manasi11@gmail.com
(लेखिका पुण्यात समुपदेशक म्हणून कार्यरत आहेत. ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर दर शनिवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘मनी मानसी’ लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/a3SDSr या लिंकवर उपलब्ध आहेत.)