Next
‘सवाई’चा तिसरा दिवस तरुणांचा
BOI
Saturday, December 16 | 11:52 AM
15 0 0
Share this story

पंडित उल्हास कशाळकरपुणे : ६५व्या वर्षातील सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचा तिसरा दिवस (१५ डिसेंबर) तरुण तुर्कांनी गाजविला आणि पंडित उल्हास कशाळकरांच्या घरंदाज गायकीने त्यावर कळस चढविला.

‘सवाई’चा तिसरा दिवस तरुणांचा होता, असे म्हटल्यास अगदीच योग्य ठरेल, इतका तरुण कलाकारांचा वावर स्वरमंचावर दिसून आला. तिसऱ्या दिवसाची सुरुवात गायिका गायत्री जोशी यांनी केली. आरती अंकलीकर-टिकेकर यांच्या शिष्या असलेल्या गायत्री यांना घरातूनच गाण्याचा वारसा लाभला आहे. २००३ साली तानपुरा वाजविण्यासाठी या स्वरमंचावर पाय ठेवलेल्या गायत्री आज १४ वर्षांनंतर स्वतः गायनासाठी तेथे उपस्थित झाल्या. त्यांनी राग मधुवंतीने आपल्या गायनास सुरुवात केली. पुढे ‘पिया बिन मोरे’ व ‘काहे मन करो’ या रचना सादर करून त्यांनी रसिकांची दाद मिळविली. त्यांना अजिंक्य जोशी (तबला), सागर कुलकर्णी (हार्मोनियम) व संतोष बोराडे (टाळ) यांनी साथसंगत केली. ‘म्हारे घर आओजी’ ही मीराबाईची रचना सादर करून त्यांनी रसिकांना भक्तिरसात न्हाऊ घातले. वडील शंकरराव वैरागकर यांच्या ‘येई पांडुरंग’ या रचनेने त्यांनी सादरीकरणाचा शेवट केला.

कुशल दासपहिल्या सत्रातील मधुर आवाजाच्या सादरीकरणानंतर कुशल दास यांच्या सतारीने स्वरमंच ताब्यात घेतला.  यांचाही ‘सवाई’तील हा पहिलाच परफॉर्मन्स होता. मोठ्या हुशारीने राग मारवा निवडत त्यांनी सुरुवात केली. अर्थातच काही क्षणांतच त्यांनी रसिकांची मने जिंकली, हे वेगळे सांगण्याची गरज नाही. मुळातच सुंदर दिसणाऱ्या सतारीच्या स्वरांनी अवघा मंडप झंकारून टाकला. एकूणच श्रोत्यांना स्वरांची विलक्षण अनुभूती देत, कुशल दास यांनी स्वरमंचाचा निरोप घेतला.

सम्राट पंडितदिवसाच्या द्वितीय सत्राची सुरुवात पतियाळा घराण्याचे युवा गायक सम्राट पंडित यांच्या गायनाने झाली. राग ‘गोरख कल्याण’ने सुरुवात करून त्यांनी केलेल्या बहारदार गायनाला श्रोत्यांची उत्स्फूर्त दाद मिळाली. प्रख्यात तबलावादक पं. रामदास पळसुले (तबला),  दिलशाद खाँ (सारंगी), डॉ. राजेश्री महाजनी आणि प्रलय मंडल (तानपुरा) यांनी त्यांना समर्थ अशी साथसंगत केली. नंतर त्यांनी ‘मारे सय्या’ ही बंदिश सादर केली व मिश्र खमाज रागातील ठुमरीने आपल्या सादरीकरणाची सांगता केली.

गायत्री जोशीदिवसाचे सर्वांत मोठे आकर्षण असलेले पंडित उल्हास कशाळकर यांचे शेवटच्या टप्प्यात स्वरमंचावर आगमन झाले. त्यांना साथसंगत करत असलेल्या कलाकारांची ओळख करून देताना निवेदक आनंद देशमुख यांनी तालयोगी पंडित सुरेश तळवलकर यांच्या व कशाळकर यांच्या मैत्रीबाबत बोलतानाच पुढील वर्षीच्या ‘थीम कॅलेंडर’चा विषय सुचवत असल्याची मिश्किल टिप्पणी केली. जयपूर, ग्वाल्हेर व आग्रा या तिन्ही घराण्यांच्या गायकीचा सुरेल मिलाफ असलेल्या त्यांच्या गायकीने रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकले. त्यांनी राग ‘नंद’ने आपल्या गायनास सुरुवात करून विलंबित व द्रुत त्रितालातील रचना सादर केल्या. ज्येष्ठ तबलावादक तालयोगी पं. सुरेश तळवलकर (तबला), श्रीराम हसबनीस (हार्मोनियम), समर्थ नगरकर आणि सौरभ नाईक (तानपुरा) यांनी त्यांना साथसंगत केली. ज्येष्ठ गायक पं. उल्हास कशाळकर यांच्या अद्वितीय गायनाने सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाच्या तिसऱ्या दिवसाचा समारोप झाला.

(तिसऱ्या दिवशीच्या सादरीकरणांची झलक दाखविणारे व्हिडिओ सोबत देत आहोत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link