Next
‘महाराष्ट्रातील टॅलेंट एकाच मंचावर पाहणे ही प्रेक्षकांसाठी अनोखी पर्वणी’
प्रेस रिलीज
Thursday, June 27, 2019 | 04:53 PM
15 0 0
Share this article:

‘स्टार प्रवाह’ वाहिनीवर येत्या पाच जुलैपासून ‘एक टप्पा आउट’ हा नवा कॉमेडी शो सुरू होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून अस्सल विनोदवीरांचा शोध या कार्यक्रमातून घेतला जाणार आहे. कॉमेडीचा बादशाहा जॉनी लिवर, मराठीतले दोन दिग्गज कलाकार निर्मिती सावंत आणि भरत जाधव हे महाराष्ट्रात दडलेल्या या हिऱ्यांना पैलू पाडण्याचे काम करणार आहेत. याच कार्यक्रमाच्या निमित्ताने अभिनेत्री निर्मिती सावंत यांच्याशी साधलेला हा खास संवाद...
------------------------------------------------------------------
* ‘एक टप्पा आउट’ या कार्यक्रमाचे वेगळेपण काय सांगाल?
- स्टॅंडअप कॉमेडी आणि थक्क करायला लावणारी स्पर्धकांची गुणवत्ता हे या शोचे वेगळेपण म्हणता येईल. एकतर बरीच वर्षे आपण फक्त स्किट्स बघत आलोय. खूप दिवसांनंतर आपण स्टॅंडअप कॉमेडी पाहणार आहोत. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे स्टॅंडअप कॉमेडीचा बादशहा जॉनी लिवर आणि महाराष्ट्राला खळखळून हसवणारा अभिनेता भरत जाधव हे या शोचे परीक्षण करणार आहेत. त्यामुळे या शोसाठी परीक्षक म्हणून विचारणा झाली तेव्हा मी लगेचच होकार कळवला. या शोच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रातील टॅलेंट एकाच मंचावर येणार असल्यामुळे प्रेक्षकांसाठी अनोखी पर्वणी असेल.

* स्पर्धकांविषयी काय सांगाल? त्यांना काही खास टिप्स दिल्या आहेत का?
- ‘एक टप्पा आउट’च्या निमित्ताने मला खूप गोष्टी शिकायला मिळत आहेत. मी अपग्रेड होतेय असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. स्पर्धकांचा उत्साह आणि गुणवत्ता खरोखर थक्क करणारी आहे. या कार्यक्रमाचा पहिला भाग शूट झाला आहे. हा भाग प्रत्यक्ष जज केल्यानंतर हा शो स्वीकारण्याचा माझा निर्णय योग्य होता असे मला वाटते. प्रत्येक स्पर्धकाची वेगळी अशी खासियत आहे. ‘आंबटगोड’ मालिकेनंतर खूप वर्षांनी ‘स्टार प्रवाह’सोबत काम करत असल्याचा प्रचंड आनंद आहे. एपिसोडच्या पहिल्या दिवशी ‘स्टार प्रवाह’कडून खूप छान स्वागत झाले. हा जिव्हाळा आणि प्रेम असाच कायम राहो हीच इच्छा व्यक्त करेन.

* जॉनी लीवर, भरत जाधव आणि निर्मिती सावंत एकत्र एका मंचावर आल्यावर सेटवर नेमकी काय धमाल घडते?
- आम्हा तिघांचीही खूप छान गट्टी जमलीय. प्रत्येक स्कीटनंतर जॉनीभाई जे कमेंट्स देतात तेव्हा त्या सोबतच काहीतरी सादर करून दाखवतात जे मला खूप आवडते.  सेटवरचे वातावरणच बदलून जाते. त्यामुळे या शोला खूप वेगळी लज्जत आली आहे. आतापर्यंत जॉनी भाईंना आपण वेगवेगळ्या सिनेमांमधून, कार्यक्रमांमधून पाहात आलोय. विनोदाच्या बादशहाला आता ‘एक टप्पा आउट’मधून भेटणे म्हणजे पर्वणी असेल.

*‘एक टप्पा आउट’ हे नावही खूप वेगळे आहे. त्याविषयी...?
- हो खरे आहे. क्रिकेटचा फिव्हर सध्या सगळीकडेच आहे. या फिव्हरमध्ये अगदी चपखल बसणारे हे नाव आहे. नवख्या स्पर्धकांना एका योग्य संधीची गरज असते. ‘स्टार प्रवाह’ने हे व्यासपीठ त्यांना उपलब्ध करून दिले आहे. त्यामुळे या संधीचा पुरेपुर फायदा करून घ्यावा असे दर्शवणारे ‘एक टप्पा आउट’ हे अगदी योग्य नाव आहे.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search