Next
‘उत्कृष्ट गुणवत्तेसाठी कौशल्य, प्रात्यक्षिके महत्त्वाची’
ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनचे नीरज कपूर यांचे प्रतिपादन
प्रेस रिलीज
Thursday, April 18, 2019 | 03:42 PM
15 0 0
Share this article:

‘बिझलॅब’च्या उद्घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन करताना नीरज कपूर. या वेळी डावीकडून कॅप्टन शालिनी नायर, डॉ. शैलेश कासंडे, सचिन इटकर, रवी चौधरी, डॉ. संजय चोरडिया, नीरज कपूर, आशिषकुमार, सुषमा चोरडिया.

पुणे : ‘सध्याचे युग कृत्रिम बुद्धिमता आणि कौशल्याधारित आहे. त्यामुळे तंत्रज्ञानाचे सार्वत्रिकरण व्हायला हवे. तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्याला व्यवसायात प्रगती साधता यावी, व्यावसायिक निर्णय क्षमता वाढावी, औद्योगिक क्षेत्राला तंत्रकुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे, तसेच विद्यार्थ्यांमध्ये उद्यमशीलतेला चालना मिळावी, यासाठी बिझनेस लॅबोरेटरी (बिझलॅब) उपयुक्त ठरणार आहे,’ असे प्रतिपादन ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या (आएमा) व्यवस्थापन विकास केंद्राचे संचालक नीरज कपूर यांनी केले.

‘बिझलॅब’च्या सामंजस्य कराराची देवाणघेवाण करताना डॉ. संजय चोरडिया व नीरज कपूर. या वेळी डावीकडून सुषमा चोरडिया, सचिन इटकर, डॉ. शैलेश कासंडे.

बावधन येथील सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटमध्ये ऑल इंडिया मॅनेजमेंट असोसिएशनच्या सहकार्याने व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांसाठी उभारलेल्या ‘आएमा बिझलॅब’च्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी स्ट्रैटर्जिक फोरसाइट ग्रुपचे वरिष्ठ सल्लागार सचिन ईटकर, सूर्यदत्ता ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया, संचालक शैलेंद्र कासंडे, संचालिका (जनसंपर्क) कॅप्टन शालिनी नायर, सामाजिक कार्यकर्ते रवी चौधरी, आशिषकुमार, उद्योग प्रतिनिधी स्वप्नील जोशी आदी उपस्थित होते. यावेळी ‘आएमा’ व ‘सूर्यदत्ता ग्रुप’ यांच्यात या ‘बिझलॅब’संदर्भात सामंजस्य करार झाला. या लॅबमध्ये १२८ संगणकांचा संच बसविण्यात आला आहे.

मार्गदर्शन करताना नीरज कपूर.कपूर म्हणाले, ‘व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेली ‘बिझलॅब’ ही एकमेव आभासी प्रयोगशाळा आहे. वैद्यकीय, अभियांत्रिकी व तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रयोगशाळांप्रमाणे प्रात्यक्षिकांवर आधारित शिक्षण देण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या साह्याने या लॅबची निर्मिती केली आहे. सॉफ्टवेअरचा वापर करून विद्यार्थी विविध प्रयोग करू शकतील, परिस्थितीनुसार व्यवस्थापन धोरण तयार करू शकतील. विद्यार्थ्यांना सतत नवनवीन गोष्टी शिकता याव्यात, यासाठी ‘आएमा बिझलॅब’मध्ये नाविन्यपूर्ण शिक्षण मिळणार आहे.’

‘पुढील काही दिवसांत देशभरात अशा सहा लॅब उभारण्यात येणार आहेत. कोईमतूर येथे देशातील पहिली, तर पुण्यातील ‘सूर्यदत्ता’ येथे दुसरी लॅब उभारली आहे. नोकरी, व्यवसाय करताना प्रत्यक्ष काम कसे असते, याचा आभासी अनुभव या लॅबमधून विद्यार्थ्यांना घेता येणार आहे. त्यामुळे व्यावसायिक निर्णय क्षमता विकसित होण्यासाठी याचा उपयोग होणार आहे,’ असे कपूर यांनी सांगितले.

‘बिझलॅब’च्या उद्घाटनप्रसंगी डॉ. संजय चोरडिया, नीरज कपूर, डॉ. शैलेश कासंडे, सचिन इटकर, रवी चौधरी, आशिषकुमार, सुषमा चोरडिया आदी.

डॉ. चोरडिया म्हणाले, ‘उद्योगजगात वावरण्यासाठी उत्कृष्ट उद्योजक, व्यावसायिक तयार करण्याचा ‘सूर्यदत्ता ग्रुप’चा प्रयत्न आहे. भारतीय परंपरा व पाश्चिमात्य तंत्रज्ञान याचा समतोल साधून उच्च दर्जाचे कौशल्य आणि संशोधनाभिमुख शिक्षण देण्याचा आमचा प्रयत्न आहे. या उपक्रमामुळे पहिल्यांदाच व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाधारित प्रात्यक्षिक शिक्षण घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. या लॅबमुळे विद्यार्थ्यांना उद्योगक्षेत्रात आवश्यक कौशल्य व ज्ञान मिळणार असल्याने ‘इंडस्ट्री रेडी’ मनुष्यबळ म्हणून ते बाहेर पडणार आहेत. त्याचबरोबर त्यांना उद्योजक होण्याची प्रेरणा आणि पाठबळही मिळणार आहे. अशा प्रकारची लॅब पहिल्यांदा आमच्या संस्थेत होते आहे, याचा अभिमान वाटतो.’

आशिष कुमार यांनी ‘आएमा बिझलॅब’विषयीची तांत्रिक माहिती दिली. ‘आएमा बिझलॅब’मुळे पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्ष परिस्थिती यांचा समतोल कसा साधावा, तसेच भविष्यातील विविध स्पर्धांना कसे सामोरे जावे, उद्योगासंदर्भातील आव्हाने कशी सोडवावीत आदी गोष्टी समजतील, असे त्यांनी नमूद केले. सचिन इटकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. कॅप्टन शालिनी नायर यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. प्रतीक्षा वाबळे यांनी आभार मानले.
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search