Next
स्वच्छ, सुंदर भिवंडीसाठी सरसावले चिमुकले हात...
शालेय मुलांनी केला भिवंडी पुनर्निर्माणाचा निर्धार...
प्रशांत सिनकर
Friday, January 18, 2019 | 02:02 PM
15 0 0
Share this story


ठाणे : भिवंडी म्हटले की, अस्वच्छता... खराब रस्ते... वाहतूक कोंडी.. प्रदूषण...असे चित्र डोळ्यासमोर उभे राहते. आपल्या शहराचे हे चित्र बदलून टाकण्याचा निर्धार केला आहे, तो इथल्या शाळेतल्या मुलांनी. स्वच्छ, सुंदर भिवंडीसाठी चिमुकले हात सरसावले आहेत. पॉलीमथ इंग्लिश हायस्कूलमधील मुलांनी या कामी पुढाकार घेत अन्य शाळांमधील विद्यार्थ्यांनादेखील या मोहिमेत सहभागी करून घेतले आहे. त्यांच्या या मोहिमेला मोठ्या माणसांचेही सहकार्य मिळत आहे. 


यासाठी येत्या रविवारी, २० जानेवारी २०१९ रोजी भिवंडी पुनर्निर्माण कार्निव्हलमध्ये एका चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले आहे. शाळेतील मुलांबरोबर शहरातील विविध क्षेत्रांतील तज्ज्ञ, लोकप्रतिनिधी, शासकीय अधिकारी, मुलांचे पालकदेखील चर्चेत सहभागी होत आहेत.
 
या आधी पॉलीमथ इंग्लिश हायस्कूल या पहिल्या केंब्रिज मान्यताप्राप्त शाळेतील मुलांनी शिक्षकांच्या मदतीने भिवंडीतील सर्व स्तरातील व्यक्ती, पालिका,पोलीस अधिकारी यांच्या भेटी घेतल्या. शहराबद्दल त्यांना काय वाटते, शहर बदलण्यासाठी काय करावे याबद्दलच्या त्यांच्या संकल्पना, योजना आदी विषयांवर मुलाखती घेतल्या. तिसरी ते सहावीच्या वर्गातील २० मुले या प्रकल्पात सहभागी झाली होते. भिवंडी शहराला लागलेला अस्वच्छतेचा, नियोजनशून्यतेचा डाग घालवण्यासाठी केवळ आपले प्रयत्न अपुरे आहेत, हे लक्षात आल्यावर या मुलांनी शहरातील अन्य वीसपेक्षा अधिक शाळांमधील मुलांशी संपर्क साधला. त्यातून या चर्चासत्राची कल्पना पुढे आली आणि त्याचे आयोजन करण्यात आले. रविवारी, २० जानेवारी २०१९ रोजी सायंकाळी ७.३० वाजता शाळेच्या आवारात भिवंडी पुनर्निर्माण कार्निव्हलमध्ये भिवंडी सुधारणेबाबात मुले आणि पालक, तसेच शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी चर्चा करणार आहेत. 
 
याबाबत अधिक माहिती देताना पॉलीमथ शाळेचे संचालक भावेश गांधी व हेमंत मेहता म्हणाले, ‘मुले म्हणजे या देशाचे, शहराचे भवितव्य आहेत. शहर बदलायचे, समाज बदलायचा यासाठी ही मुलेच आता पुढे आली आहेत. आपण राहतो ते शहर बदलण्यासाठी काय करता येईल याची चर्चा करण्यासाठी भिवंडीवर प्रेम करीत असलेल्या प्रत्येकाला भिवंडी कार्निव्हलच्या या चर्चासत्रात सहभागी होण्याचे आवाहन मुलांनी केले आहे.’  


‘एक दिवसाच्या या भिवंडी कार्निव्हलमध्ये सकाळी १० ते रात्री आठ वाजेपर्यंत नृत्य, चित्रकला, फॅन्सी ड्रेस, काव्य वाचन, जोक सांगणे, फोटोग्राफी अशा विविध स्पर्धा आयोजित केल्या आहेत. या कार्निव्हलमध्ये सहभागी झालेल्या मुलांना प्रशस्तिपत्रक व विजेत्यांना आकर्षक बक्षीसे मिळणार आहेत. या वेळी एका पेंटिंग वर्कशॉपचेदेखील आयोजन करण्यात आले आहे. रॉक क्लाईबिंगदेखील असणार आहे. पॉटरी आर्ट, घरच्याघरी साबण व मेणबत्ती कशी बनवावी, कापडी पिशव्या बनवणे, ट्रॅम्पोलिन, वैज्ञानिक खेळ, मास्टर शेफ असा भरगच्च खेळ व मजेचा कार्यक्रम दिवसभर पॉलीमॅथ शाळेच्या पटांगणावर रंगणार आहे. या कार्निव्हलसाठी प्रवेश मोफत आहे,’असेही मेहता यांनी सांगितले.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link