Next
फलटणमधील ऐतिहासिक वाचनालय
धनश्री भावसार-बगाडे
Friday, August 11, 2017 | 09:45 AM
15 0 0
Share this article:फलटण संस्थानाचे अधिपती श्रीमंत मुधोजीराजे नाईक-निंबाळकर यांनी केलेल्या लोकहिताच्या अनेक महत्त्वाच्या कामांपैकी एक म्हणजे त्यांनी दूरदृष्टीने केलेली वाचनालयाची स्थापना. दोन ऑगस्ट १८७० रोजी त्यांनी ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’ची स्थापना केली. ‘वाचाल तर वाचाल’ हे तत्त्व फलटणच्या अधिपतींनी आपल्या कृतीतून रयतेला शिकवले. तोच वारसा आजही हे वाचनालय चालवत आहे. ग्रंथालय आणि ग्रंथपाल दिनानिमित्त या वाचनालयाविषयी...

............
स्वातंत्र्यपूर्वकाळात देशात अनेक संस्थाने होती. यापैकी काही संस्थानिकांची राजवट ही ‘कल्याणकारी महाराजांची राजवट’ म्हणून रयतेचा विकास, प्रगती करणारी ठरली. फलटण संस्थानाचे अधिपती श्रीमंत मुधोजीराजे नाईक-निंबाळकर हे असेच प्रजेचे कल्याण करणारे महाराज होते. फलटण संस्थानामध्ये त्यांनी विकासाची अनेक कामे केली. त्यापैकी एक म्हणजे त्यांनी दूरदृष्टीने केलेली वाचनालयाची स्थापना. दोन ऑगस्ट १८७० रोजी त्यांनी ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’ची स्थापना केली. ‘वाचाल तर वाचाल’ हे तत्त्व फलटणच्या अधिपतींनी आपल्या कृतीतून रयतेला शिकवले.

त्या काळात तालुका पातळीवरचे वाचनालय हे एक अप्रूपच होते. त्या काळात या वाचनालयात दोन हजारपेक्षाही अधिक ग्रंथ होते. हे जुने ग्रंथ आज या वाचनालयाचे वैशिष्ट्य ठरले असून, अतिशय काळजीपूर्वक हे ग्रंथ जतन करण्यात आले आहेत.

इ. स. १८९७मध्ये महाराणी व्हिक्टोरिया यांचा हीरकमहोत्सवी वाढदिवस होता. त्यानिमित्त इ. स. १९०२मध्ये या ‘नेटिव्ह जनरल लायब्ररी’चे नाव बदलले आणि ते ‘व्हिक्टोरिया डायमंड ज्युबिली लायब्ररी, फलटण’ असे करण्यात आले. नंतर मात्र भारत स्वतंत्र झाल्यानंतर एक मे १९६२ रोजी त्याचे नामकरण ‘छत्रपती शिवाजी वाचनालय’ असे करण्यात आले.

ब्रिटिशकालीन वैभव असणारी ही वास्तू आज फलटणचे भूषण ठरली आहे. १४७ वर्षांपूर्वीची ही इमारत सगळ्या फलटणवासीयांसाठी अभिमानाचा विषय आहे. भव्य आणि प्रशस्त अशा या वास्तूत लाकडाचे आखीव-रेखीव दुर्मीळ काम आहे. या दोन मजली इमारतीची वास्तुरचना आकर्षक असून, तत्कालीन स्थापत्यशास्त्राचा उत्कृष्ट नमुना म्हणून या वास्तूकडे पाहिले जाते. नाईक-निंबाळकरांच्या मनमोहन राजवाड्याजवळचे हे वाचनालय वाचकांसाठी ज्ञानाची खाण ठरले आहे.

या वाचनालयाची इमारत भूषणावह आहेच, त्याचबरोबर इथली ग्रंथसंपदाही मौल्यवान आहे. इंग्रजी आणि मराठी या भाषांमधील दोन हजारपेक्षा जास्त दुर्मीळ ग्रंथ तेथे उपलब्ध आहेत. यात प्रामुख्याने एनसायक्लोपीडिया ब्रिटानिका, कंपनी लॉ, ऋग्वेद संहिता, मध्ययुगीन चरित्रकोश, विश्वकोश, संस्कृतिकोश या व १८५०पासूनच्या इतरही दुर्मीळ ग्रंथांचे उत्तम स्थितीत जतन करून ठेवण्यात आले आहे. कोणाही अभ्यासकासाठी महत्त्वपूर्ण दस्तऐवज ठरावा असा हा ग्रंथसंग्रह आहे.

आज या वाचनालयात सुमारे वीस हजार ग्रंथ आहेत. त्यांचा लाभ साडेपाचशेपेक्षाही अधिक सभासद घेत आहेत. पीएचडी, एमफिल करणारे संशोधक, एमपीएससी, यूपीएससी, सेट-नेट, तसेच विविध विषयांच्या प्रवेशपरीक्षा देणारे विद्यार्थी अशा अनेक ज्ञानोत्सुकांसाठी हे वाचनालय महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

वाचनालयात या विद्यार्थ्यांसाठी खास अभ्यासिका आहे. तसेच केवळ महिलांसाठीही वाचनकक्ष आहे; मात्र महिला वाचक अपेक्षित संख्येने येत नाहीत, अशी खंत वाचनालयाचे अंकुश गंगातिरे यांनी बोलून दाखविली.

वाचनालयासाठी आवश्यक त्या आधुनिक सुधारणा आजवरचे अध्यक्ष, सचिव व अन्य संचालकांनी जाणीवपूर्वक केल्या आहेत. वाचनालय अद्ययावत बनविले आहे. वाचक सभासदांना जलद गतीने पुस्तक मिळावे म्हणून या वाचनालयात संगणक बसविण्यात आला आहेच; पण त्याच्या जोडीला ‘बारकोड’ पद्धतीची अद्ययावत प्रणालीसुद्धा बसविण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यात ही प्रणाली सर्वप्रथम वापरण्याचा मान या शिवाजी वाचनालयाला मिळाला. यासाठी सभासदांना ओळखपत्र देण्यात आले आहे. वाचनालयातील पुस्तकांचे वर्गीकरण करून त्यांची नोंद संगणकात ठेवण्यात आली आहे.

आधुनिक बुकरॅक, सुखावह आसनव्यवस्था, पंखे, पिण्याचे पाणी इत्यादी सोयीही वाचकांसाठी केल्या आहेत. त्याचा लाभ वाचकवर्ग घेत आहे.
‘वाचनालयाचा व्याप, पसारा मोठा आहे. त्या मानाने आम्हाला शासकीय अनुदान कमी पडते,’ असे संचालक सांगतात. अनुदानाची ही तूट भरून काढण्यासाठी फलटणमधूनच काही दानशूर व्यक्ती पुढे येतात. तसेच वाचनालयाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, संचालकही वेळप्रसंगी पदरमोड करतात आणि लहान-मोठ्या खर्चाची तोंडमिळवणी होते.

माजी नगराध्यक्ष अॅड. स. रा. भोसले, अॅड. जी. बी. माने, बबनराव क्षीरसागर, मस्जिदभाई शेख, आशालता चमचे, माजी आमदार हरिभाऊ निंबाळकर, टी. जी. इनामदार ही सगळी नावे फलटणच्या राजकीय, सांस्कृतिक, सामाजिक इतिहासात ठळकपणे नमूद झालेली आहेत.

या सगळ्यांनी वाचनालयाला जपले आहे. वाचनालयाचे आजवरचे सर्व अध्यक्ष, अन्य पदाधिकारी आणि सर्व संचालक एकमेकांना पूरक आहेत आणि एकदिलाने, एकमताने वाचनालयाच्या भल्याचे निर्णय घेतात. त्यामुळे वादविवाद, मतभिन्नता यांच्याशिवाय वाचनालयाचे कामकाज सुरू असते.

इ. स. २००४मध्ये महाराष्ट्र शासनाच्या ‘शतकोत्तर वाचनालय’ योजनेतून फलटणच्या या वाचनालयाचा पाच लाख रुपये देऊन गौरव करण्यात आला. या निधीतून वाचनालयासाठी अनेक अपूर्ण गोष्टींची पूर्तता करण्यात आली. वाचनालयात सर्व वर्तमानपत्रे, साप्ताहिके, पाक्षिके येतात. ती वाचकांना वाचनासाठी मोफत उपलब्ध करून दिली जातात. दररोज सुमारे दीडशे वाचक वाचनालयात येतात.

फार पूर्वीपासून हे वाचनालय वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवते आहे. छत्रपती शिवाजीमहाराज जयंती, कामगारदिन, महात्माफुले जयंती, हरिभाऊ निंबाळकर स्मृतिदिन, वाचनालयाचा स्थापनादिन अशा वैशिष्ट्यपूर्ण दिवशी कार्यक्रम आयोजित केले जातात. कधी रक्तदान शिबिर, कधी लेखक, गुणवंत यांचा गौरव, नामवंतांची व्याख्याने अशा कार्यक्रमांनी वर्ष गजबजलेले असते. याशिवाय ग्रंथालयामार्फत साखळी ग्रंथालय योजना, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यांचे यशस्वी आयोजन केले जाते. आपल्या घरचाच कार्यक्रम असावा अशा उत्साहाने पदाधिकारी, सभासद यात सहभागी होतात.

दत्तो वामन पोतदार, क्रांतिसिंह नाना पाटील, यशवंतराव चव्हाण, शिवाजीराव भोसले अशा अनेकांचा पदस्पर्श या ग्रंथालयाला लाभला आहे. अध्यक्ष अॅड. दस्तगीर मेटकरी, चेअरमन अॅड. मिलिंद लाटकर, व्हाइस चेअरमन अॅड. अजित शिंदे, सचिव दीपक रुद्रभटे, रवींद्र बर्गे, रवींद्र फौजदार, विलास बोरावके हे सर्व पदाधिकारी अतिशय आत्मीयतेने, जिव्हाळ्याने, वाचनालयाचे कामकाज पाहत आहेत. राजेंद्र गंगातिरे, सुनील पवार, मंगेश पवार हे कर्मचारी तत्परतेने कार्यरत आहेत.

इंग्रजांच्या राजवटीपासून आजतागायत या वाचनालयाने विविध परिवर्तने पाहिली आहेत. तसेच या परिवर्तनाच्या काळात साहित्यिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक वारसाही ग्रंथालयाने जपला आहे.

संपर्क :
अध्यक्ष, अंकुश गंगातिरे : ९४०५७ ४८०८०
छत्रपती शिवाजी वाचनालय, फलटण

(ग्रंथालय आणि ग्रंथपाल दिवसानिमित्ताने ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध होणारे सर्व लेख https://goo.gl/jG2iif या लिंकवर एकत्रितरीत्या उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search