Next
लालमणी मिश्र, नॉर्मा शिअरर
BOI
Saturday, August 11, 2018 | 03:45 AM
15 0 0
Share this article:

‘विचित्र वीणा’ वाद्यावर हुकुमत असणारे शास्त्रीय संगीतकार लालमणी मिश्र आणि आपल्या सौंदर्याने व चतुरस्र अभिनयाने गाजलेली अभिनेत्री नॉर्मा शिअरर यांचा ११ ऑगस्ट हा जन्मदिन. त्यानिमित आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांचा अल्प परिचय...
...
लालमणी मिश्र

११ ऑगस्ट १९२४ रोजी जन्मलेले लालमणी मिश्र हे शास्त्रीय संगीत क्षेत्रातलं एक आदरणीय नाव! ध्रुवपद गायकीबरोबरच ते तबलावादन आणि सतारवादन उत्तम करत असत. त्यांची ‘विचित्र वीणा’ या वाद्यावर हुकुमत होती आणि त्यातून २२ श्रुती ते ऐकवत असत. कोलकात्याच्या एका रेकॉर्डिंग कंपनीत असिस्टंट म्युझिक डायरेक्टर म्हणून काम करत असताना त्यांनी संगीतात अनेक प्रयोग केले. चाळीसच्या दशकात त्यांनी लहान मुलांवर संगीताचे संस्कार करण्यासाठी अनेक ठिकाणी बाल संगीत विद्यालयं सुरू केली होती. तसंच भारतीय संगीत परिषदेची स्थापना केली होती. पंडित उदय शंकर यांच्या बॅले ट्रुप्सबरोबर इंग्लंड, बेल्जियम, अमेरिका, कॅनडा, फ्रान्स यांसारख्या देशांचे दौरे करत असताना त्यांनी त्यांच्या अनेक नृत्यप्रकारांसाठी अनोख्या चाली बांधल्या होत्या. पुढे त्यांनी पंडित ओमकारनाथ ठाकूर यांच्या आग्रहावरून बनारस हिंदू युनिव्हर्सिटीमध्ये महत्त्वाची धुरा सांभाळताना हिंदुस्तानी शास्त्रीय संगीत यशस्वीपणे सर्वदूर पोहोचवलं. फिलाडेल्फियाच्या पेन युनिव्हर्सिटीचे ते अनेक वर्षं व्हिजिटिंग लेक्चरर होते. त्यांनी अनेक ग्रंथ लिहून शास्त्रीय संगीताचा प्रसार केला. त्यांनी तालवादनातही काही प्रयोग केले आणि त्यांच्याच प्रयोगावरून पुढे तो प्रकार ‘कूट की तान’ किंवा ‘मिश्र-बानी’ म्हणून ओळखला जातो. १७ जुलै १९७९ रोजी त्यांचा मृत्यू झाला.
........      

नॉर्मा शिअरर

११ ऑगस्ट १९०२ रोजी माँट्रिअलमध्ये जन्मलेली नॉर्मा शिअरर ही आपल्या सौंदर्याने आणि चतुरस्र अभिनयाने गाजलेली अभिनेत्री. हॉलिवूडमध्ये १९३० आणि ४०चं दशक तिने गाजवलं होतं. हॉलिवूडच्या प्रख्यात एमजीएम स्टुडिओचा प्रसिद्ध निर्माता अर्विंग थॅलबर्ग याच्याशी लग्न केल्यावर तिला आदराने ‘फर्स्ट लेडी ऑफ दी स्क्रीन’ असं संबोधलं जाई. ही हू गेट्स स्लॅप्ड, दी ट्रायल ऑफ मेरी द्युगन, ए फ्री सोल, दी बॅरेट्स ऑफ विम्पोल स्ट्रीट, रोमिओ अँड ज्युलिएट, मेरी आंत्वानेत, दी विमेन हे तिचे गाजलेले चित्रपट. तिला सहा वेळा ऑस्कर नामांकन मिळालं होतं. ‘दी डायव्होर्सी’ सिनेमातल्या भूमिकेसाठी एकमेव ऑस्कर मिळालं होतं. १२ जून १९८३ रोजी कॅलिफोर्नियामध्ये तिचा मृत्यू झाला.

यांचाही आज जन्मदिन :
‘वाचनीय लेखक’ अशा शब्दांत ‘पुलं’नी कौतुक केलेले वि. स. वाळिंबे (जन्म : ११ ऑगस्ट १९२८, मृत्यू : २२ फेब्रुवारी २०००) 
बच्चेकंपनीची आवडती लेखिका इनिड ब्लायटन (जन्म : ११ ऑगस्ट १८९७, मृत्यू : २८ नोव्हेंबर १९६८) 
यांच्याविषयी अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा
‘हेराफेरी’सारख्या विनोदी सिनेमांतून गाजलेला अॅक्शन हिरो सुनील शेट्टी (जन्म : ११ ऑगस्ट १९६१)
 
(दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search