Next
अंध-अपंगांसाठीचा ‘दीपस्तंभ’
मानसी मगरे
Thursday, October 19, 2017 | 03:45 PM
15 0 0
Share this story

दीपस्तंभ बहुउद्देशीय संस्था, जळगाव

अंध, अपंग आणि अनाथ मुलांसाठी रोजचे जीवन जगणे हेच एक मोठे आव्हान असते. त्यांना थोडे प्रोत्साहन आणि पाठिंबा मिळाला, तर त्यांच्या जीवनातील अंधःकार दूर होऊ शकतो. हीच गोष्ट लक्षात घेऊन जळगाव येथील यजुर्वेंद्र महाजन यांनी स्थापन केली आहे दीपस्तंभ ही बहुउद्देशीय संस्था. ‘लेणे समाजाचे’ सदरात आज पाहू या ‘दीपस्तंभ’चे लक्ष्मण सपकाळे यांनी संस्थेबद्दल दिलेली माहिती...
.............

‘तुम्ही सर्व जण महान कार्ये करण्यासाठीच जन्माला आला आहात, यावर विश्वास असू द्या. धीट व्हा, शक्तिमान व्हा, सगळी जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घ्या आणि पक्की खूणगाठ असू द्या, की तुमच्या भाग्याचे निर्माते तुम्हीच आहात. जे बल व जे सहाय्य तुम्हाला हवे आहे, ते तुमच्या आतच आहे,’ हे स्वामी विवेकानंदांचे विचार ज्यांनी आपल्या मनावर कोरून घेतले आहेत, असे काही लोक नक्कीच काहीतरी भन्नाट करत असतील यात शंकाच नाही. जळगाव येथील यजुर्वेंद्र महाजन हे त्यापैकीच एक. महाजन यांच्या सामाजिक जाणिवेतून उदयास आलेली ‘दीपस्तंभ – बहुउद्देशीय संस्था’ हे याचे एक उत्तम उदाहरण आहे.

‘दीपस्तंभ’तर्फे मनोबल, संजीवन आणि गुरुकुल असे तीन सामाजिक प्रकल्प राबविले जातात. या तिन्ही प्रकल्पांतर्गत बहुसंख्य अंध-अपंग, अनाथ मुले दीपस्तंभ परिवाराशी जोडली गेली आहेत.  

मनोबल : केवळ समाजातच नव्हे, तर कुटुंबातही अंध-अपंग व्यक्तींकडे दयेच्या नजरेनं पाहिलं जातं. त्यांना वेगळी वागणूक दिली जाते. मनोबल हे अंध-अपंगांसाठी चालवले जाणारे देशातील पहिले निवासी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र आहे. सध्या जळगावमधील या मनोबल केंद्रात १२० अंध-अपंग विद्यार्थी प्रशिक्षण घेत आहेत. या ठिकाणी त्यांच्या निवासाचीही व्यवस्था केलेली आहे. समाजातील लोकांकडून देणगी मिळवून संस्थेमार्फत त्यांच्या निवासाची, जेवणाची आणि शिक्षणाची व्यवस्था केली जाते. 

या विद्यार्थ्यांसाठी जिल्हानिहाय करिअर समुपदेशन व स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कार्यशाळा व व्याख्याने आयोजित केली जातात. प्रज्ञाचक्षू व दिव्यांग विद्यार्थ्यांना मनोबल केंद्रात विशेष कौन्सिलर्स, प्रशिक्षक उपलब्ध करून दिले जातात. केंद्रीय लोकसेवा आयोग, स्टाफ सिलेक्शन, बँकेच्या परीक्षा, राज्य लोकसेवा आयोग अशा स्पर्धा परीक्षांची तयारी करून घेतली जाते. आजवर संस्थेचे १५ विद्यार्थी विविध परीक्षांमध्ये यशस्वी झाले असून, ते वेगवेगळ्या पदांवर कार्यरत आहेत. 

संजीवन : ज्या लहान मुलांना जन्मतःच आई-वडील नसतात, किंवा लहानपणीच ज्यांच्या आई-वडिलांचे निधन झालेले असते, अशा अनाथ, निराधार मुलांना शासनाच्या किंवा स्वयंसेवी संस्थांच्या बालगृहात ठेवले जाते; मात्र नियमानुसार, वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यांनतर या मुलांना तेथून बाहेर पडावे लागते. बाहेर कसला आधार नसल्याने मग ही मुले भरकटतात. अशा मुलांना दिशा देण्याचे काम ‘संजीवन’मार्फत केले जाते. ‘दीपस्तंभ’ने या मुलांना आधार देण्यासाठी हा प्रकल्प सुरू केला आहे. 

आयपीएस अधिकारी विश्वास नांगरे पाटील मुलांशी संवाद साधतानाया मुलांना इथे सैनिकी भरती, पोलिस भरतीचे प्रशिक्षण दिले जाते. तसेच मुलींना नर्सिंगसारख्या अभ्यासक्रमांचे प्रशिक्षण दिले जाते. त्यांना निवासी स्पर्धा परीक्षा व कौशल्य प्रशिक्षण विनामूल्य दिले जाते. तसेच सुरक्षारक्षक प्रशिक्षण, रुग्णालय व्यवस्थापन, दुकानांमधील विक्री सहायक अशा प्रकारचे शिक्षण दिले जाते. त्यांच्या विवाहासाठीही त्यांना साह्य केले जाते. विशेष म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला एका परिवाराशी जोडून देऊन, त्या परिवाराकडे त्याचे पालकत्व दिले जाते.   

गुरुकुल : ग्रामीण व आदिवासी भागात अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीवर व इतर अनेक संकटांवर मात करून काही विद्यार्थी उत्तम गुणांसह यशस्वी होतात. परंतु आर्थिक सहकार्य, मार्गदर्शन यांच्या अभावामुळे त्यांना पुढील स्पर्धेत टिकून राहणे अवघड होते. अशा मुलांसाठी मग ‘दीपस्तंभ’चा गुरुकुल प्रकल्प आशेचा किरण ठरतो. गुरुकुल प्रकल्पामध्ये अशा मुलांना निःशुल्क निवासी प्रशिक्षण दिले जाते. 

गरीब, शेतकरी, शेतमजुरांची मुले, आजारी, व्यसनग्रस्त कुटुंबातील मुले, घटस्फोटीत महिला, वडिलांचा मृत्यू झाला असेल अशी मुले, अनाथ मुले आदींना शोधून राज्यस्तरीय लेखी प्रवेश परीक्षा व मुलाखतीद्वारे त्यांची निवड केली जाते. या विद्यार्थ्यांना विविध स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते. त्यांच्यासाठी ग्रंथालय, अभ्यासिका याबरोबरच मोफत निवास व भोजन व्यवस्था दिली जाते. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांसाठी ‘कमवा व शिका’ ही योजना चालवली जाते. 

डॉ. जगन्नाथ वाणी, डॉ. के. एच. संचेती, कृष्णगोपाल तिवारी, डॉ. नरेंद्र जाधव, इंद्रजित देशमुख, लीनाताई मेहेंदळे, मधुकर उपलेंचवार, डॉ. सुनीलकुमार लवटे, डॉ. अविनाश सावजी, डॉ. गिरीश कुलकर्णी अशी काही प्रख्यात व्यक्तिमत्त्वे ‘दीपस्तंभ’च्या निरनिराळ्या प्रकल्पांसाठी प्रकल्प सल्लागाराची भूमिका बजावत आहेत. 

या वर्षी दीपस्तंभ संस्थेने जवळपास १८० मुले दत्तक घेतली आहेत. अशी सगळी मिळून आता सुमारे ३२० मुले संस्थेमध्ये विविध प्रकल्पांतर्गत आहेत. या मुलांमध्ये देशातील अनेक राज्यांतील मुलांचा समावेश आहे. कर्नाटक, उत्तर प्रदेश या राज्यांमधील मुलांचाही यात समावेश आहे. समाजातून देणगी जमा करून हे काम केले जाते. यासाठी अगदी पाच रुपयांपासून ते पाच लाख रुपयांपर्यंत देणगी देणारे लोक आहेत. अंध मुले असल्याने त्यांना जास्तीत जास्त तंत्रज्ञानाशी निगडीत शिक्षण देण्याचा प्रयत्न असतो. त्यामुळे संस्थेतील मुलांसाठी मदत करण्याची इच्छा असणाऱ्यांनी जुने लॅपटॉप, संगणक, फोन या गोष्टींची मदत केल्यास संस्थेतील मुलांना त्याचा उपयोग होऊ शकेल. शेवटी समाजाच्या मदतीवरच हे कार्य पुढे जाणार आहे.

संपर्क : 
यजुर्वेंद्र महाजन
दीपस्तंभ बहुउद्देशीय संस्था, जळगाव 
मोबाइल : ९८२२४ ७६५४५ 
फोन : (०२७५) २२४२२९९
ई-मेल : yajurvendra79@gmail.com
वेबसाइट : www.deepstambh.org

(‘लेणे समाजाचे’ या सदरातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/CAiHJu या लिंकवर उपलब्ध होतील.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link