Next
‘‘नीलपक्षी’ ही संस्कृतीचे संचित घेऊन येणारी कविता’
BOI
Wednesday, May 23, 2018 | 12:55 PM
15 0 0
Share this story

नीलपक्षी या कवितासंग्रहाचे प्रकाशन करताना मान्यवर

पुणे :
‘नीलपक्षी ही संस्कृतीचे संचित घेऊन येणारी कविता आहे. हा नीलपक्षी आपल्यापर्यंत उडत यावा असं वाटत असेल, तर आपली हृदये झाडांची केली पाहिजेत,’ असे विचार महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्राध्यापक मिलिंद जोशी यांनी व्यक्त केले. अमेरिकास्थित कवी डॉ. शंतनू कुलकर्णी यांच्या ‘नीलपक्षी’ या कवितासंग्रहाचे प्रकाशन अलीकडेच पुण्यात झाले. त्या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष या नात्याने मिलिंद जोशी बोलत होते. 

शंतनू कुलकर्णी यांना या समारंभात काव्यमग्न पुरस्कार प्रदान करण्यात आला.पुण्यातील प्रेरणा आर्ट फाउंडेशनने ‘नीलपक्षी’ हा काव्यसंग्रह रसिकांसाठी प्रकाशित केला आहे. मार्च महिन्यात झालेल्या त्याच्या प्रकाशन समारंभातच प्रेरणा आर्ट फाउंडेशनतर्फे दिला जाणारा काव्यक्षेत्रातील मानाचा ‘काव्यमग्न’ पुरस्कारही शंतनू कुलकर्णी यांना मिलिंद जोशी यांच्या हस्ते देण्यात आला. या प्रसंगी सुप्रसिद्ध कवयित्री डॉ. संगीता बर्वे आणि अभिनेता सौरभ गोखले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. प्रेरणा आर्ट फाउंडेशनचे अध्यक्ष प्रसिद्ध गझलकार अनिल कांबळे, प्रेरणा आर्ट फाउंडेशनच्या सचिव कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे व इतर अनेक मान्यवर कवी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. 

डॉ. शंतनू कुलकर्णी यांनी त्यांच्या भाषणातून ‘नीलपक्षी’ या काव्यसंग्रहामागची पार्श्वभूमी समजावून सांगितली. ‘सुखाचं प्रतीक मानला जाणारा ब्लू बर्ड ऑफ हॅपीनेस अर्थात नीलपक्षी हा सर्वांनाच पाहायला हवा असतो. परंतु सध्याच्या चढाओढीच्या आणि धकाधकीच्या जीवनात हे सुख, हा आनंद त्या नीलपक्ष्याप्रमाणे प्रत्येकाला हुलकावणी देत आहे. तो आनंद उपभोगण्यासाठी नीलपक्षी आपल्या मनातच दडला आहे याची जाणीव होणे आवश्यक आहे. एक सच्ची कविता आपल्या मनातला हा आनंद जागवण्याचं काम करत असते,’ असे शंतनू कुलकर्णी म्हणाले. 

डॉ. संगीता बर्वे यांनी नीलपक्षी या काव्यसंग्रहाचे अत्यंत सुंदर विश्लेषण त्यांच्या खास शैलीत प्रेक्षकांसमोर मांडले. ‘अंतर्मनाचा शोध हाच या कवितांचा गाभा आहे,’ असे त्या म्हणाल्या. ‘या काव्यसंग्रहात गझल, मुक्तछंद, बालकविता अशा विविध शैलीच्या आणि अनेक विषयांवरील कविता आहेत आणि त्या लिहिताना लेखणी कुठेही जड झालेली नाही,’ असेही त्यांनी सांगितले. सर्वांच्या भाषणांबरोबर सौरभ गोखले यांचेही हलकेफुलके भाषण सर्वांची मने जिंकून गेले. सौरभ गोखले हे शंतनू कुलकर्णी यांचे वर्गमित्र असल्याने त्यांनी त्यांच्या भाषणातून शाळेतील आठवणींना उजाळा दिला आणि आपल्या मित्राला भरपूर शुभेच्छा दिल्या. 

पुस्तक प्रकाशनानंतर निमंत्रित कवींचे काव्यसंमेलनदेखील आयोजित करण्यात आले होते. अनिल कांबळे आणि ज्योत्स्ना चांदगुडे यांनी या संमेलनाचे प्रभावी सूत्रसंचालन केले. सतीश कुलकर्णी, विलास अत्रे, डॉ. शिल्पा आचार्य, डॉ. कैलास गायकवाड, राजेंद्र शहा, मृणालिनी कानिटकर, कविता क्षीरसागर, शिल्पा देशपांडे, माधव हुंडेकर अशा नामवंत कवींनी या काव्यवाचनात सहभाग घेतला. रसिकांच्या प्रतिसादामुळे हे कविसंमेलन बहरत गेले. 

नीलपक्षी या काव्यसंग्रहात ‘वचन’, ‘तू धुंद नभी बरसात’ अशा प्रेमकविता आहेत, तसेच ‘तिची कविता’, ‘पाळीव वर्ग’ अशा सामाजिक कविताही आहेत. ‘जांभूळझाड’, ‘आकाश थोडं झुकलं आहे’ अशा कविता वाचकांना अलगद भूतकाळात घेऊन जातात. ‘हे नवनायका’सारख्या कविता आशावाद निर्माण करतात. ‘एक कैफियत मेरी भी गालिब’सारखी कविता वाचकांना वेगळ्याच विश्वात घेऊन जाते. ‘शब्दातल्या किनारी कविता कुणाकुणाची, ‘अर्था’त खोल जाता कविता उभ्या जगाची’ असे सांगणाऱ्या शंतनू यांच्या कवितांना माणसे जोडण्याचा अट्टाहास आहे, अशी भावना या वेळी व्यक्त झाली. शब्दांचे व मनाचे नाते उलगडणाऱ्या कवितांचा ‘नीलपक्षी’ हा काव्यसंग्रह वाचकांना नक्कीच आवडेल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.

(‘नीलपक्षी’ हे पुस्तक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)(काव्यसंग्रहाच्या प्रकाशनावेळी शंतनू कुलकर्णी यांनी व्यक्त केलेल्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link