Next
‘ग्रंथाली’चा ‘शब्द रुची’ प्रसिद्ध
प्रेस रिलीज
Tuesday, October 10 | 01:42 PM
15 0 0
Share this story

मुंबई :‘‘ग्रंथाली’ या अभिनव वाचक चळवळीचे मुखपत्र असणार्‍या ‘शब्द रुची’ या मासिकाचा दिवाळी अंक नुकताच प्रसिद्ध झाला असून त्यानिमित्त ‘ग्रंथाली’तर्फे वाचकांसाठी विशेष सवलत योजना जाहीर करण्यात आली आहे. महाराष्ट्राच्या साहित्य-संस्कृतीचे संगोपन आणि मराठी वाचकाची अभिरुचीसंपन्न दिवाळी अंकांची भूक भागविण्याचे काम करण्याचा आनंद अशा उपक्रमांमुळे आम्हाला होतो,’ असे उद्गार ‘ग्रंथाली’चे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर यांनी यानिमित्त बोलताना काढले.

अभिरुचीसंपन्न ‘शब्द रुची’

या वर्षीचा ‘शब्द रुची’चा दिवाळी विशेषांक नेहमीप्रमाणे विविधांगी साहित्याने नटलेला आणि संग्राह्य असा झाला आहे. डॉ. वीणा सानेकर यांनी या अंकाचे संपादन केले असून वसंत आबाजी डहाके, उषा मेहता, महेंद्र तेरेदेसाई, डॉ. प्रतिमा इंगोले, वसंत लिमये, जयदेव डोळे, दिनकर गांगल, प्रवीण बांदेकर असे अनेक मान्यवर या अंकाचे शिलेदार आहेत. ‘ग्रंथाली’चे आधारस्तंभ आणि चतुरस्त्र लेखक अरुण साधू यांचे नुकतेच निधन झाले. त्यांना वाहिलेली आदरांजली आणि त्याबरोबरच अन्य मान्यवरांच्या कथा, कविता, ललित, परिसंवाद, विविध विषयांवरील चर्चा अशा साहित्याने नटलेला हा २०० पानांचा अंक स्वतंत्रपणे दीडशे रुपये किंमतीत उपलब्ध करून देण्यात आला आहे.

भेट योजना
‘ग्रंथाली’तर्फे दरवर्षी काही दर्जेदार दिवाळी अंक आणि पुस्तके एकत्र करून त्यांचा संच सवलतीच्या दरात वाचकांना उपलब्ध करून दिला जातो. या वर्षीही असे दोन संच योजनेसाठी तयार करण्यात आले आहेत. ‘दिवाळी : शब्दसुगंध’ या पहिल्या संचात ‘शब्द रुची’, ‘उत्सव नात्यांचा’ आणि ‘ऋतुरंग’ या तीन दिवाळी अंकांसोबत अरुण शेवते यांनी संपादित केलेली ‘आठवणींचे असेच असते’, ‘मला उमगलेला पुरुष’, ‘मी स्त्री आहे म्हणून’ ही तीन पुस्तके आणि माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे ‘मागे वळून पाहताना’ चिंतनपर ललित गद्य असा सारा एक हजार २०० रुपये किंमतीचा ऐवज केवळ ८०० रुपयांत उपलब्ध करून दिला आहे.

‘दिवाळी : आरोग्यसंपन्न’ या दुसर्‍या भेट संचात ‘शब्द रुची’, ‘उत्सव नात्यांचा’, ‘ऋतुरंग’ या दिवाळी अंकांसोबत ‘हृदयस्पर्शी माधवबाग’, ‘आहारसंहिता’, ‘माझी आरोग्ययात्रा’ आणि ‘डॉक्टरांच्या जगात’ ही ‘ग्रंथाली’ची वाचकविश्वात गाजत असलेली पुस्तके समाविष्ट करण्यात आली असून एकूण एक हजार २८० रुपये किंमतीचा हा ऐवज केवळ ८०० रुपयांत उपलब्ध करून देण्यात आला आहे. यापैकी एक किंवा दोन्ही संच कुरिअरने पाठविण्यासाठी प्रत्येकी ८० रुपये स्वतंत्र शुल्क आकारण्यात येईल, असेही ‘ग्रंथाली’तर्फे स्पष्ट करण्यात आले आहे.

ऋतुरंग आणि उत्सव नात्यांचा
‘ऋतुरंग’चा हा सलग २५वा अंक असून मनातील आठवणींना वाट मोकळी करून देणारे मान्यवरांचे लेख हे मनातील आठवणींना वाट मोकळी करून देणारे मान्यवरांचे लेख हे त्याचे वैशिष्ट्य आहे. त्यात गुलजार, लता मंगेशकर, डॉ. उदय निरगुडकर, गिरीश कुबेर, संदीप वासलेकर, राजीव खांडेकर, सौमित्र, अशोक कोठावळे यांसारख्या मान्यवरांचा समावेश असून २७२ पानांच्या या अंकाची किंमत २०० रुपये इतकी आहे. तर ‘झी मराठी’ आणि ‘ग्रंथाली’ची संयुक्त निर्मिती असणारा ‘उत्सव नात्यांचा’ हा पहिला-वहिला दिवाळी अंक या संचाचे खास वैशिष्ट्य ठरले आहे. गेली अठरा वर्षे मराठी माणसाच्या भावविश्वात कायमचे अग्रणी स्थान पटकावून बसलेल्या झी वाहिनीची जडणघडण, वर्तमान आणि भविष्य यांचा विविधांगी आढावा घेणारा हा लेख मान्यवर, विचारवंत आणि कलावंतांच्या साहित्यान, आठवणींनी आणि चिंतनपर साहित्याने सजलेला आहे. त्यात शारदा सुंदर, नितीन वैद्य, भारतकुमार राऊत, माधवी मुटाटकर, जयदेव डोळे आणि सचिन पिळगावकर, महेश मांजरेकर यांच्यापासून ‘झी’चे सर्व कलाकार, लेखक, निर्माते गीतकार अशा अनेक मान्यवरांचा समावेश आहे. सुप्रसिद्ध नाटककार प्रशांत दळवी यांनी अंकाचे संपादन केले असून २७२ पानांच्या या अंकाची किंमत केवळ १०० रुपये इतकी ठेवण्यात आली आहे.

‘‘ग्रंथाली’ने भेट स्वरूपात उपलब्ध करून दिलेले हे संस्कृतीसंचित प्रत्येक रसिक माणसाच्या संग्रही राहील आणि त्याला त्याच्या सांस्कृतिक श्रीमंतीची आठवण करून देईल,’ असा विश्वास श्री. सुदेश हिंगलासपूरकर यांनी व्यक्त केला आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link