पुणे : महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व आणि बहुमुखी प्रतिभावंत पु. ल. देशपांडे, महाराष्ट्रवाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्ताने तसेच कादंबरीकार ना. सी. फडके यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्ताने आणि हरी नारायण आपटे यांच्या स्मृतीशताब्दीच्या निमित्ताने महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा निर्णय महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारी मंडळाच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

ठाणे येथील मराठी ग्रंथसंग्रहालयात महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी मंडळाची बैठक आणि शाखा मेळावा नुकताच झाला. त्यात हा निर्णय घेण्यात आला. परिषदेचे प्रमुख कार्यवाह प्रकाश पायगुडे, कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार यांच्यासह साहित्य परिषदेच्या या शाखा मेळाव्याला ठाणे, कल्याण, डोंबिवली, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, धुळे-नंदुरबार, नाशिक जिल्ह्यांतील शाखांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रा. जोशी म्हणाले, ‘आठ नोव्हेंबरपासून ‘पुलं’च्या, एक ऑक्टोबरपासून ‘गदिमां’च्या जन्मशताब्दी वर्षाला प्रारंभ होत आहे. कादंबरीकार हरी नारायण आपटे यांच्या स्मृतिशताब्दी वर्षाला तीन मार्चपासून प्रारंभ झाला आहे. कादंबरीकार ना. सी. फडके यांच्या १२५ व्या जयंती वर्षाला चार ऑगस्टपासून प्रारंभ होत आहे. या दिग्ग्ज साहित्यिकांचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांच्या कर्तृत्वाला अभिवादन करण्यासाठी विविध संस्थांच्या सहकार्याने साहित्य परिषदेच्या शाखांच्या माध्यमातून महाराष्ट्रभर कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.’

कार्यकारी मंडळाच्या बैठकीत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळावर ‘मसाप’चे तिसरे प्रतिनिधी म्हणून विनोद कुलकर्णी (सातारा) यांची निवड करण्यात आली. कल्याण शिंदे (सोलापूर जिल्हा प्रतिनिधी), रावसाहेब पवार (पुणे जिल्हा प्रतिनिधी) यांची विभागीय कार्यवाहपदी निवड करण्यात आली.
विभागीय संमेलनाच्या निमंत्रकपदी प्राचार्य तानसेन जगताप (चाळीसगाव), युवा साहित्य-नाट्य संमेलनाच्या निमंत्रकपदी वि. दा. पिंगळे (पुणे), समीक्षा संमेलनाच्या निमंत्रकपदी सुरेश देशपांडे (डोंबिवली), शाखा मेळाव्याच्या निमंत्रकपदी जे. जे. कुलकर्णी (सोलापूर), बालकुमार साहित्य संमेलनाच्या निमंत्रकपदी सुनिताराजे पवार (पुणे) यांची निवड करण्यात आल्याचेही प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले. ही निवड एक एप्रिल २०१८ ते ३१ मार्च २०१९ मार्च या कालावधीसाठी आहे.
महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे विशेषांक 
‘पु. ल. देशपांडे, ‘गदिमा’ यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्ताने, कादंबरीकार ह. ना. आपटे यांच्या स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने आणि ना. सी. फडके यांच्या १२५ व्या जयंतीवर्षाच्या निमित्ताने या सारस्वतांना अभिवादन करणारा महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचा विशेषांक काढण्यात येणार आहे. अभिजात भाषेचा दर्जा म्हणजे काय, तो मराठी भाषेला मिळणे का गरजेचे आहे, प्रा. रंगनाथ पठारे समितीचा अहवाल आणि मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा, यासाठी परिषदेने केलेले प्रयत्न याची माहिती देणारा ‘अभिजात मराठी’ हा पत्रिकेचा विशेषांकही लवकरच प्रसिद्ध केला जाणार आहे. असेही परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले.