Next
दूरदृष्टी लाभलेली पुण्याची टेनिसक्वीन
BOI
Friday, March 23 | 06:45 AM
15 0 0
Share this story

मल्लिका मराठे

टेनिस खेळायला सुरुवात होण्यापूर्वीच दृष्टी गमावण्याचा धोका मल्लिकाच्या बाबतीत निर्माण झाला होता. त्यावर मात करत मल्लिका आज चौदा वर्षांखालील मुलींच्या भारतीय क्रमवारीत अव्वलस्थानी विराजमान झाली आहे. आपण सानियाचे वारसदार असल्याचे संकेत देत पुण्याची ही मुलगी टेनिसक्वीन बनली आहे... ‘क्रीडारत्ने’ या साप्ताहिक सदरात आजचा लेख टेनिसपटू मल्लिका मराठेबद्दल..
...................................
सानिया मिर्झाटेनिस सम्राज्ञी सानिया मिर्झाकडून प्रेरणा घेत आज भारतात शेकडो मुली टेनिसकडे वळत आहेत. नावारूपालाही येत आहेत.  पुण्याची मल्लिका मराठे ही पण अशाच काही खेळाडूंपैकी एक आहे. खेळायला सुरुवात होण्यापूर्वीच दृष्टी गमावण्याचा धोका मल्लिकाच्या बाबतीत निर्माण झाला होता. त्यावर मात करत मल्लिका आज चौदा वर्षांखालील मुलींच्या भारतीय क्रमवारीत अव्वलस्थानी विराजमान झाली आहे. आपण सानियाचे वारसदार असल्याचे संकेत देत पुण्याची ही मुलगी टेनिसक्वीन बनली. 

 मल्लिकाला वयाच्या चौथ्या वर्षी डाव्या डोळयाला अॅम्ब्लीओपिया हा विकार झाल्याचे निष्पन्न झाले आणि तिच्या पालकांसमोर अंधःकार पसरला. इतक्या लहान वयात जर दृष्टी गेली, तर हा एक भला मोठा प्रश्न निर्माण झाला असता. नेमके त्याच वेळी एका नेत्रतज्ञाने अफाट मेहनत घेत मल्लिकाचा हा दृष्टीदोष दूर केला आणि तिच्या आयुष्यातील अंधःकार दूर करत कारकिर्दीचा हमरस्ता प्रकाशमान केला.  मल्लिकाने टेनिसचे धडे गिरवायला ज्या वयात प्रारंभ केला, त्या वयात बहुतेक मुली आपल्या पालकांकडे आईसक्रीमचा हट्ट करतात. आज मल्लिका इयत्ता आठवीमध्ये सिंबियोसीस  शाळेत शिकत आहे आणि शाळेच्या मुख्याध्यापिका वीणा मॅडम यांचा तिला भक्कम पाठींबा आहे.

क्लब, शालेय, जिल्हा, राज्य व राष्ट्रीय अशी एकेक शिखरे पादाक्रांत करत मल्लिका आज पुण्याची टेनिसक्वीन बनली आहे. आता केवळ तेरा वर्षांची असली, तरी तिने अठरा वर्षांखालील गटाची जगात सर्वाधिक मानाची समजली जाणारी ‘रॉन्देव्हू रोलॅन्ड गॅरोस नॅशनल सिरीज’ स्पर्धा जिंकली.  पुण्यातील पीवायसी जिमखाना टेनिस कोर्टवर अठरा वर्षांखालील गटात ही स्पर्धा झाली व बिगरमानांकित मल्लिकाने अव्वल मानांकीत श्रध्दा शिवानीचा ६-४, ६-३ असा धुव्वा उडवत गुणवत्तेला वयाचे बंधन नसते हे सिद्ध केले. या स्पर्धेत मल्लिका ने पात्रता फेरीतील सामने जिंकत मुख्य फेरीत प्रवेश मिळवला होता, हे तिच्या विजेतेपदाचे मोठे वैशिष्ट्य आहे.
मल्लिका मराठेसह पुरूष एकेरीत सिद्धांत बांठिया यानेदेखील विजेतेपद मिळवले आणि ही स्पर्धा जिंकली. विम्बल्डन ज्युनिअर व ज्युनिअर स्तरावरच्या प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या स्पर्धा आहेत, त्यापैकी ‘रॉन्देव्हू रोलॅन्ड गॅरोस नॅशनल सिरीज’ स्पर्धा आहे. 

‘अॅम्ब्लीओपिया’ हा डोळयांचा विकार मल्लिकाला वयाच्या चौथ्या वर्षी झाल्याचे निष्पन्न झाले. ज्यात दृष्टीदोष निर्माण होतो व मेंदुचा डोळयांशी असलेला संपर्क कमकुवत होतो. यामुळे दृष्टीदोष होऊन प्रसंगी कायमची दृष्टी जाऊ शकते. कालांतराने मल्लिकाचा हा विकार बरा झाला आणि तिला कारकिर्दीची दूरदृष्टी मिळाली. हे सगळे सोपस्कार झाल्यावरही तिच्यावर शिक्षणाबरोबरच टेनिसमध्ये कारकिर्द घडवण्यासाठी तिच्या आई-वडिलांनी पाठींबा दिला, याबद्दल त्यांचे कौतुकच म्हणावे. 

वयाच्या सातव्या वर्षी राष्ट्रीय खेळाडू संदीप किर्तने यांच्याकडे टेनिसचे धडे गिरवायला मल्लिकाने सुरुवात केली आणि आज पीवायसीचे यशस्वी प्रशिक्षक हेमंत बेंद्रे यांच्याकडे ती प्रशिक्षण घेत आहे. या सर्व वाटचालीत मल्लिकाच्या आई-वडीलांनी दिलेला पाठींबा हाच तिच्यासाठी महत्त्वाचा ठरत आहे. घरातून आपल्या आवडीला समर्थन मिळाले, तर खेळातच काय कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होता येते, हे आपण अनेक उदाहरणांनी पाहतो. येत्या काळात मल्लिका ‘ग्रँडस्लॅम’ गाजवताना दिसावी ही अपेक्षा आहे. सध्या वयाच्या केवळ तेराव्या वर्षी ती अठरा वर्षांखालील गटातील खेळाडूंना आव्हान देत आहे. 

पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे आणि टेनिस संघटनेतील राजकारणावर बोलण्यापेक्षा सध्या तरी आपण मल्लिका आणि सिद्धांत यांच्या कामगिरीवर लक्ष ठेवू या कारण चिखलातच कमळ उगवते, त्याप्रमाणे खरी गुणवत्ता कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी लपत नाही. वयाच्या चौथ्या वर्षी दृष्टीदोषावर मात करणारी मल्लिका भविष्यात भारताची नवी टेनिस सम्राज्ञी बनावी आणि सिद्धांत, भुपती यांचीच नव्हे तर पेसचीही ती वारसदार ठरावी, हीच आकांक्षा आहे.

डॉ. संगिता वाघ आणि मल्लिकाचे आई-वडील यांनी परिस्थितीसमोर न डगमगता त्याचा धैर्याने सामना केला आणि मल्लिकाला टेनिसकोर्टवर उतरण्यासाठी प्रोत्साहन दिले.  येत्या काळात मल्लिका केवळ पुण्याचीच नव्हे, तर या देशाची टेनिसक्वीन म्हणून नावारूपाला यावी हीच आकांक्षा तमाम टेनिसशौकिनांची आहे.

- अमित डोंगरे
ई-मेल : amitdongre10@gmail.com

(लेखक पुण्यातील मुक्त क्रीडा पत्रकार आहेत. ‘क्रीडारत्ने’ या लेखमालिकेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Fot1VH या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link