पंढरपुरात पूर्वी दिवाळीच्या दरम्यान दारुगोळ्याचे युद्ध चालायचे. काही वर्षांपूर्वी ही पद्धत बंद झाली; मात्र गेल्या काही वर्षांपासून दिवाळीत चंद्रभागा नदीच्या काठावर दीपोत्सव साजरा करण्याची नवी परंपरा रूढ झाली आहे. या दोन्हींबद्दलच्या आठवणींना उजाळा देणारा हा लेख... ‘आठवणीतली दिवाळी’ या सदरात... ............ पंढरपूरचा श्री विठ्ठल व रुक्मिणी म्हणजे अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. पांडुरंगाची भक्ती व पंढरपूरची वारी ही गेल्या शेकडो वर्षांची अखंड चालत आलेली परंपरा आहे. पंढरीच्या वारीप्रमाणेच येथील दिवाळीलाही खास महत्त्व आहे. श्री क्षेत्र पंढरपूरमध्ये दिवाळीत दीपोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. सर्व समाजातील लोकांचा यात समावेश असतो. धनत्रयोदशीला लक्ष लक्ष दिव्यांनी चंद्रभागा नदीच्या दोन्ही तिरांवरील घाट उजळून निघतात. हे अप्रतिम नयनमनोहर दृष्य पाहण्यासाठी लोकांची मोठी गर्दी होते.
पंढरपुरात खरे तर विजयादशमीच्या दिवशीच दिवाळीला सुरुवात होते. या दिवशी भगवंत (पांडुरंग) सीमोल्लंघनाला जातात. याच दिवशी श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरावरील निशाणे बदलली जातात. निशाण बदलणे म्हणजेच दिवाळीची सुरुवात झाल्याचे येथील पुजारी व भाविक सांगतात. त्यानंतर दिवाळीच्या पाचही दिवशी सायंकाळी चार वाजता विठ्ठल व रुक्मिणीला अलंकार घातले जातात. देवाच्या खजिन्यातील तोफा व दागिने काढून, सायंकाळी धुपारती झाल्यावर वहीपूजन व लक्ष्मीपूजन केले जाते. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मंदिरातील हिशेबाच्या वह्यांचे पूजन केले जाते. देवाच्या अलंकारांची पूजा म्हणून प्रातिनिधिक स्वरूपात केवळ देवाच्या टोपाची पूजा केली जाते. पूर्वीच्या काळी या काळात सभामंडपात फटाक्यांची आतषबाजी होत होती; परंतु आता सभामंडपात फटाके उडवण्यावर बंदी आल्यामुळे फटाके उडवले जात नाहीत. पूर्वी देवाला किनखापाची वस्त्रे होती. या वस्त्राला सोने व चांदीचा आडवा धागा आणि रेशमाचा उभा धागा होता. म्हणून याला किनखाप म्हणत, अशी आठवण पंढरपुरातील बुजुर्ग व्यक्तिमत्त्व आणि गडकिल्ल्यांचे अभ्यासक अनिल बडवे सांगतात. प्रल्हादमहाराज बडवे यांचे ते वंशज आहेत.
सत्यभामेने नरकासुराचा वध केल्याची आख्यायिका आहे. म्हणून नरकचतुर्दशीला श्री विठ्ठल मंदिरात सत्यभामेची पूजा केली जाते. वसुबारसेच्या दिवशी सवत्स धेनू पश्चिम दरवाजात बांधल्या जातात. तेथे असलेल्या महाराजांकडून गायीची व वासराची पूजा केली जाते. त्यानंतर शेकडो सुवासिनी सवत्स धेनूची पूजा करतात. धनत्रयोदशीला चंद्रभागा नदीच्या दोन्ही काठांवर दीपोत्सव साजरा केला जातो. त्यामुळे चंद्रभागा नदी उजळून निघते. विष्णू पथापासून ते दगडी पुलापर्यंत असलेल्या प्रत्येक घाटावर लाखो दिवे लावले जातात. नदीला पाणी असेल, तर महिला होडीतून नदीपात्रातील पाण्यात दिवे लावून सोडतात. पुंडलिक मंदिर ते दगडी पुलापर्यंत होडीत बसून एकापाठोपाठ एक दिवे सोडले जातात. पाण्याच्या प्रवाहात वाहत जाणाऱ्या दिव्यांचे दृश्य नयनरम्यच असते. हा दीपोत्सव साजरा करण्यासाठी सर्व जाती-धर्मांचे लोक सहभागी होतात. हेच या दीपोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य आहे. अनिल बडवे यांनी साधारण पंधरा वर्षांपूर्वी सुरू केलेल्या या उपक्रमाचे आता परंपरेत रूपांतर झाले आहे.
‘चंद्रभागेच्या पात्रात पूर्वजांच्या समाध्या आहेत. दिवाळीच्या दिवसांत त्या अंधारात राहू नयेत, म्हणून मी दिवाळीत धनत्रयोदशीच्या सायंकाळी दीपोत्सव साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला. यात सर्व समाजातील लोकांचा सहभाग लाभल्याने आता हा उपक्रम परंपरेत रूपांतरित झाला असल्याने मला फार आनंद वाटतो,’ असे अनिल बडवे यांनी सांगितले.
दारुगोळ्याच्या युद्धाची पद्धत पूर्वीच्या काळी पंढरपुरातल्या दिवाळीत दारुगोळ्याच्या युद्धाची पद्धत होती. त्याबद्दल अनिल बडवे यांचे पुत्र अॅड. आशुतोष बडवे यांनी माहिती दिली. (त्याचा व्हिडिओ सोबत दिला आहे.) ती माहिती अशी - पंढरपुरातील दिवाळीला स्वातंत्र्यपूर्व काळापासून धर्मविरहित दिवाळीची परंपरा लाभली आहे. त्या काळात येथील सर्व समाजातील लोक एकत्र येऊन दिवाळीचे पाचही दिवस आनंदात साजरे करत होते. त्या वेळी दिवाळीची तयारी खूपच लवकर सुरू होत होती. आता दीपोत्सव साजरा केला जातो, त्याप्रमाणे दिवाळीच्या प्रत्येक दिवशी चंद्रभागा नदीच्या पात्रात युद्ध करण्याची परंपरा होती. कलगीवाले व तुरेवाले यांच्यात घनघोर युद्ध चालत होते; पण ते तेवढ्यापुरतेच. हे दोन्ही लोक येताना वेगवेगळ्या मार्गाने येत असले, तरी युद्ध संपले, की लगेच एकमेकांच्या हातात हात घालून जात होते. हे युद्ध शस्त्रांचे नव्हते, तर दारूगोळ्याचे होते. त्यासाठी पंढरपुरातील प्रत्येक तालमीत तयारी चाले. त्या काळी आठ रुपयांना एक मण नळ्याची म्हणजे फटाक्यातील दारू मिळत होती. या युद्धात फटाक्यांसाठी नारळ व कवठाच्या कवचाचा मोठ्या प्रमाणात वापर केला जायचा. नारळ व कवठात भुसनळ्याची दारू भरण्याचे काम प्रत्येक तालमीत चालत होते. हे काम तरुण व लहान मुले करत असली, तरी त्यांनी ते काम नीट केले आहे की नाही, याची खात्री करण्यासाठी अनुभवी लोक होते. कवचात दारू व्यवस्थित भरली नाही, तर ते हातात उडण्याची शक्यता असायची. युद्धाच्या काळात यात कोणी जखमी होऊ नये म्हणून अनुभवी लोक त्याची खात्री करायचे.
कलगीवाले शक्तिपूजक, तर तुरेवाले शिवपूजक होते. त्यामुळे शिव आणि शक्ती दिवाळीत एकत्र येत होती. वसुबारसेच्या रात्री या युद्धाला सुरुवात होत होती. चंद्रभागा नदीच्या दक्षिण घाटावरून कलगीवाले, तर उत्तर घाटावरून तुरेवाले युद्धासाठी येत होते. नळा उडला की युद्धाला सुरुवात होत होती. नारळ व कवठाच्या कवचात भरलेल्या दारूचा नळा पेटवला, की त्याचा फोर्स ३५ ते ४० फूट लांब जात होता. दोन्ही हातात नळे धरून कलगीवाले व तुरेवाले यांच्यात समोरासोर युद्ध होत होते. युद्धाच्या वेळी हातातील नळा विझू दिला जात नव्हता. मागील लोक पहिला नळा संपायच्या आतच दुसरा नळा हातात पेटवून द्यायचे. हे युद्ध सुमारे दोन तास चालत होते. यात कोणी जखमी होऊ नये म्हणून काळजी घेतली जायची. यासाठी दोन्ही बाजूचे लोक नदीमध्ये स्नान करून अंगावरील कपडे ओले करत होते. या युद्धात बचावासाठी वडार व फासेपारधी समाज ढाल चालविण्याचे काम करत होता, तर चर्मकार समाज चामड्याची हाताळी करायचा.
या युद्धामध्ये चंद्रभागा घाट किंवा पुंडलिक घाटावर लाल पणती लावली, की कलगीवाल्यांचा पराभव झाला असे मानले जात होते, तर दत्त घाटावर लाल पणती लावली, की तुरेवाल्यांचा पराभव होत होता. युद्ध संपले, की सर्व लोक एकमेकांच्या हातात हात घालून आपापल्या घराकडे निघून जात होते. १९५१पर्यंत दिवाळी अशा प्रकारे साजरी होत होती. त्यानंतर यावर बंदी आल्याने ही परंपरा खंडित झाली; मात्र जातिभेदविरहित दिवाळी दीपोत्सवाच्या निमित्ताने आजही पंढरपुरात साजरी होत आहे.
(‘आठवणीतली दिवाळी’ या दिवाळी अंकातले सर्व लेख एकत्रितरीत्या येथे उपलब्ध होतील.)