Next
तुमच्या-आमच्यातला ‘चंदेरी’ तारा
BOI
Thursday, January 04, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

नंदू माधवसिनेमातला नायक आपल्याला स्वप्नं दाखवतो; पण प्रत्यक्ष जीवनात मात्र तो आपल्यापासून कोसो दूर असतो. म्हणूनच चंदेरी दुनियेत असूनही तुमच्या-आमच्यासारख्या सर्वसामान्यांत मिसळणाऱ्या नंदू माधवसारख्या ताऱ्याचं वेगळेपण मनाला स्पर्शून जातं. सर्वसामान्यांशी माणुसकीचं नातं सांगत त्यांच्याशी सांगड घालणाऱ्या या गुणी अभिनेत्याबद्दल आज पाहू या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या सदरात...
................
चित्रपट म्हटलं, की आपल्या स्वप्ननगरीतला प्रवास आहे, असं वाटू लागतं. जे जे प्रत्यक्षात घडत नाही, घडू शकत नाही ते या स्वप्ननगरीत जाऊन अनुभवावंसं वाटतं. थिएटरमधल्या त्या अंधारात समोरच्या पडद्यावर येणारा नायक/नायिका आपणच होऊन जातो. त्यानं केलेला अन्यायाविरुद्धचा लढा असो वा गरिबीतून एकदम उंचीवर पोहोचलेला यशस्वी उद्योजक असो, आपण त्या नायकाचं रूप घेऊन ते तीन तास त्याचं आयुष्य जगतो. ही स्वप्नं दाखवणारा नायक प्रत्यक्षात कसा असतो? तर तो खरं तर तुमच्या-आमच्यापासून कोसो मैल दूर असतो. त्याचं जग वेगळं असतं. पडद्यावरून सर्वसामान्यांच्या खांद्यावर मित्रासारखी थाप मारणारा, अनोळखी माणसालाही मदत करणारा हा नायक प्रत्यक्षात मात्र आपल्या जवळ असतच नाही... ना आपण त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. मग ही स्वप्नांची नगरी आभासी आहे हे कळलं, की पाय पुन्हा वास्तवातल्या प्रवासाला लागतात. 

...मात्र असा एखादा जादुई नायक, जो तुमच्या-आमच्यासारखाच आहे, त्याच्यात आणि आपल्यात कुठलं अंतर नाहीये, तोही आपल्यासारखा कुणाच्या तरी दुःखानं खरोखरच अस्वस्थ होतो आणि जगाच्या पाठीवर कुठेही आनंदाची घटना घडली की खूश होतो, तुमच्या-आमच्यात मिसळतो, तुमची-आमची सुखदुःखं समजून घेण्याचा प्रयत्न करतो... असा नायक आपल्याला भेटला तर? हो. असा नायक आहे आणि खरं तर तो जसा मला भेटला, तसा तुम्हालाही भेटलाय. या लेखातून आपण त्याला पुन्हा एकदा भेटू या.

या नायकाचं, या अभिनेत्याचं नाव आहे नंदू माधव! नंदू माधव म्हटलं, की ताबडतोब ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा चित्रपट डोळ्यासमोर येतो आणि त्यातले दादासाहेब फाळके नंदू माधवच्या रूपात आपल्याला येऊन भेटतात. त्यांचं झपाटलेपण, त्यांचं असामान्य कार्य, त्यांचं जगणं नंदू माधवनं अगदी हुबेहूब आपल्यासमोर उभं केलंय. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटानं नंदू माधवची वेगळीच ओळख प्रेक्षकांना झाली. यातल्या भूमिकेनं प्रेक्षक आणि नंदू माधवमधला अभिनेता दोघंही समृद्ध झाले. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ चित्रपट करताना दोन-अडीच वर्षं आपण त्यात बुडून गेलो होतो, असं तो म्हणतो. ज्या दिवशी या चित्रपटाची पटकथा त्यानं वाचली, तेव्हा आपल्यालाही ‘युरेका, युरेका’चा फील आला असल्याचं तो आवर्जून सांगतो. हा चित्रपट तयार करताना दिग्दर्शक परेश मोकाशीच्या डोक्यातही नंदू माधव हाच या भूमिकेला न्याय देऊ शकेल, असा विचार होता. त्या काळात दुसरे आलेले प्रस्तावही नंदू माधवनं नाकारले. कारण दिवसरात्र ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ आणि फाळके यांनी त्याच्या तनामनावर ताबा मिळवला होता. सगळे जण ‘याला वेड लागलंय’ असंही म्हणायला लागले होते, इतका तो त्या काळात झपाटला गेला होता. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ प्रदर्शित होईपर्यंत अगदी बोटावर मोजता येण्याएवढेच लोक नंदू माधवला एक अभिनेता म्हणून ओळखत होते. अर्थातच याच गोष्टीचा फायदा या चित्रपटातली फाळकेंची भूमिका करताना त्याला मिळाला. लोकांनी ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ बघितला आणि लोकांना हेच दादासाहेब फाळके किंवा दादासाहेब फाळके असेच असणार असं वाटायला लागलं.

हरिश्चंद्राची फॅक्टरी‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटाचा दिग्दर्शक परेश मोकाशी हा दिग्दर्शक म्हणून ग्रेट आहे. हा चित्रपट करताना त्यातला एक प्रसंग नंदू माधवनं रंगवला; पण परेश मोकाशीला तो काही केल्या पसंत पडेना. त्यानं या प्रसंगात नंदू माधवनं अजिबात रडायचं नाही असं सांगितलं. आता न रडता हा प्रसंग कसा करायचा हे काही केल्या नंदू माधवला कळेना. अखेर नंदू माधवच्या पत्नीची भूमिका करणारी अभिनेत्री विभावरी देशपांडे परेश मोकाशीला म्हणाली, ‘ठीक आहे, मग मला तरी रडू दे.’ त्या वेळी परेश मोकाशी म्हणाला, ‘तुम्हाला रडायची एवढी हौस का आहे? अजिबात रडायचं नाही.’ नंदू माधवला तो म्हणाला, ‘तुला रडायचंच असेल, तर डोळ्यांतून एक थेंबही ओघळू न देता रड आणि हा प्रसंग रंगव.’ नंदूला तरीही जमेना. बरं, इतर दिग्दर्शक जसा प्रसंग स्वतः करून दाखवतात, तसंही परेश मोकाशी करून दाखवेना. आता करायचं काय? मग अनेक चर्चा, वाद, झाले. वैतागलेल्या परेश मोकाशीनं अखेर तो प्रसंग स्वतः करून दाखवला. तो प्रसंग बघून नंदू माधवसह सेटवरचे सगळेच स्तिमित झाले. सगळ्यांच्या तोंडून ‘वा, क्या बात है’ असे शब्द बाहेर पडले. आतापर्यंत आपण आपलं हसणं, रडणं, विनोद करणं असा सगळाच अभिनय एका ठोकळेबाज पद्धतीनं करत होतो आणि भाबड्या प्रेक्षकांना खिळवून ठेवत होतो ही गोष्ट परेशमुळे नंदू माधवच्या लक्षात आली. परेशच्या सांगण्यामागचा अर्थ त्याला कळला आणि त्यानंतर त्यानं तोच प्रसंग असा काही रंगवला, की परेश मोकाशीलाही दाद द्यावी लागली. आजही तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत लोक ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ या चित्रपटाची सीडी खरेदी करून पुन्हा पुन्हा चित्रपट बघताना दिसतात. आयुष्यात अनेक संकटं येऊनही या पात्राचा (दादासाहेब फाळके) आशावाद, चिवटपणा प्रेक्षकांना अंतर्मुख करतो. ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’नं अनेक मानाचे पुरस्कार मिळवले. लोकप्रियताही मिळवली; मात्र नंदू माधवमधल्या विद्यार्थ्यावर हा चित्रपट केल्यानंतर आपल्याला अभिनय करण्यासाठी आणखी खूप शिकायचंय हेच बिंबलं गेलं. 

टपालनंदू माधवची भूमिका असलेला अमोल पालेकर दिग्दर्शित ‘बनगरवाडी’ हा चित्रपट म्हणजे व्यंकटेश माडगूळकरांनी उभं केलेलं अप्रतिम असं चित्रच आहे. नंदू माधवची या चित्रपटातली भूमिका खरं तर छोटीशी, पण त्याच्या कसदार अभिनयानं ती लक्षात राहते. या चित्रपटानं अनेक पारितोषिकं पटकावली. त्यानंतर मैत्रेय बॅनरखाली, त्याची प्रमुख भूमिका असलेला ‘टपाल’ हा चित्रपट आला. एक छोटीशी गोष्ट... पण एखाद्याचं संपूर्ण आयुष्य कसं ढवळून काढते हे सांगणारी! या चित्रपटात एका लहान मुलाचं भावविश्‍व एकीकडे, तर दुसरीकडे मूल नसलेल्या जोडप्याची व्यथा! एकीकडे गावाची सुखदुःखं जाणून त्यांना आपल्या परीनं मदत करणारा साधं जीवन जगणारा पोस्टमास्तर आपल्याला भेटतो, तर दुसरीकडे गावाची न बदललेली मानसिकताही आपल्याला अस्वस्थ करून सोडते. या चित्रपटातलीच नव्हे, तर प्रत्येक चित्रपटातल्या भूमिकेशी नंदू माधव इतका एकरूप होऊन गेलेला दिसतो, की ती तो जगतोच. सरकारनामा, जन गण मन आणि शाळा या चित्रपटातल्या त्याच्या भूमिका लक्षवेधी ठरल्या आहेत. या चित्रपटांची नावं जरी घेतली, तरी सगळ्यात आधी नंदू माधवचं नाव ओठांवर येतं. हरिश्चंद्राची फॅक्टरी, बनगरवाडी, वळू, टपाल, जन गण मन, सरकारनामा, शाळा, मुक्ती, मैं और चार्ल्स, दायरा, अकिरा अशा चित्रपटांत त्यानं भूमिका केली असून, ‘बारायण’ या बारावीची परीक्षा देणाऱ्या मुला-मुलींवर, त्यांच्या पालकांवर आधारित असलेला त्याचा चित्रपट येत्या १२ जानेवारीला प्रदर्शित होतोय.

नंदू माधवचं मूळ गाव मराठवाड्यातल्या बीडजवळचं गेवराई! पुढच्या शिक्षणासाठी औरंगाबादला आल्यावर विवेक दिवटे, बळिराम पवार, मुरलीधर गोल्हार यांसारख्या प्रगतिशील विचारांच्या तरुणांबरोबर त्याची ओळख आणि मैत्री झाली. ही मंडळी नाटकं बसवायची. खरं तर नंदू माधवच्या घरात नाटक होतंच. त्याचा मोठा भाऊ नाटकात काम करायचा आणि नंदू माधव त्याला ‘बॅकस्टेज’ला मदतही करायचा; पण आपण पुढे या क्षेत्रात जाऊ असा विचार नंदू माधवनं त्या वेळी केला नव्हता. आपण अपघातानं नव्हे, तर अचानक या क्षेत्रात आलो असं तो आजही म्हणतो ते याचमुळे! मित्रांमुळे नाटकांच्या प्रॅक्टिसला जाणं, वाद-चर्चा यांमध्ये भाग घेणं, आपली मतं नोंदवणं असं सगळं सुरू झालं. ‘करायला गेलो एक’ या नाटकात बायल्या पुरुषाची एक भूमिका होती आणि ती करण्यासाठी कोणी तयारच होईना. त्या वेळी इतरांचं हे वागणं नंदू माधवला आवडलं नाही. कुठलेही आढेवेढे न घेता त्यानं आपण ही भूमिका करायला तयार आहोत असं सांगितलं आणि नाटक केलं. त्यानंतर नंदू माधवनं राज्य नाट्य स्पर्धेसाठी ‘भग्न मूर्ती’ नावाचं केलं आणि त्यात प्रथम आणि इतरत्र अनेक बक्षिसं मिळवली. 

नंदूनं भौतिकशास्त्र विषय घेऊन बीएस्सी पदवी मिळवली. घरात वडील, भाऊ, बहीण असे सगळेच वकील असल्यानं आपण वकील व्हावं असं त्याला वाटत नव्हतं; पण सगळ्यांच्या आग्रहामुळे त्यानं औरंगाबादच्या लॉ कॉलेजला प्रवेश घेतला. त्यानं कायद्याची पदवी मिळवली. लॉ करत असताना अभ्यास सोडून खेळणं, हुंदडणं, नाटकं बघणं-करणं, पथनाट्य करणं, वक्तृत्व स्पर्धेत भाग घेणं असं सगळं काही केलं. आपण अभ्यासात फारसे हुशार नव्हतो असं नंदू माधव प्रामाणिकपणे सांगतो. पुढे नाटक करायचं आणि तेही जमलं नाही तर गावी जाऊन नांगर हाती घेऊन शेती करायची असं त्यानं ठरवलं होतं; पण तसं व्हायचं नव्हतं. नंदूला नाटकं आवडायला लागली. बादल सरकार, हबीब तन्वीर, सत्यजित रे, अकिरा कुरोसावा यांच्या प्रतिभेनं तो प्रेरित झाला. देविदास तुळजापूरकर, सुरेंद्र जोंधळे, महावीर जोंधळे, रझिया पटेल अशा प्रगतिशील विचारांची माणसं आणि त्यांचं साहित्य वाचायला आणि अनुभवायला मिळत होतं. याच दरम्यान बाबा आढावांची अनेक भाषणं त्यानं ऐकली. 

जन गण मननंदू माधवनं आपलं नाव बदललं कसं या बाबतीतली गोष्ट अशी - नंदू माधव जेव्हा पहिल्यांदा पुण्यात आला, तेव्हा सामाजिक क्षेत्रात झोकून देऊन काम करणारी अनेक माणसं त्याला भेटली, दिसली. यात मुक्ता मनोहरसारख्या हाडाच्या कार्यकर्त्यांनी आपलं आडनाव लावणं सोडलं होतं. तोच प्रभाव त्याच्यावर पडला आणि त्यानं आपलं आडनाव लावणं सोडलं. इतकंच काय, फक्त आडनाव सोडण्याचा तो प्रश्ना नव्हता, तर जेव्हा लग्नाविषयी घरून आडून आडून बोलणी सुरू झाली, तेव्हा नंदूनं आपण जात बघून लग्न करणार नाही हे ठामपणे सांगितलं. तसंच कोणी येवो, न येवो आपण नोंदणी पद्धतीनेच (रजिस्टर्ड मॅरेज) लग्न करणार असा निर्धार करून ते तसंच केलं. कुठल्याही बाबतीत सडेतोड आणि स्पष्ट भूमिका घेण्याचा त्याचा स्वभाव होता आणि आजही तो तसाच आहे. जे वाचलं, जे अनुभवलं, जे जाणलं त्याप्रमाणे त्याचा जगण्याचा दृष्टिकोन बनत गेला. लहानपणापासूनच नंदू माधवला देवधर्म, कर्मकांड यात रस नव्हता आणि आजही नाही. 

‘हरिश्चंषद्राची फॅक्टरी’, ‘वळू’, ‘टपाल’ यांसारखे चित्रपट करत असतानाही नंदू माधवनं नाटकाची साथ सोडली नाही. खरं तर व्यावसायिक नाटक म्हणून त्याचा अभिनय लक्षात राहिला तो शफाअत खान लिखित ‘शोभायात्रा’ या नाटकातल्या महात्मा गांधींच्या पात्रातून! त्याच्यातला बापट अनेकदा कानाशी येऊन ओरडायचादेखील. या नाटकातल्या भूमिकेबद्दल ‘कलागौरव’तर्फे नंदू माधवला सर्वोत्कृष्ट विनोदी नटाचा पुरस्कार जाहीर झाला; मात्र नंदू माधवनं तो नाकारला आणि या नाटकातून समाजाचं विदारक, भयावह असं चित्र आपण साकारत असताना आपल्याला मात्र विनोदी नटाच्या पुरस्कारानं गौरवलं जावं यात नुकसान होण्याची जास्त शक्यता असल्याचं त्यानं बोलून दाखवलं. परीक्षकच नाटकाकडे अशा नजरेनं बघणार असतील, तर प्रेक्षकदेखील अंतर्मुख न होता, उलटाच विचार घेऊन परततील असं त्याचं म्हणणं होतं. हा पुरस्कार दुसऱ्या एखाद्या विनोदी नटाला द्यावा, असंही त्यानं नम्रपणे सांगितलं.

शफाअत खान लिखित ‘शोभायात्रा’ आणि ‘बम्बई के कौए’, अजित दळवी लिखित ‘डॉक्टर तुम्हीसुद्धा’, महेश एलकुंचवार लिखित ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगान्त’, पु. ल. देशपांडे लिखित ‘आम्ही लटिके ना बोलू’, राजा पारगावकर लिखित ‘जरा वजन ठेवा’, हर्ष शिवशरण लिखित ‘घर घर’ अशा नाटकांमधून नंदू माधवनं अभिनय केला. त्यानंतर त्यानं ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाची निर्मिती आणि दिग्दर्शन केलं. हे नाटक औरंगाबाद, पुणे आणि मुंबई अशा तीनच ठिकाणी करण्याचं ठरवलेलं असताना प्रत्यक्षात या नाटकाला इतका प्रचंड प्रतिसाद मिळाला, की त्या नाटकाचे ४००च्या वर प्रयोग झाले. ते नाटक खूपच गाजलं. त्यावर उलटसुलट चर्चाही झाल्या; मात्र या नाटकानं प्रेक्षकाला अंतर्मुख करून सोडलं. आजच्या एकूणच सामाजिक व्यवस्थेचं वास्तव दर्शन या नाटकानं केलं होतं. लोकांनी नंदू माधवला डोक्यावर घेतलं; पण त्याचबरोबर या नाटकावरून काही लोक चिडले आणि त्यांनी त्याला मारहाणीच्या धमक्याही दिल्या. अशा वेळी नंदू माधवचे मित्र, हितचिंतक आणि चाहते यांनी त्याला ‘अरे वा, तुम्हाला धमक्या येताहेत म्हणजे आता तुम्ही जुनाट संस्थेच्या हिटलिस्टवर आहात आणि तुमचं मनःपूर्वक अभिनंदन’ असं गमतीनं म्हणायला सुरुवात केली. 

नंदू माधव केवळ उत्तम अभिनेताच नाही, तर तो एक हाडाचा कार्यकर्ता आहे. समाजातल्या विसंगती, अन्याय्य गोष्टी त्याला बेचैन करतात. एके दिवशी तो चक्क आम आदमी पक्षाच्या वतीनं निवडणुकीला उभा राहिला. नंदू माधव या नावावरून लोकांना त्याच्या जातीचा बोध होईना. त्या वेळी अनेक पक्षांच्या लोकांनी त्याला या ना त्या प्रकारे जातीविषयी बोलतं करायचा प्रयत्न केला; पण नंदू माधव त्या वेळी मूग गिळून गप्प राहिला. कोणी त्याला वंजारी समाजाचं समजायचा, तर कोणी मराठा. कोणी आणखी काही. त्याची जात ठरवून त्याला त्या त्या जातीची किती मतं मिळतील, याबद्दलची गणितंही लोकांनी मांडायला सुरुवात केली. एका चॅनेलनं तर नंदू माधवला ‘निवडणुकीकडे तुम्ही कसं बघता,’ असा प्रश्न करत त्याचं पूर्ण नाव विचारलं. मानवतावाद हा एकच धर्म मानणाऱ्या नंदू माधवने आपलं पूर्ण नाव नंदू माधव कांबळे, नंदू माधव कुलकर्णी, नंदू माधव केंद्रे, नंदू माधव कुरेशी, नंदू माधव कापडिया अशा वेगवेगळ्या प्रकारे सांगितलं. ‘आता मला नेमकी कुठल्या कुठल्या जातीची मतं मिळणार आहेत, ते तुम्हीच सांगा,’ असंही तो म्हणाला. चॅनेलचा निवेदक म्हणाला, ‘तुम्ही छान बोललात.’ त्यावर नंदू माधव म्हणाला, ‘मी बोललो पण तशी कृती तुम्ही करा.’ नंदू माधवनं ‘सांगड’च्या बॅनरखाली कार्यकर्त्यांसाठी शिबिरं आयोजित केली. त्यातून कार्यकर्त्यांना परेश मोकाशी आणि भालचंद्र नेमाडेंसह वेगवेगळ्या क्षेत्रांतल्या लोकांशी संवाद आणि चर्चा करता आली.

लेखिका दीपा देशमुख यांच्यासह नंदू माधव (मध्यभागी)नंदू माधवने ‘जिस देश मे गंगा रहता है’ या चित्रपटात गोविंदाचा मित्र इक्बाल याची भूमिका साकारली, तर ‘अकिरा’ या चित्रपटात एक भ्रष्ट पोलिस अधिकारी रंगवला. २०१६ सालची त्याची ‘गुगल’ची एक जाहिरात कोणालाही भावनाविवश करणारी आहे. (ती पाहण्यासाठी येथे क्लिक करा.) नंदू माधवनं त्यात एका वृद्ध पित्याची भूमिका केली आहे. तरुणपणी मुंबईला जाऊन हिरो बनायचं स्वप्न अधुरं राहिलेला हा माणूस आता निवृत्तीनंतरचं आयुष्य जगत असतो. त्याचा मुलगा मात्र त्याची स्वप्नं त्याला पुन्हा कशी बघायला लावतो आणि आपल्या वडलांच्या दडपून टाकलेल्या स्वप्नांमध्ये गुगलच्या मदतीने कसे रंग भरतो, ते त्या जाहिरातीत दाखवलं आहे. नंदू माधवचा यातला अभिनय म्हणजे, ‘पानी रे पानी तेरा रंग कैसा, जिस में मिलाओ लगे उस जैसा’ अशा प्रकारचा आहे. त्याला ज्या भूमिकेत टाकलं, त्या भूमिकेचं तो सोनं करून टाकतो. 

बारायणनंदू माधव हा आपल्याला फक्त स्वप्ननगरीतल्या आभासी नगरीत नेत नाही, तर तो आपल्या अभिनयातून वास्तवाचं भान करून देत अर्थपूर्ण जगणं शिकवतो. म्हणूनच तर तो अनवट वाटेवरचे काटे वेचून त्यावर फुलांची उधळण करत चालणारा एक मनस्वी कलावंत आहे. बारावीमध्ये असलेले विद्यार्थी, त्यांचे पालक आणि शिक्षक अशा साऱ्यांच्या प्रश्नांरची हाताळणी करणारा ‘बारायण’ हा त्याची भूमिका असलेला चित्रपट येत्या १२ जानेवारीला प्रदर्शित होतोय. तोही आतापर्यंतच्या त्याच्या कारकिर्दीला शोभेल असा वेगळा नि नक्कीच पाहण्यासारखा असेल, असा विश्वास वाटतो.
(नंदू माधव यांच्या कारकिर्दीबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा.)

- दीपा देशमुख
मोबाइल : ९५४५५ ५५५४०
ई-मेल : deepadeshmukh7@gmail.com

(दीपा देशमुख या प्रसिद्ध लेखिका असून, त्या वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात.)

(दर १५ दिवसांनी, गुरुवारी प्रसिद्ध होणाऱ्या ‘अनवट वाटेवरचे वाटसरू’ या लेखमालेतील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/M3NCtW या लिंकवर उपलब्ध आहेत.) 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
पौर्णिमा केरकर About
मॅडम, तुम्ही खुप चांगल काम करता,ठिकठिकाणी विखुरलेल्या अभिजात कौशल्यपूर्ण व्यक्तिमत्व शब्दबद्ध करणे तसे कठीणच !तुमची शैली विषयाची मांडणी सुरेख!!
0
0
Bhawana Kulkarni About
Nice article on Nandu Madhav. Recently saw him in Bangarwadi movie. Great actor.
2
0

Select Language
Share Link
 
Search