Next
रिस्क आणि रिटर्न
BOI
Saturday, April 07, 2018 | 03:45 PM
15 0 0
Share this story

शेअर्समधील गुंतवणुकीत अन्य गुंतवणुकीच्या पर्यायापेक्षा (उदा : बँक एफडी, पीपीएफ, एनएससी) जास्त रिस्क (जोखीम) असते. यामुळे  सामान्य गुंतवणूकदार शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यास धजावत नाही. परिणामी, कमी रिटर्नवर (परतावा) नाईलाजाने गुंतवणूक करत असल्याचे दिसून येते. रिस्क आणि रिटर्नच्या नात्याविषयी सविस्तर माहिती घेऊ या ‘समृद्धीची वाट’ या सदरात...
......
 चांगला रिटर्न हवा असेल, तर रिस्क घेण्याची तयारीही असली पाहिजे. गुंतवणुकीत असणारी रिस्क समजून घेतल्यास निर्णय घेणे सोपे होते. यासाठी नेमका रिटर्न कसा मिळतो हे समजणे आवश्यक आहे. उदा: बँक एफडी, पीपीएफ, एनएससी यातील गुंतवणुकीचा रिटर्न हा व्याजाच्या स्वरुपात मिळतो. तो गुंतवणुकीच्या कालावधीसाठी ठरलेल्या व्याजदरानुसार मिळतो. यामध्ये गुंतवलेली रक्कम सुरक्षित असते व मिळणारे व्याजही ठराविक असते; तसेच गुंतविलेली मूळ रक्कम मुदतीनंतर परत मिळत असते. यामुळे यातील गुंतवणूक सुरक्षित वाटते. असे असले तरी सध्या मिळणारे व्याज हे जेमतेम सहा ते सात टक्के इतकेच आहे, हे ध्यानात घेणे आवश्यक आहे.

तेच जर आपण आवश्यक तो अभ्यास करून अथवा योग्य सल्ला घेऊन शेअर्समध्ये गुंतवणूक केली, तर सुमारे १४ ते १५ टक्के इतका रिटर्न (बँक एफडी, पीपीएफ,एनएससी यातील गुंतवणुकीच्या सुमारे दुप्पट )मिळू शकतो. शेअर्समधील रिटर्न हा शेअरच्या किमतीत होणारी चढ उतार व दरम्यानच्या काळात मिळणारा लाभांश (डिव्हिडंड) यावर अवलंबून असतो. असे असले तरी प्रामुख्याने शेअर्सच्या किमतीत होणाऱ्या बदलावर जास्त अवलंबून असतो. उदा : आपण एक वर्षापूर्वी एखादया कंपनीचा दहा   रुपये दर्शनीमूल्य असलेला शेअरबाजारातून १०० रुपये किंमतीला खरेदी केला आहे. त्याची आजची बाजारातील किंमत एकशे २२ रुपये आहे व या कालावधीत कंपनीने  ५० टक्के डिव्हिडंड दिला असेल तर या गुंतवणुकीतून मिळालेला रिटर्न  (१२२-१००)+५ /१००=२७ टक्के  इतका आहे. याउलट या शेअरची आजची बाजारातील किंमत ८८ रुपये असेल, तर मिळालेला रिटर्न  (८८-१००)+५ /१०० = -७ टक्के इतका असेल. यावरून आपल्या लक्षात येईल,की  शेअर गुंतवणुकीतील रिटर्न हा प्रामुख्याने खरेदीची किंमत व बाजारातील आजची किंमत यावर अवलंबून असतो. शेअर्सच्या किमती या वेळोवेळी विविध कारणांनी कमी अधिक होत असतात. यामुळेच मिळणाऱ्या रिटर्नबाबत शाश्वती देता येत नाही. म्हणूनच गुंतवणुकीत रिस्क असते कारण आपण गुंतविलेली रक्कम तेवढीच राहील याची खात्री नसते. आपण दीर्घ कालावधीसाठी (किमान चार ते पाच वर्षे ) चांगल्या व प्रस्थापित कंपनीच्या शेअर्स मध्ये गुंतवणूक केली, तर १४ ते १५ टक्के किंवा त्याहून अधिक रिटर्न मिळण्याची शक्यता असते.

 यातील गुंतवणुकीतून फायदा अथवा तोटा कसा होतो हे पुढील दोन उदाहरणावरून ध्यानात येईल.
- ऑक्टोबर २००३ मध्ये ज्यांना मारुती मोटर्सच्या आयपीओ शेअर्स मिळाले तेंव्हा त्याची किंमत प्रती शेअर १२५ रुपये होती. आज या शेअरची बाजारातील किंमत सुमारे नऊ हजार १९५ रुपये इतकी आहे. म्हणजे जर एखाद्याने त्या वेळी १०० शेअर्स घेतले असतील, तर फक्त १२ हजार ५०० रुपये एवढी रक्कम गुंतविलेली आहे;मात्र त्याची आजची किंमत सुमारे नऊ लाख १९ हजार ५०० रुपये इतकी आहे. हीच रक्कम बँकेत ठेवली असेल आणि समजा व्याज दर दहा टक्के असेल व चक्रवाढ व्याज आणि मुद्दल एकत्रित असेल तर ती रक्कम केवळ ४७ हजार ५०० रुपये इतकीच असेल. विशेष म्हणजे आज जरी शेअर्स विकले तरी या गुंतवणुकीस बदलत्या लॉंग टर्म कॅपीटल गेन टॅक्स(एलसीजीटी) नियमानुसार दहा टक्के एलसीजीटी भरावा लागणार नाही. कारण मारुती सुझुकीचा दि. ३१ जानेवारी २०१८ चा भाव  नऊ हजार ५१० इतका होता. हा आजच्या भावापेक्षा जास्त असल्याने भांडवली नफा होत नसल्याने दहा टक्के  एलसीजीटी लागू होणार नाही.

- याउलट जानेवारी २००८ मध्ये बाजारात आलेल्या रिलायन्स पॉवर कंपनीचा शेअर आयपीओमध्ये   चारशे ३० रुपयांना मिळाला व त्याची आजची किंमत  ४१ रुपये ६५ पैसे इतकीच आहे. ज्या गुंतवणूकदारांनी या शेअर्समध्ये गुंतवणूक केली त्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

थोडक्यात, शेअर्स मधील गुंतवणुकीची जोखीम समजून घेऊन योग्य वेळी योग्य कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक केल्यास चांगला रिटर्न मिळू शकतो.

- सुधाकर कुलकर्णी 
(लेखक पुण्यातील सर्टिफाइड फायनान्शियल प्लॅनर आहेत.)

(शेअर बाजार, तसेच म्युच्युअल फंडातील गुंतवणूक जोखीमपूर्ण आहे. ‘समृद्धीची वाट’ या सदराचा उद्देश वाचकांना गुंतवणुकीसंदर्भातील अशा विविध बाबींची माहिती करून देऊन दिशा दाखवणे हा आहे. कोणत्याही प्रकारची गुंतवणूक करताना वाचकांनी स्वतःच्या जबाबदारीवरच करावी. त्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’ कोणत्याही प्रकारे जबाबदार नसेल. वाचकांनी गुंतवणुकीसंदर्भातील आपल्या शंका, प्रश्न article@bytesofindia.com या ई-मेलवर पाठवावेत. निवडक प्रश्नांना या सदरातून उत्तरे दिली जातील. हे सदर दर शनिवारी आणि रविवारी प्रसिद्ध होते. त्यातील लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/Vb1kM6 या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link