Next
ओ दूर जानेवाले...
BOI
Sunday, June 10, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

आपल्या आईकडून सौंदर्य नि संगीताचा वारसा घेऊन जन्माला आलेल्या आणि गायिका-अभिनेत्री म्हणून कारकीर्द गाजविणाऱ्या सुरैयाचा १५ जून हा जन्मदिन. त्या निमित्ताने ‘सुनहरे गीत’ सदरात आस्वाद घेऊ या सुरैयावर चित्रित झालेल्या आणि तिनेच गायलेल्या ‘ओ दूर जानेवाले...’ या गीताचा...
..............
प्रत्येक महिन्यातच चित्रपटसृष्टीतील अनेक कलावंतांचे जन्मदिन आणि स्मृतिदिन असतात. जून महिना तरी त्याला अपवाद कसा असेल? आपल्या आईकडून सौंदर्याचा वारसा घेऊन गायिका-अभिनेत्री सुरैया १५ जून १९२९ रोजी लाहोरमध्ये जन्माला आली होती. ती दीड वर्षाची असतानाच तिचे आई-वडील लाहोरहून मुंबईला आले. त्यामुळे तिचे पुढील आयुष्य मुंबईतच गेले.

सौंदर्य आणि संगीत या दोन्ही गोष्टी सुरैयाने आपल्या आईकडून घेतल्या! संगीताचे शास्त्रीय शिक्षण तिने कधी घेतले नव्हते. निसर्गदत्त गळ्यावरच ती गाऊन गेली. देविकाराणी आणि रमोला या हिंदी चित्रपटसृष्टीतील कलावंतांचा आदर्श लहानपणी सुरैयासमोर होता. राज कपूर आणि मदनमोहन हे सुरैयाचे बालमित्र होते. त्यांच्याबरोबर बालपणी सुरैया रेडिओवरील लहान मुलांच्या कार्यक्रमात सहभागी होत असे.

वयाच्या अकराव्या वर्षी ‘मोहन पिक्वर्स’ या संस्थेच्या ‘ताजमहल’ या चित्रपटामध्ये बालकलाकार म्हणून तिने काम केले. १९४१मध्ये तो चित्रपट प्रदर्शित झाला. ही सुरैयाच्या कारकिर्दीची सुरुवात! ‘शारदा’ (१९४२) चित्रपटातील मेहताब या अभिनेत्रीसाठी दिलेल्या आवाजामुळे तिची गायनातील कारकीर्द सुरू झाली. १९४३मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘इशारा’ या चित्रपटातून सुरैया तरुण नायिका म्हणुन पुढे आली. पुढे अनेक चित्रपटांतून भूमिका करून, गाणी गाऊन तिची चित्रपटसृष्टीतील वाटचाल १९६३मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘रुस्तम सोहराब’ या चित्रपटापर्यंत येऊन थांबली.

सुरैयाच्या नायिका म्हणून पहिल्या चित्रपटाचे नायक होते पृथ्वीराज कपूर आणि तिच्या कारकिर्दीतील अखेरच्या चित्रपटाचे नायकही पृथ्वीराज कपूरच होते, हा एक मोठा विलक्षण योगायोग आहे. आपल्या या वीस वर्षांच्या कारकिर्दीत सुरैय्याने पृथ्वीराज कपूर यांच्याव्यक्तिरिक्त प्रेम आदिब, मोतीलाल, रेहमान, सुरेश, श्याम, नासिरखान, जयराज, करण दिवाण अशा अनेक अभिनेत्यांबरोबर अनेक चित्रपटांतील नायिका साकार केली होती. तथापि देव आनंदबरोबरचे सुरैयाचे चित्रपट गाजले, चर्चेत राहिले. नायक-नायिकेची ही जोडी चित्रपटप्रेमींच्या स्मृतींच्या दालनात आजही विराजमान आहे. दोघेही दिसायला अप्रतिम! दोघांची मनेही जुळली होती; पण चित्रपटकथेत शोभून दिसावे, असे ‘धर्माच्या भिंतीचे वास्तव’ मध्ये उभे राहिले व ते दोघे त्यामुळे एकत्र येऊ शकले नाहीत.

‘विद्या’, ‘जीत’, ‘अफसर’, ‘शायर’, ‘ दो सितारे’, ‘निली’, ‘सनम’ अशा चित्रपटांतून देव आनंद आणि सुरैया एकत्रपणे रसिकांपुढे आले होते; पण आयुष्याच्या वाटा वेगळ्या झाल्यावर दोघांनीही एकमेकांबद्दल कटुता बाळगली नाही! ‘पैदायशी रोमँटिक और बेहद शरीफ’ असे सुरैया देव आनंदबद्दल सांगायची आणि ‘बडी स्टार होकर भी उस में एक मन लुभानेवाली मासुमियत थी’ असे देव आनंद सुरैयाबद्दल बोलत असे!

अभिनेत्री सुरैया आणि गायिका सुरैया असे तिच्या कलाजीवनाचे दोन भाग दिसून येतात. तिने अनेक संगीतकारांकडे गाणी गायली. त्यामध्ये खुर्शीद अन्वर, गुलाम मोहम्मद, हंसराज बहल, जमाल सेन, अनिल विश्वास, सचिन देव बर्मन अशा संगीतकारांचा समावेश होतो. परंतु हुस्नलाल-भगतराम यांचे संगीत आणि सुरैयाचा स्वर म्हणजे यशाची हमी, हे समीकरण एकेकाळी जुळून गेले होते. १९४८चा ‘आज की रात’ हा संगीतकार हुस्नलाल-भगतराम आणि सुरैया एकत्र आलेला पहिला चित्रपट! नंतर प्यार की जीत, बालम, नाच, सनम अशा अनेक चित्रपटांतून सुरैया गात गेली व हुस्नलाल-भगतराम संगीत देत गेले. सुरैयाच्या एकूण कारकिर्दीत तिने यांच्यासोबतच जास्त गाणी गायल्याचे दिसून येते. संगीतकार नौशाद यांचेही सुरैयाच्या कलाजीवनात खास स्थान आहे. नौशाद यांच्या श्रवणीय चाली आणि सुरैयाचा मधुर स्वर एकत्र येऊन ‘दर्द’, ‘दिल्लगी’, ‘दीवाना’ या चित्रपटांतील मधुर गीते रसिकांना मिळाली.

सुरैयाचा विचार करताना मिर्झा गालिब यांच्या रचनांचा उल्लेख आवर्जून करावासा वाटतो. कारण संगीतकार गुलाम मोहम्मद यांनी संगीत दिलेल्या मिर्झा गालिब चित्रपटातील गीते सुरैयाने अप्रतिमपणे साकार केली होती. विशेषतः  ‘दिल ए नादान तुझे हुआ क्या है....’ ही सुरैयाने गायलेली गालिबची गझल ‘माइलस्टोन’ बनून राहिली आहे. वास्तविक पाहता हीच गझल १९४९च्या ‘हंटरवाली की बेटी’ या चित्रपटात, तसेच १९५०च्या ‘कश्मीर हमारा है’ या चित्रपटाही होती; पण आज या गझलेचे नाव काढले, की सुरैयाच्या स्वरातील गझलच चटकन आठवते. ‘मिर्झा गालिब’ चित्रपटानंतर सुरैयाच्या कारकिर्दीला ओहोटी लागली. १९५९-६०मध्ये तिचा एकही चित्रपट आला नाही. त्यानंतर १९६१मध्ये ‘शमा’ आणि १९६३ मध्ये ‘रुस्तम सोहराब!’ नंतर ती साऱ्यापासून विरक्त झाली. सार्वजनिक कार्यक्रमात जाणे तिने टाळले. जगाबरोबरच्या नात्याचे पाश तिने तोडून टाकले. अखेर ३१ जानेवारी २००४ रोजी तिने या जगाचा निरोप घेतला.

अभिनय व मधुर आवाज हे सुरैयाचे वैशिष्ट्य होते. हिंदी चित्रपट आणि हिंदी चित्रपटगीते यांच्या खजिन्यात अनमोल रत्नांची भर टाकणाऱ्या या गायिका-अभिनेत्रीची अनेक सुनहरी गीते आहेत. त्यापैकीच एक सुनहरे गीत आज पाहू या! चित्रपट ‘प्यार की जीत’, संगीतकार हुस्नलाल-भगतराम, गीतकार कमर जलालाबादी. हा चित्रपट १९४८चा! म्हणजे ७० वर्षे झाली, तरीही हे गीत अजूनही श्रवणीय वाटते. एक प्रेमिका! प्रियकरावर खूप खूप प्रेम करणारी! पण त्याच्यापासून दुरावलेली! तो दूर चालला आहे, तेव्हा ती आर्ततेने त्याला साद घालून कळकळीने सांगते - 

ओ दूर जानेवाले वादा न भूल जाना 
रातें हुई अंधेरी, तुम चाँद बन के आना

(मला सोडून दूर जाणाऱ्या प्रियकरा) मला दिलेला शब्द (माझ्याशी केलेला वायदा) तू विसरून जाऊ नकोस. (तुझ्या समीप नसल्याने) काळोखाने दाटलेल्या या रात्री (त्या उजळून टाकण्यासाठी) तू चंद्र बनून ये!

येथे कवीच्या कल्पनेची कमाल बघा! हिंदी चित्रपटगीतांत अनेक वेळा चंद्राची उपमा देऊन प्रेयसीच्या सौंदर्याचे वर्णन केले जाते; पण इथे प्रेयसी प्रियकराला चंद्राची उपमा देऊन तो चंद्रप्रकाश सौख्य देणारा ठरेल अशी अपेक्षा करते.
पुढे ती स्वतःची दु:खद अवस्था सांगताना म्हणते - 

तुम भी अगर न आए मेरा कहाँ ठिकाना 

ज्यांना आपले समजायचे, ते लोक परके होऊन जातात (तू पण त्यांच्यातीलच एक निघालास का?) हा समाज वैरी होतो. (आणि माझ्या नशिबी आलेल्या या अशा अवस्थेत) जर तू आला नाहीस तर...? मी कोठे जायचे? (म्हणूनच तू ये!)

आपले दुःख पुढे व्यक्त करताना ती म्हणते -

आजा किसी की आँखे रो रो के कह रही हैं
ऐसा न हो के हम को कर दे जुदा जमाना

अश्रू ढाळून ढाळून कोणाचे तरी नेत्र (तुझ्या परतीसाठी) साद घालत आहेत (याची तुला काही जाणीव आहे का?) (ते कोणाचे तरी म्हणजे माझेच नेत्र आहेत.) (जर तू परत आला नाहीस तर) तुझे व माझे मीलन होऊ नये म्हणून या (निष्ठुर) समाजाने काही करण्याआधीच तू ये! (तू का येत नाहीस?)

फक्त दोन कडव्यांचे हे गीत! साध्या-सोप्या शब्दांत तयार केलेले! ते श्रवणीय करण्याचे संगीतकाराचे कौशल्य जाणवते! संगीतकार हुस्नलाल-भगतराम या जोडीचे हेच वैशिष्ट्य होते. ही संगीतकारांची पहिली जोडगोळी! नंतर शंकर-जयकिशन आले! पंजाबी ठेका, खासकरून मातीच्या घड्यावर हातात खडा घेऊन धरलेला ‘ मटक्याचा ठेका’ हे हुस्नलाल-भगतरामच्या संगीताचे वैशिष्ट्य! त्या आधारे त्यांनी सुंदर सुंदर गीते संगीतात गुंफली! या गीताचा दुःखी आशय लक्षात घेऊन त्यांनी साजेशी चाल, पार्श्वभूमीवर एक मंद ठेका ठेवून बांधली आहे. त्याची लज्जत गीत ऐकल्याशिवाय कळणार नाही. ‘मुरलीवाले मुरली बजा...’ गाताना खट्याळ आवाजात भाव व्यक्त करणारी सुरैया ‘नैन दीवाने इक नही माने....’ गाताना मनाचा हट्टीपणा एका वेगळ्या स्वरात व्यक्त करणारी सुरैया, ‘परवानों से प्रीत सीखकर....’ गाताना आपल्या प्रेमाची महती एका जोशपूर्ण आवाजात गाणारी सुरैया, ‘प्यार की जीत’मधील वरील गीतात एक असा ‘दर्द’ साकार करते, की हे गीत आपल्या हृदयाला भिडते. तो तिचा आवाज ऐकण्यासारखा आहे.

आवाजाचे विविध पैलू असणारी सुरैया अभिनयामध्येही सरस होती आणि सौंदर्य म्हणाल तर प्रत्यक्ष ‘मदनाचा पुतळा’ जिच्यावर भाळतो ते सौंदर्य कसे असेल, हे काय वेगळे सांगायला हवे? हिंदी चित्रपटसृष्टी संपन्न करणारी ही गायिका-अभिनेत्री व तिचे ‘सुनहरे’ गीत ‘सुनहऱ्या’ गत दिवसांची आठवण ताजी करणारे व तिलाही ‘ओ दूर जानेवाले’ म्हणत साद घालणारे!

- पद्माकर पाठकजी
मोबाइल : ८८८८८ ०१४४३

(लेखक चित्रपट समीक्षक आणि जुन्या चित्रपटगीतांचे अभ्यासक आहेत.दर रविवारी प्रसिद्ध होणाऱ्या त्यांच्या ‘सुनहरे गीत’ या सदरातील सर्व लेख https://goo.gl/8ABN2G या लिंकवर एकत्रितपणे उपलब्ध आहेत.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search