Next
अवघड विज्ञान सोपं करणाऱ्या अंजलीबाई
मानसी मगरे
Friday, October 19 | 05:12 PM
15 1 0
Share this story

अंजली मानेविज्ञान हा जास्तीत जास्त प्रात्यक्षिकांद्वारे शिकवायचा विषय आहे. म्हणूनच नवी मुंबईतील रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलमध्ये कार्यरत असलेल्या अंजली माने त्यांच्या शाळेतील मुलांना ‘सायंटिफिक टॉइज’च्या माध्यमातून शिकवतात. केवळ शाळेतच नव्हे, तर अहमदनगर जिल्ह्यातील आदिवासी भागात असलेल्या त्यांच्या मूळ गावी जाऊन तिथल्या मुलांनाही त्या हे प्रयोग करून दाखवतात. मुलांपर्यंत विज्ञान प्रभावीपणे पोहोचवणाऱ्या या शिक्षिकेशी साधलेला हा संवाद... नवरात्रौत्सवानिमित्ताने ‘तुजऐसी नाही’ या मालिकेत...
............
विज्ञानाची आवड तुम्हाला अगोदरपासूनच होती का? हा उपक्रम कसा सुरू झाला?
- आपल्या सभोवतालच्या प्रत्येक गोष्टीत विज्ञान आहे. ते या ना त्या स्वरूपात सतत आपल्या अवती-भोवती असते. शिवाय आजकालचे आपले आयुष्य हे पूर्णतः विज्ञानावर अवलंबून आहे. कोणतीही गोष्ट म्हणजे उदाहरणार्थ एखादे यंत्र कसे चालते हे समजून घेण्यासाठी आपल्याला विज्ञानाचा आधार घ्यावा लागतो. या व अशा अनेक गोष्टींच्या उत्सुकतेपोटी विज्ञानाची आवड निर्माण झाली. हळूहळू घरी सहज शक्य होणारे आणि घरातल्याच काही वस्तू वापरून करता येणारे असे काही विज्ञानाचे प्रयोग करून पाहू लागले. त्यात मन रमत गेले. मग ती सवयच बनली. पुढे सुदैवाने शिक्षकी पेशात आले. शाळेत मुलांना शिकवत असताना तिथे त्यांना असे छोटे छोटे प्रयोग करून दाखवता येतील असा विचार केला. त्यातून हळूहळू मुलांच्या प्रतिसादानुसार हे वाढत गेले. 

आजच्या विज्ञान शिकवण्याच्या पद्धतीत काही बदल व्हावेत, असे वाटते का?
- हो. नक्कीच बदल अपेक्षित आहेत. पूर्वीची खडू आणि फळा ही पद्धती आपण आता हळूहळू बदलत आहोत. त्याचप्रमाणे आता विज्ञान हा विषय केवळ लेखी स्वरूपात किंवा परीक्षेतील मार्कांपुरताच मर्यादित न ठेवता तो प्रायोगिक विषय असल्याने प्रात्यक्षिक स्वरूपातच शिकवला गेला पाहिजे. प्रात्यक्षिकांवर जास्त भर दिला गेला पाहिजे. आपल्याकडे नेमके हेच होताना दिसत नाही. मुले विज्ञान विषयात जे शिकतात, ते केवळ तेवढ्यापुरते असते. प्रत्यक्षात ते प्रयोग करून पाहता येणे, त्यांच्या शास्त्रीय प्रक्रिया समजून घेणे या गोष्टी फार कमी ठिकाणी मुलांना मिळतात. त्यामुळे मग ती केवळ मार्कांपुरते विज्ञान शिकतात. हे टाळण्यासाठी शालेय स्तरावरील मुलांना विज्ञान शिकवताना त्यातील शाब्दिक आणि लेखी भागाला जास्त महत्त्व न देता मुलांना प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवण्याकडे आणि मुलांनाही ते प्रत्यक्ष करू देण्याकडे शाळांचा कल असावा, असे वाटते. 

आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे विज्ञानासारखे विषय फार काळ पुस्तकी ज्ञानावर शिकवायला गेल्यास काही ठराविक काळानंतर विद्यार्थ्यांचा संयम संपतो. त्यांना त्यात फार रस राहत नाही. मग मुले दुर्लक्ष करतात. म्हणूनच कदाचित विज्ञान हा विषय अवघड विषयांच्या रांगेत जाऊन बसला आहे. 

ज्येष्ठ शास्त्रज्ञ अरविंद गुप्ता यांच्या या विषयातील काही संकल्पना प्रचलित आहेत, ज्यांचा तुम्ही उल्लेख करता. त्या संकल्पना नेमक्या काय आहेत?
- ‘टाकाऊ’तून ‘टिकाऊ’ ही खरे तर त्यांची पहिली आणि महत्त्वाची संकल्पना. या संकल्पनेचा मीदेखील मोठ्या प्रमाणात वापर करते. अरविंद गुप्ता हे खरे तर ‘कानपूर आयआयटी’चे विद्यार्थी. त्यामुळे अर्थातच त्यांच्या डोक्यात अशा भन्नाट संकल्पना येणे साहजिक आहे. त्यातही अरविंद गुप्ता यांनी ‘आयआयटी’मध्ये शिक्षण घेऊन त्याचा नोकरीसाठी वापर न करता संपूर्ण आयुष्यभर ते केवळ शिक्षण क्षेत्रात काम करत आहेत. त्यांनी ‘टाकाऊतून टिकाऊ’ या तत्त्वावर आजवर अनेक प्रकारची खेळणी बनवली आहेत. ही त्यांची खेळणी ‘सायंटिफिक टॉइज’ म्हणून ओळखली जातात. प्लास्टिकच्या बाटल्या, तांब्याच्या जुन्या नळ्या, चुंबक, रबरबँड्स, काडेपेटीच्या काड्या, डब्या यांसारख्या आपल्या सभोवताली अगदी सहज मिळणाऱ्या गोष्टींपासून ही खेळणी तयार केलेली आहेत. 

‘टाकाऊतून टिकाऊ’ या तत्त्वानुसारच या प्रकारच्या प्रयोगांसाठी उपयोगात आणलेल्या वस्तू पूर्णपणे पुनर्वापर करता येतील अशाच आहेत. सध्या या कार्यशाळांसाठी, त्यात दाखवल्या जाणाऱ्या प्रयोगांसाठी मी वापरत असलेल्या वस्तू १०० टक्के पुनर्वापर करता येण्यासारख्याच आहेत. हीसुद्धा एक महत्त्वाची संकल्पना मी अरविंद गुप्ता यांच्याकडून प्रेरणेने शिकले आहे. त्यांनी या क्षेत्रात ज्या प्रकारे काम केले आहे, तोच आदर्श ठेवून त्यांचे काम पुढे नेण्याचा मी प्रयत्न करत आहे. 

ग्रामीण भागात याप्रकारच्या विज्ञान कार्यशाळा घेण्याचा काय अनुभव आहे?
- मी मूळची अहमदनगर जिल्ह्यातील आहे. नगरमध्ये अकोले तालुक्यातील मेहेंदुरी हे आमचे मूळ गाव. ते आदिवासी भागात आहे. आता कामानिमित्त मुंबईत राहत असलो, तरी त्या गावी आमचे जाणे-येणे असतेच. मुंबईत माझ्या शाळेत मी हे प्रयोग आणि त्यावर आधारित कार्यशाळा सुरू केल्यानंतर त्या प्रयोगांसाठी लागणाऱ्या सर्व साहित्याची बॅग मी गावी जातानाही सोबत नेते. तिथे गेल्यावर तिथल्या शाळेतील कर्मचारी मला तिथे बोलावतात आणि तिथल्या मुलांना मी हे प्रयोग करून दाखवावेत, मुलांना शिकवावेत असा त्यांचा आग्रह असतो. मलाही तेच हवे असते. त्या निमित्ताने गावातील मुलांशी संवाद साधायला मिळतो. त्यांनाही या सगळ्याची खूप उत्सुकता असते. 

खरे तर शहरी मुलांसारखीच या मुलांचीही विज्ञानाची आवड आणि ते शिकण्याची उत्सुकता दांडगी आहे. विज्ञानातील प्रयोगांची ही कार्यशाळा गावात, गावातील आदिवासी पाड्यांवर घेत असताना तिथल्या मुलांनाही हे शिकून घेण्याची खूप इच्छा असल्याचे जाणवते. ती आवडीने हे प्रयोग करून पाहतात. विविध साधने हाताळतात. त्यांच्या घरातील वस्तूंपासूनही यातले अनेक प्रयोग करता येतील, असे त्यांना सांगितले, की ती स्वतःही ते करून पाहण्याचा प्रयत्न करतात. एकूणच हा अनुभव आनंददायी असतो.

संपर्क : अंजली माने 
मोबाइल : ८६९२० ८४८९७

(‘तुजऐसी नाही’ या मालिकेतील सर्व लेख https://goo.gl/idhJdV या लिंकवर उपलब्ध आहेत.)

(अंजली माने यांचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

 
15 1 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link