Next
कृ. प्र. खाडिलकर, ना. सं. इनामदार
BOI
Thursday, November 23, 2017 | 04:00 AM
15 0 0
Share this article:

मराठी गद्य आणि संगीत रंगभूमीला खरा वैभवाचा काळ बहाल करणारे कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर आणि मराठी साम्राज्याची विजयपताका कायम राखणाऱ्या अजेय योद्ध्याची, पहिल्या बाजीराव यांची आणि अनेक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वांची चरित्रं आपल्या रसाळ भाषेतून मांडणारे ना. सं. इनामदार यांचा २३ नोव्हेंबर हा जन्मदिन. त्यानिमित्त आजच्या ‘दिनमणी’मध्ये त्यांच्याविषयी थोडक्यात....
........
कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर

२३ नोव्हेंबर १८७२ रोजी सांगलीमध्ये जन्मलेले कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर हे मराठीचे ज्येष्ठ नाटककार, राजकीय विश्लेषक, अध्यात्माचे अभ्यासक आणि ‘केसरी’चे संपादक म्हणून प्रसिद्ध होते.

वयाच्या २१व्या वर्षीच त्यांनी ‘सवाई माधवरावाचा मृत्यू’ हे नाटक लिहिलं आणि ते चांगलंच लोकप्रिय झालं. ते लोकमान्यांप्रमाणेच जहाल स्वराज्यवादी होते आणि आपल्या लेखणीची ताकद त्यांनी त्याविषयीचे विचार मांडण्यासाठी सातत्याने वापरली. 

१९३३ साली नागपूरमध्ये भरलेल्या १८व्या महाराष्ट्र साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

कांचनगडची मोहना, सवाई माधवराव यांचा मृत्यू, कीचकवध, संगीत बायकांचे बंड, भाऊबंदकी, प्रेमध्वज, संगीत मानापमान, संगीत विद्याहरण, सत्त्वपरीक्षा, संगीत स्वयंवर, संगीत द्रौपदी, संगीत त्रिदंडी संन्यास, संगीत मेनका, सवती-मत्सर, संगीत सावित्री अशी पंधरा नाटकं त्यांनी लिहिली. त्यांच्या नाटकांचे प्रयोग महाराष्ट्र नाटक मंडळी, किर्लोस्कर आणि गंधर्व नाटक मंडळी यांनी सातत्याने केले. मराठी रंगभूमीच्या इतिहासात त्यांना अनन्यसाधारण स्थान आहे. त्यांच्या लेखणीमुळे मराठी गद्य आणि संगीत रंगभूमीला खरा वैभवाचा काळ लाभला.

२५ ऑगस्ट १९४८ रोजी त्यांचं निधन झालं.

.................

नागनाथ संतराम इनामदार

२३ नोव्हेंबर १९२३ रोजी जन्मलेले ना. सं. इनामदार हे  अत्यंत रंजक, नाट्यमय आणि चित्रदर्शी पद्धतीने ऐतिहासिक कादंबरी लिहिणारे कादंबरीकार म्हणून प्रसिद्ध आहेत. 

ऐतिहासिक तपशील आणि माहिती गोळा करून, आणि जरूर तो तपशील न मिळाल्यास, त्याविषयी बिनचूक ठोकताळे बांधून इतिहासाचा योग्य आदर राखून कादंबरी लिहिणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. 

‘भूमितरंग’ या नियतकालिकाचे संपादन करून त्याशिवाय त्यांनी हंस, मोहिनी, किर्लोस्कर अशा महत्त्वाच्या मासिकांतून लेखन केलं. मराठेशाही आणि पेशवे यांच्या कालखंडातील अनेक व्यक्तींचा मागोवा त्यांनी घेतला. 

१९९७ साली नगरला भरलेल्या साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. 

झेप, झुंज, मंत्रावेगळा, राऊ, शहेनशहा, शिकस्त, राजश्री, घातचक्र, त्या स्वप्नांच्या आठवणी,  चांदराती रंगल्या,  वाळल्या फुलात, असं त्यांचं लेखन प्रसिद्ध आहे.
 
१६ ऑक्टोबर २००२ रोजी त्यांचं निधन झालं. 

(नागनाथ इनामदार यांची पुस्तकं ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा. दररोज प्रसिद्ध होणाऱ्या ‘दिनमणी’ सदरातले स्फुट लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/QMr7oP या लिंकवर वाचता येतील.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search