Next
वसुंधरा दिनानिमित्त वाहनांची मोफत ‘पीयूसी’ तपासणी
BOI
Wednesday, April 17, 2019 | 04:41 PM
15 0 0
Share this article:

पुणे : २२ एप्रिल हा वसुंधरा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या दिनाच्या पार्श्वभूमीवर येथील ‘तेर पॉलिसी सेंटर’ या पर्यावरण विषयात राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणाऱ्या संस्थेने एक अनोखा उपक्रम राबवण्याचे ठरवले आहे. या उपक्रमांतर्गत चार दिवस शहरात विविध ठिकाणी वाहनांची मोफत पीयूसी (PUC) चाचणी करून देण्यात येणार आहे. 

तेर पॉलिसी सेंटर, पी. एन. गाडगीळ अँड सन्स आणि महाराष्ट्र बँक यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. वातावरणातील बदल आणि वाढते प्रदुषण ही समस्या मोठी असली, तरी त्याकडे फार गांभीर्याने कोणी लक्ष देत नाही. यासाठी वसुंधरा दिनाचे औचित्य साधून संस्थेतर्फे १९, २०, २१ व २२ एप्रिल या चार दिवसांत शहरात विविध ठिकाणी मोफत पीयूसी तपासणीचा उपक्रम केला जात आहे. 

१९ एप्रिलला सकाळी नऊ ते १२ व संध्याकाळी चार ते सात या वेळेत सिंहगड रस्त्यावरील अभिरुची मॉल याठिकाणी, २० एप्रिलला सकाळी नऊ ते १२ व संध्याकाळी चार ते सात या वेळेत नारायण पेठेतील बँक ऑफ महाराष्ट्र, पुणे ग्रामीण विभाग याठिकाणी, २१ एप्रिलला नदीपात्राचा रस्ता, तर २२ एप्रिलला बँक ऑफ महाराष्ट्र लोकमंगल, शिवाजीनगर, पुणे याठिकाणी मोफत पीयूसी तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. 

ज्या पृथ्वीच्या अंगाखांद्यावर जीवसृष्टी वाढते तिच्या रक्षणाची जबाबदारी आपलीच आहे. हे सर्वांना माहीत असूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते. १९७०मध्ये अमेरिकेतील सॅनफ्रान्सिस्को याठिकाणी पहिला जागतिक वसुंधरा दिवस साजरा केला गेला. हवामान बदल हे हरित गृह वायूंमुळे आलेले संकट त्यातही कार्बन उत्सर्जन हा त्यातला महत्त्वाचा घटक आहे. वाहनांची वाढती संख्या अपरिहार्य आहे पण त्याची योग्य ती देखभाल केल्यामुळे कार्बन उत्सर्जन कमी करता येते. वाहनांमुळे हवेतले प्रदूषण कमी व्हावे यासाठी वेळोवेळी वाहनांची पीयूसी करून घेणे आवश्यक असते. 

‘तेर पॉलीसी सेंटर, पी. एन. गाडगीळ अँड सन्स आणि महाराष्ट्र बँक यांच्या या उपक्रमामध्ये सहभागी होऊन पृथ्वीला प्रदूषण मुक्त करण्यासाठी आपले पाऊल पुढे ठेवू’, या असे आवाहन तेर पॉलीसी सेंटरच्या संस्थापक संचालक डॉ. विनिता आपटे यांनी केले आहे. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search