Next
‘शेतकरी बियाण्यांबाबत स्वयंपूर्ण झाला पाहिजे’
शेतकऱ्यांच्या बियाणे सुधार प्रयत्नांना कृषी विद्यापीठांनी सहकार्य करण्याचे आचार्य देवव्रत यांचे आवाहन
शशिकांत घासकडबी
Monday, January 14, 2019 | 12:55 PM
15 0 0
Share this article:

नंदुरबार : ‘भारताला व शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने स्वयंपूर्ण करावयाचे असेल, तर शेतकरी बियाण्यांबाबत स्वयंपूर्ण झाला पाहिजे. कृषी विद्यापीठांनी शेतकऱ्यांच्या बियाणे सुधार प्रयत्नांना सहकार्य करावे,’ असे आवाहन हिमाचल प्रदेशचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी केले.

शेतकऱ्यांकडील पीकजाती आणि बियाण्यांचे जतन, संरक्षण करण्याच्या हेतूने नंदुरबारमध्ये नुकतेच राष्ट्रीय चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. चर्चासत्राचे, तसेच त्या वेळी आयोजित करण्यात आलेल्या बियाणे प्रदर्शनाचे उद्घाटन आचार्य देवव्रत यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. शहरातील छत्रपती शिवाजी महाराज नाट्य मंदिरात हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. 

या वेळी राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथ, अक्षय कृषी परिवाराचे मनोजभाई सोलंकी, डॉ. हेडगेवार सेवा समितीचे अध्यक्ष कृष्णदास पाटील, राष्ट्रीय ऑथोरिटीचे रजिस्ट्रार जनरल डॉ. अग्रवाल, महाराष्ट्र जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. विलास बर्डेकर, डॉ. डांगे यांच्यासह अनेक संशोधक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रदर्शनात महाराष्ट्र, गुजरात, तेलंगण, कर्नाटक, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश अशा विविध राज्यांतून संशोधक शेतकऱ्यांनी शेकडो प्रकारचे बियाणे मांडले होते. 

बियाणे हा शेतीचा आत्मा आहे. बियाण्यातील विविधता हा याचा गाभा आहे. ही विविधता आधुनिक काळातील विकास प्रक्रियेने दुर्लक्षित केली गेली. त्यामुळे यावर सामूहीक चिंतन आणि मंथनाची आवश्यकता आहे. हे लक्षात घेऊन राष्ट्रीय चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. ‘शेतकऱ्यांनी पारंपरिक बियाणे सांभाळणे ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन चर्चासत्राचे आयोजन सचिव डॉ. गजानन डांगे यांनी केले.

चर्चासत्राचे स्वागतपर भाषण राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के. पी. विश्वनाथ यांनी केले. त्यांनी बियाणे विषयातील विद्यापीठाचे कार्य, तसेच या संबंधातील आगामी दिशा याबाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय ग्रामविकास प्रमुख डॉ. दिनेशजी यांनी भारतीय कृषी चिंतनांमधील बियाणे विषयाचे महत्त्व अधोरेखित केले. या चर्चासत्राकरिता झालेल्या सामूहिक प्रयत्नांचे त्यांनी स्वागत केले. 

महाराष्ट्र जैवविविधता मंडळाचे अध्यक्ष डॉ. विलास बर्डेकर यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण विषय हाती घेतल्याबद्दल राष्ट्रीय चर्चासत्र आयोजकांचे अभिनंदन केले आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. कार्यक्रमाचे मुख्य वक्ते राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी उद्घाटन सत्रात विस्तृत विचार मांडले. ‘बियाणे प्रयोगशाळेत नव्हे, तर शेतकऱ्यांच्या शेतात सांभाळले गेले पाहिजे. शेतकऱ्यांनी बियाणे स्वतःपुरते न सांभाळता उत्तम बियाण्याचे बीजोत्पादन करावयास हवे आणि ते इतरांनादेखील उपलब्ध करून दिले पाहिजे,’ असे ते म्हणाले. त्यांनी स्वानुभवही सांगितले आणि काही दाखलेही दिले. 

चर्चासत्राची ठळक वैशिष्ट्ये :
या चर्चासत्राला विविध राज्यांतून संशोधक शेतकऱ्यांची, शास्त्रज्ञांची, सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. शेकडो बियाण्यांचे प्रदर्शन या वेळी भरविण्यात आले होते. या वेळी उत्कृष्ट जिल्हाधिकारी म्हणून डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, बीज संग्राहक राहीबाई पोपरे, जैवविविधता केंद्र जतन करणारे रामसिंग वळवी यांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. राष्ट्रगीताद्वारे उद्घाटन सत्राचा समारोप झाला.

(‘सीड मदर’ राहीबाई पोपरे यांच्याबद्दल अधिक वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Balkrishna Gramopadhyes About 153 Days ago
Very. True . But , how to achieve it ? Practcal. Steps ?
0
0

Select Language
Share Link
 
Search