Next
सकारात्मक विचार आणि नियोजनबद्ध तयारीतून मिळविले यश
‘यूपीएससी’त देशात १९०व्या आलेल्या कोकणातील मधुलिकाने सांगितली यशाची चतुःसूत्री
अनिकेत कोनकर
Wednesday, May 01, 2019 | 08:00 AM
15 0 0
Share this article:

रत्नागिरी : ‘समाजासाठी प्रत्येकच जण काही ना काही तरी करत असतो; पण मला ‘यूपीएससी’सारख्या मोठ्या व्यासपीठावरून समाजासाठी काही तरी करायची इच्छा होती. खूप आधीपासूनच तसा विचार माझ्या मनात होता. माझ्या विचाराची ही मूळ प्रेरणा जागृत ठेवून केलेले नियोजन, कुटुंबीयांचा भक्कम पाठिंबा, सकारात्मक विचार आणि पद्धतशीरपणे केलेली तयारी यांमुळेच मी या परीक्षेत चांगले यश मिळवू शकले,’ अशा शब्दांत ‘यूपीएससी’ परीक्षेत यंदा देशात १९०व्या आलेल्या मधुलिका देवगोजी-कदम (ता. लांजा, जि. रत्नागिरी) हिने आपल्या यशाची सूत्रे सांगितली. 

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला ‘बाइट्स ऑफ इंडिया’ने साधलेल्या संवादावेळी मधुलिकाने आपले विचार मांडले, तसेच इथपर्यंतच्या प्रवासाबद्दलही सांगितले. यूपीएससी परीक्षेत महाराष्ट्रातील उमेदवार यशस्वी होण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षांत वाढीला लागले आहे; मात्र तरीही अजून या परिस्थितीत सुधारणा होण्याला खूप वाव आहे. या पार्श्वभूमीवर, कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील लांज्यासारख्या निमशहरी ठिकाणी आणि तेही मराठी माध्यमातून प्राथमिक शिक्षण झालेल्या मधुलिका विजय देवगोजी हिचे यश अभिमानास्पद तर आहेच; पण केवळ कोकणातीलच नव्हे, तर संपूर्ण राज्यातील ग्रामीण भागातील उमेदवारांना प्रेरणा देणारेही आहे. 

मधुलिका ही लांज्यातील पॅथॉलॉजिस्ट आणि लेखिका विजयालक्ष्मी देवगोजी यांची मुलगी. तिचे प्राथमिक शिक्षण लांज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक पाचमध्ये, तर नंतर पाचवीपर्यंतचे शिक्षण लांजा हायस्कूलला झाले. त्यानंतर तिने जवाहर नवोदय विद्यालयाची परीक्षा दिली आणि त्यात ती निवडली गेली. तिचे पाचवीपर्यंतचे शिक्षण मराठी, तर सहावीपासून दहावीपर्यंतचे शिक्षण सेमी-इंग्लिश माध्यमात झाले. दहावीत ती नवोदय विद्यालयात पहिली, तर विभागात दुसरी आली होती. पुण्यात गरवारे कॉलेजमध्ये अकरावी, बारावी झाल्यावर ती कमिन्स कॉलेजमधून बी. ई. होऊन बाहेर पडली ती उत्तम कॉर्पोरेट कंपनीचे नियुक्तीपत्र हातात घेऊनच. पहिल्यापासून मनात असलेला वेगळा विचार अंमलात आणण्याची हीच वेळ होती. 

‘प्लॅन बी’ची अंमलबजावणी
मधुलिका म्हणाली, ‘यूपीएससी परीक्षा द्यायचे मी आधीच ठरवले होते; पण ही स्पर्धा परीक्षा असल्याने त्यात काहीही होऊ शकते. त्यामुळे काही कारणाने आपली तिथे निवड झालीच नाही, तर आपल्याकडे कामाचा अनुभव हवा, म्हणून मी कॉर्पोरेट कंपनीतील नोकरी स्वीकारली. हा माझा ‘प्लॅन बी’ होता. दोन वर्षांचा अनुभव गाठीशी आल्यावर मी आधी ठरवल्याप्रमाणे यूपीएससी परीक्षा द्यायचे ठरवले आणि चांगली नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्या वेळी माझे आई-वडील, कुटुंबीयांनी मला पाठिंबा दिला आणि माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळेच मी पुढे तयारी करू शकले.’

दोनदा हुलकावणी, तिसऱ्या प्रयत्नात यश
२०१५मध्ये नोकरी सोडल्यानंतर मधुलिकाने परीक्षेचा अभ्यास सुरू केला. वर्षभर अभ्यास केल्यावर २०१६मध्ये तिने पहिल्यांदा परीक्षा दिली. त्या वेळी पहिल्या टप्प्यातील यशासाठी तिला दोन गुण कमी पडले. २०१७मध्ये दुसऱ्यांदा परीक्षा दिली, तेव्हा ती इंटरव्ह्यूच्या टप्प्यापर्यंत पोहोचली; पण यशस्वी होऊ शकली नाही. २०१८मध्ये मात्र तिला पहिले टप्प्यात चांगले यश मिळून इंटरव्ह्यूचे बोलावणे आले आणि संपूर्ण देशात १९०वा क्रमांक मिळवून ती उत्तीर्ण झाली. ‘या वेळी यश मिळेल, याची खात्री वाटत होती; मात्र कितवा क्रमांक येईल, याचा अंदाज येत नव्हता,’ असे ती म्हणाली. 

स्व-अभ्यासावर भर
अभ्यासाबद्दल विचारले असता मधुलिका म्हणाली, ‘पहिल्या वर्षी मी कोचिंग क्लासचा आधार घेतला होता; नंतरचा अभ्यास मात्र मी स्वतःच केला. ऑनलाइन टेस्ट सीरिजचाही उपयोग करून घेतला. परीक्षेत यश मिळविण्यासाठी वर्षभराचा अभ्यास पुरेसा होतो, असा माझा अनुभव आहे.’ डिसेंबर २०१७मध्ये अक्षय कदम यांच्याशी तिचा विवाह झाला. ते ‘बँक ऑफ महाराष्ट्र’च्या अकलूज शाखेत सहायक व्यवस्थापक आहेत. तसेच, ‘अनअॅकॅडमी’मध्ये स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शक म्हणूनही कार्यरत आहेत. त्यांचेही बहुमोल मार्गदर्शन तिला लाभले. विवाहानंतर सासूबाईंनी कौटुंबिक जबाबदाऱ्या न सोपवल्याने अभ्यासाला पुरेसा वेळ देता आला, असेही तिने आवर्जून नमूद केले.

अशी टिकवली सकारात्मकता...
या यशाचे शिखर गाठण्यापर्यंतच्या वाटचालीत मधुलिकाने सकारात्मकता कशी टिकवून ठेवली, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ‘कुटुंबीयांचा पाठिंबा ही सर्वांत मोठी गोष्ट होती. त्यामुळे नोकरी सोडण्याच्या निर्णयातदेखील ते माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यामुळे माझे ‘मॉरल’ टिकून राहिले. अभ्यास करताना जे काही मित्रमंडळ तयार होते, त्यातून नकारात्मक प्रभाव पडणाऱ्या मंडळींपासून मी कटाक्षाने लांब राहिले. फेसबुकसारख्या सोशल मीडियापासूनही जाणीवपूर्वक दूर राहिले. कारण आपले सगळे मित्र-मैत्रिणी जीवनात पुढे जात असतात आणि आपण अजून अभ्यासच करतोय, अशी भावना त्यातून मनात येऊ शकते आणि आपण नाउमेद होऊ शकतो. त्यामुळेच आपण काही तरी मिळवण्यासाठी हे करतोय, याची जाणीव ठेवून सोशल मीडियापासून दूर राहिले. टेलिग्रामसारख्या काही सोशल मीडियावर अभ्यासाला पूरक अशी चॅनेल्स आहेत, त्यांचा उपयोग करून घेतला. त्याचप्रमाणे सकारात्मक विचारांच्या काही क्लिप्स माझ्याच आवाजात मी रेकॉर्ड करून ठेवल्या होत्या. त्या मी ऐकायचे. शिवाय गुरुजनांसह काही मान्यवरांनी केलेल्या मार्गदर्शनपर, प्रेरणादायी वक्तव्यांच्याही क्लिप्स रेकॉर्ड केल्या होत्या. त्याही मी वेळोवेळी ऐकायचे. बॉलिवूडची काही प्रेरक गाणीही मी ऐकायचे. या सगळ्यातून सकारात्मकता टिकून राहिली,’ असे मधुलिकाने नमूद केले. 

गीतेचे तत्त्वज्ञान
‘‘एथिक्स’च्या पेपरचा अभ्यास करताना भगवद्गीता, गांधीवाद आदींचा अभ्यास करावा लागतो. ते वाचत असताना ‘कर्म करत राहा, फळाची अपेक्षा करू नका’ या गीतेतील तत्त्वज्ञानाचाही चांगला परिणाम माझ्यावर झाला,’ असेही मधुलिकाने आवर्जून सांगितले. 

अनुभवाचे बोल
‘अभ्यासासाठी राज्यसभा टीव्हीवरच्या ‘इंडियाज वर्ल्ड’सारखे कार्यक्रम आणि यू-ट्यूबवरील काही क्लिप्सही पाहिल्या. त्यातून स्वतःच्या नोट्स काढल्या. देशाचे प्रश्न समजून घेताना अनेक समस्यांवर काहीही उपाय निघाले नसल्याचेही अधिक जाणवत गेले. या समस्या गुंतागुंतीच्या आहेत. त्यामुळे इंटरव्ह्यूत आदर्शवादी उत्तरे देण्यापेक्षा खरी उत्तरे देण्यावर भर द्यायला हवा,’ असे अनुभवाचे बोलही तिने सांगितले. देशापुढच्या समस्या सोडवण्यासाठी तरुणांनी पुढे येऊन कार्यवाही करायला हवी, असेही ती म्हणाली. 

मराठीचा न्यूनगंड नको
मराठी भाषेतून शिक्षण झाले असले, तरी त्याचा न्यूनगंड बाळगण्याचे काहीच कारण नाही, हे मधुलिकाच्या उदाहरणावरून स्पष्ट होते. ‘मराठी माध्यमातून ही परीक्षा देण्याची सोय आहे. इंग्लिश उत्तम असेल तर निबंधलेखनात नक्कीच फायदा होतो; पण इंग्लिशचा बाऊ करण्याची काहीच गरज नाही. या परीक्षेत भाषेचा फुलोरा नव्हे, तर विचार महत्त्वाचे असतात,’ असे मधुलिकाने सांगितले. ‘स्वतःवर विश्वास ठेवायला हवा,’ हे तिने आवर्जून सांगितले. 

ऐतिहासिक आणि पौराणिक कादंबऱ्या वाचण्याचा छंद मधुलिकाला आहे. तसेच तिला इंग्लिश साय-फाय मूव्हीज पाहायलाही आवडतात. काही दिवस तिने कथक नृत्यशैलीचे शिक्षणही घेतले आहे. तुमच्या-आमच्यासारख्या सर्वसामान्य घरातील असलेली ही मुलगी आता लवकरच तिची ‘पॅशन’ असलेल्या क्षेत्रात रुजू होणार आहे. तिच्या पुढील वाटचालीला शुभेच्छा!

(मधुलिकाच्या मनोगताचा व्हिडिओ सोबत देत आहोत.)

BytesofIndia.com पोर्टलला सोशल मीडियावर फॉलो करण्यासाठी खाली क्लिक/टॅप करा.

अॅप, फेसबुकयू-ट्यूबट्विटरइन्स्टाग्रामव्हॉट्सअॅप


 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Amit About 138 Days ago
Congrats to madhulika. She has shown positiveness and done a commendable job.
1
0

Select Language
Share Link
 
Search