Next
ओल्ड बॉय : वेगळ्या प्रतलावरची ताकदवान सूडकथा
BOI
Tuesday, June 25, 2019 | 06:45 AM
15 0 0
Share this article:


अतिशय वेगळ्या प्रकारे लिहिलेली आणि पडद्यावर मांडलेली आगळीवेगळी कथा, मानवी भावभावनांचा केलेला प्रभावी वापर, कलात्मकरीत्या चित्रित केलेली दृश्ये, विचारपूर्वक केलेलं दिग्दर्शन व रूपकं, शेवटाकडे उलगडत जाणारी रहस्यं व पात्रांची मनोभूमिका, एपिलॉगमधे कथानकाला मिळणारी कलाटणी व काहीशा आध्यात्मिक, ओपन एंड स्वरूपाचा शेवट इत्यादी गोष्टींमुळे ‘ओल्डबॉय’ हा एक अतिशय प्रभावी चित्रपट ठरतो... ‘रसास्वाद’ या सदरात या वेळी पाहू या ‘ओल्ड बॉय’ या कोरियन चित्रपटाबद्दल....
..................
असं समजा, की तुमचं अपहरण झालं आहे. शुद्धीवर आल्यानंतर तुम्हाला कळतं, की तुम्ही एका खोलीत बंदिस्त आहात. अशा एका खोलीत, जिथे खिडकीदेखील नाही. बाहेर ऋतू कोणता सुरू आहे, उजेड आहे, की अंधार आहे हेदेखील कळू शकत नाही. खोलीत फक्त एक टीव्ही आहे, ज्यावर ठराविक प्रकारचे कार्यक्रम लागतात. खोलीच्या दाराखालची एक फट, मधेच सरकते आणि त्यातून जेवणाचं ताट आत सरकवलं जातं. जेवण म्हणून रोज एकाच प्रकारचं अन्न येतं. अधूनमधून त्या खोलीत धूर कोंडतो आणि तुम्ही बेशुद्ध होता. शुद्धीवर आल्यानंतर तुम्हाला कसलंच भान राहत नाही. भान येतंय-न येतंय तोच पुन्हा एकदा खोलीमध्ये धूर कोंडून तुम्ही बेशुद्ध होता. हाच घटनाक्रम जवळपास १५ वर्षे चालतो, आणि एक दिवस, एका अनोळखी ठिकाणी, तुम्हाला अचानकपणे मुक्त केलं जातं. तुम्ही कोण आहात, काय आहात, आत्ता या क्षणी कुठे आहात, इत्यादी सर्व गोष्टींबाबतचं तुमचं भान पूर्णपणे गेलेलं असतं. इतकी वर्षं तुम्हाला कोणी कैद करून ठेवलं आणि आता मुक्त का केलं? याची उत्तरं व कारणं तुम्हाला ठाऊक नसतात. आहे ना हे सगळं भयावह? काळजाचा ठोका चुकवणारं? ‘पार्क चॅन वूक’ दिग्दर्शित ‘ओल्ड बॉय’ सिनेमाच्या कथेचा, हा मुख्य प्लॉट आहे. २००३मध्ये आलेला हा कोरियन ‘निओ-न्वार थ्रिलर’ प्रकारातला सिनेमा आहे. ‘द व्हेन्जिन्स’ या सिनेमात्रयीमधला दुसरा सिनेमा. 

‘ओल्ड  बॉय’ याच नावाच्या जपानी ग्राफिक कादंबरीवर आधारलेला हा चित्रपट. ‘ओ-दे-सू’ नावाच्या इसमाला हॉटेलच्या खोलीप्रमाणे दिसणाऱ्या एका तुरुंगात, सुमारे पंधरा वर्षं डांबून ठेवलं जातं आणि एक दिवस अचानकपणे मुक्त केलं जातं. आपल्या जीवनातली मौल्यवान पंधरा वर्षं नेमकी कोणी हिरावून घेतली व का, याचा ओ-दे-सू ला काही केल्या थांग लागत नाही. शिल्लक राहिलेल्या अर्धवट स्मृतींच्या आधारे, तो या इसमाचा शोध घ्यायचं काम सुरू करतो. अनेक वर्षं एकाच खोलीमध्ये कैद असलेल्या ओ-दे-सू याने स्वतःला किक बॉक्सिंगची सवय लावून घेतलेली असते. संधी मिळताच इथून बाहेर पडायचं हे त्याचं ध्येय असतं. किकबॉक्सिंगच्या सवयीमुळे स्वसंरक्षणाकरिता त्याला इतर कुणाच्याही मदतीची गरज भासेनाशी होते. एके दिवशी अचानक मुक्तता झाल्यावर, हे सगळं कुणी केलं आणि कशाकरिता हे जाणून घेणं हेच त्याचं ध्येय बनतं. त्याला लुटण्याकरिता आलेल्या सहा-सात जणांना तो सहजी मात देतो. तुरुंगात असताना, रोज जेवण म्हणून येणाऱ्या ठराविक प्रकारच्या अन्नाचा माग काढत, ‘दे-सू’ तुरुंगापर्यंत येऊन ठेपतो. काही प्रयत्नांनंतर आपल्याला कैदेत ठेवणाऱ्या व्यक्तीचा त्याला शोध लागतो.. पण त्यानं हे सगळं नेमकं कशाकरिता केलं, हे अजूनही त्याला समजत नसतं. त्याला कैद करणारी व्यक्ती शारीरिक व आर्थिक ताकदीने मोठी असल्यामुळेही त्याला त्या व्यक्तीकडून याचं कारण वदवून घेणं कठीण असतं. हे सगळं नेमकं का व कशासाठी झालं हे शोधणं, हेच ‘दे-सू’च्या जीवनाचं ध्येय बनतं. 

‘ओल्ड बॉय’ ही एक खूप वेगळ्या प्रकारची सूडकथा आहे. वेगवानपणे घडणाऱ्या अतर्क्य स्वरूपाच्या घटना, जागोजागी पेरलेलं धक्कातंत्र, चित्रपटात दिसणाऱ्या वास्तू व परिसराचा आगळावेगळा पोत, ठराविक रंगांच्या केलेल्या वापरातून निर्माण होणारा एकंदर परिणाम, हाणामाऱ्यांची प्रभावी आणि एरव्हीपेक्षा पूर्णपणे वेगळी आणि अधिक परिणामकारक ठरणारी दृश्ये आणि सशक्त पटकथेच्या जोरावर, ‘ओल्ड बॉय’ इतर सूडकथांपेक्षा वेगळा आणि प्रभावी ठरतो. एक व्यक्ती दुसरीवर उगवत असलेला सूड, दुसऱ्या व्यक्तीचं ताकदीनं पाशवी स्वरूपाचं असणं, दुसऱ्या व्यक्तीला पहिली व्यक्ती नेमकी कशाकरिता सूड उगवत आहे, हेच माहीत नसणं, दुसऱ्या व्यक्तीची स्मृती ड्रग्जचा प्रयोग करून मेंदूतून काढून टाकलेली असणं, प्रेक्षकाला चित्रपटातल्या दुसऱ्या व्यक्तीइतकीच बुचकळ्यात टाकणारी पटकथा आणि एकंदर घटनाक्रम, यामुळे ‘ओल्ड बॉय’ एक वेगळीच अनुभूती देतो. चित्रपट पुढे सरकतो, तसतशी ‘दे-सू’ची स्मृती हळूहळू परत येऊ लागणं, त्याला कैदेत ठेवणाऱ्या ‘ली वू-जिन’ आणि ‘दे-सू’चा पूर्वेतिहास, ‘दे-सू’ आणि त्याबरोबरच प्रेक्षकाला कळू लागणं, ‘पेंटहाउस’मधली घणाघाती मारामारी आणि सर्वांत शेवटी कथेला मिळणारी कलाटणी, यांमुळे पुढे काय अशी उत्कंठा कायम टिकून राहते. चित्रपटातलं ‘सरप्राइज एलेमेंट’ शेवटपर्यंत टिकून राहतं. 

प्रेक्षक चित्रपटाच्या कथेत पूर्णपणे गुंततो. रंगून जातो. ओल्ड बॉयच्या कथेमध्ये, तिच्या रचनेमध्ये एक प्रकारचं गूढ आहे. अनेक पदरी गूढ. गाभ्यात असलेलं रहस्य, त्यावर असणारे वेगवेगळे पदर, भोवती असणारा, वेगवेगळ्या प्रकारच्या भावनांचा संमिश्र अर्क, सूडाच्या भावनेचे वेगवेगळे स्तर, बदलत जाणारी त्यांची व्याप्ती व गांभीर्य, सूडाचा प्रवास संपल्यानंतर उरणारी एक विरक्त आणि अलिप्त स्वरूपाची भावना, अध्यात्माकडे झुकणारा कथेचा ‘एपिलॉग’, या सर्व घटकांमुळे ही कथा एका वेगळ्या उंचीवर जाते. प्रेक्षकाला कायमच ताजी, नवी वाटते. धक्कादायक, रंजक तरीही सुन्न करणारी अनुभूती देते. 

या चित्रपटात असंख्य घटना आहेत. त्या घटनांचा क्रम आणि संगती लावताना कोडं सोडवल्याचा आनंद देईल, अशी लेखनाची पद्धती व दिग्दर्शन आहे. यात केलेला संगीताचा वापर अतिशय वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपाचा आहे. ग्रीक पुराणामधल्या ‘राजा इडिपस’च्या कथेशी ‘ओल्ड बॉय’ चित्रपटाचा धागा जोडलेला आहे. सोफोक्लिझची ‘किंग इडिपस’ ही अनंत काळापासून लोकांवर भुरळ घालणारी एक अजरामर कलाकृती आहे, ज्यामुळे अनेक जण प्रभावित झाले. आपल्याकडे बंगाली रंगभूमीवरचे असामान्य प्रतिभेचे नट शंभू मित्र यांनी मूळ नाटकावरून बंगाली नाटक बनवलं. याच ‘राजा ओयदिपौस’ नावाच्या बंगाली नाटकावरून पु. ल. देशपांडे यांनी त्याच नावाने या कृतीचं मराठी नाटकात रूपांतर केलं होतं. ‘किंग इडिपस’मधल्या पात्रांचं तत्त्वज्ञान हे ‘ओल्ड बॉय’मधल्या पात्रांच्या तत्त्वज्ञानाशी आणि एकूण स्वभावाशी मिळतंजुळतं ठेवण्यात आलेलं आहे. बारकाईने पाहिल्यास हे संदर्भ सहजी लक्षात येऊ शकतात. या सिनेमापासून प्रेरणा घेऊन स्टीवन स्पिलबर्गला रिमेक करायची इच्छा होती; पण ते प्रत्यक्षात आलं नाही. संजय गुप्ता या भारतीय दिग्दर्शकानं २००६मध्ये याचा अन-ऑफिशिअल रिमेक ‘जिंदा’ या नावानं केला. त्यानंतर २०१३मध्ये ‘स्पाइक-ली’ या दिग्दर्शकानं ओल्डबॉय याच नावाने याचा ऑफिशिअल रिमेक केला. ओ-दे-सू जेव्हा कैदेतून सुटतो, त्या वेळी तो तीसहून अधिक माणसांना एका हातोड्याच्या साहाय्याने मारतो. हा सीन सलग चित्रित केला गेला. या सीनचे जवळपास १७ रीटेक झालेले आहेत. या सीनच्या वेळी वापरलेला प्रकाश आणि अंधाराचा वैशिष्ट्यपूर्ण प्रयोग, भिंतींचे रंग, हे विशेष अभ्यासण्यासारखं आहे. दृश्य-प्रतिमा, रूपके, विचारपूर्वक केलेली दृश्य योजना, सेट-डिझाइन, काळ पुढे सरकतो आहे अथवा भूतकाळ आहे हे दाखविण्यासाठी योजलेल्या क्लृप्त्या अफलातून आहेत. अतीव हिंसाचार, सेक्स दृश्ये, हिरवट निळ्या प्रकाशाचा मुक्त वापर, डार्क स्वरूपाचे विषय ही कोरियन सिनेमाची वैशिष्ट्ये ‘ओल्ड बॉय’मध्येही आहेतच; पण अतिशय वेगळ्या प्रकारे लिहिलेली आणि पडद्यावर मांडलेली आगळीवेगळी कथा, पात्रांचा तपशीलात दाखवलेला स्वभाव, त्यांच्या स्वभावामागची कारणे, मानवी भावभावना, त्यांचा केलेला प्रभावी वापर, एका पात्राकडून दुसऱ्याकडे झुकणारी सहानुभूती, कलात्मकरीत्या चित्रित केलेली दृश्ये, विचारपूर्वक केलेलं दिग्दर्शन व रूपकं, शेवटाकडे उलगडत जाणारी रहस्यं व पात्रांची मनोभूमिका, एपिलॉगमधे कथानकाला मिळणारी कलाटणी व काहीशा आध्यात्मिक, ओपन एंड स्वरूपाचा शेवट इत्यादी गोष्टींमुळे ‘ओल्ड बॉय’ हा एक अतिशय प्रभावी चित्रपट ठरतो. 

(सूचना : हा चित्रपट प्रौढांकरिता असून यात हिंसाचार व नग्नतापूर्ण दृश्ये आहेत. लहान मुलांसोबत पाहू नये. लहान मुलांना दाखवू नये.) 

- हर्षद सहस्रबुद्धे
ई-मेल : sahasrabudheharshad@gmail.com

(लेखक पुण्यात उत्पादन अभियांत्रिकी क्षेत्रात कार्यरत असून, गेली अनेक वर्षे वैविध्यपूर्ण विषयांवर लेखन करतात. त्यांचे ‘रसास्वाद’ हे सदर दर १५ दिवसांनी, मंगळवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर प्रसिद्ध होते. या सदरातील सर्व लेख https://goo.gl/bBLgCE या लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Deshpande Rajan About 111 Days ago
First time gone through the article. Will be reading regularly whenever posted.
1
0

Select Language
Share Link
 
Search