Next
‘ब्रँडिंग म्हणजे फक्त जाहिरात नव्हे’
BOI
Tuesday, December 05 | 01:01 PM
15 0 0
Share this story

‘ब्रँडनामा’चे प्रकाशन

पुणे : ‘केवळ जाहिरात म्हणजे ब्रँडिंग नव्हे. ब्रँडिंग म्हणजे त्याहीपुढील संकल्पना आहे. उद्योग-व्यवसायात प्रगतीसाठी जिद्द आणि चिकाटीसोबतच ब्रँडिंगही तितकेच महत्त्वाचे आहे. म्हणूनच मराठी उद्योजकांना आणि वाचकांना ब्रँड ही संकल्पना समजावून सांगण्यासाठी, त्याची गरज पटवून देण्यासाठी ‘ब्रँडनामा’ हे पुस्तक लिहिले,’ अशा शब्दांत प्रसिद्ध ब्रँड कन्सल्टंट आणि ‘प्रतिसाद कम्युनिकेशन्स’चे अभिजित जोग यांनी आपली भूमिका मांडली. त्यांनी लिहिलेल्या आणि ‘रसिक आंतरभारती’ने प्रकाशित केलेल्या ‘ब्रँडनामा’ या पुस्तकाचे प्रकाशन शनिवारी (दोन डिसेंबर) पुण्यात झाले. त्या वेळी ते बोलत होते. ‘बुकगंगा डॉट कॉम’ने या पुस्तकाचे ‘ई-बुक’ प्रकाशित केले आहे. ब्रँड या संकल्पनेची सर्वंकष ओळख करून देणारे ‘ब्रँडनामा’ हे मराठीतील पहिलेच पुस्तक आहे.

विविध क्षेत्रांत आपापला ब्रँड निर्माण केलेले आणि अभिजित जोग यांनी ज्यांच्या व्यवसायांचे ब्रँडिंग करून त्यांच्या विस्तारासाठी साह्य केले अशा मान्यवरांना या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले होते. अभिनेते सचिन खेडेकर, ‘परांजपे बिल्डर्स’चे शशांक परांजपे, सारस्वत बँकेचे अध्यक्ष गौतम ठाकूर, ‘चितळे बंधू मिठाईवाले’चे श्रीकृष्ण चितळे, ‘पु. ना. गाडगीळ ज्वेलर्स’चे सौरभ गाडगीळ यांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. ‘बुकगंगा’चे सीईओ मंदार जोगळेकर, तसेच अन्य मान्यवरही या वेळी उपस्थित होते. 

‘येत्या काळात उद्योग, सेवा, व्यक्तिमत्त्व या प्रत्येकाच्या विकासासाठी ब्रँड या संकल्पनेची गरज आहे. हे मराठी उद्योजकांना, तसेच नागरिकांना कळण्याची गरज आहे. त्या प्रेरणेतूनच मी हे पुस्तक लिहिले,’ अशी भावना अभिजित जोग यांनी व्यक्त केली. ‘उद्योगविश्वात मराठी माणूस मोठा झाला असला, तरीही त्याचा ब्रँडिंग क्षेत्रावर प्रभाव पडू शकलेला नाही. या क्षेत्रात येण्यासाठी मराठी माणसांना कोणी मार्गदर्शन करत नाही. त्यामुळे मराठी माणसानेच मराठी माणसाला मदत करण्याची गरज आहे,’ असे मत अभिनेते सचिन खेडेकर यांनी मांडले. 

या वेळी युवा लेखक-दिग्दर्शक क्षितिज पटवर्धन याने घेतलेली प्रमुख पाहुण्यांची मुलाखत विशेष रंगली. अभिजित जोग यांनी ब्रँडिंगसाठी केलेल्या मदतीमुळे आपण व्यवसायात कशी ओळख निर्माण केली, याची रंगतदार कहाणी या सर्वांकडून उपस्थितांना ऐकायला मिळाली. ‘सेवा क्षेत्राला ब्रँडिंगची गरज काय, असे लोकांना वाटते; पण तिथेही त्याची नक्कीच गरज आहे. सहकारी बँकांमध्ये न्यूनगंड असतो; मात्र ‘सारस्वत बँक’ केवळ मुंबईपुरती किंवा सारस्वतांपुरतीच मर्यादित असल्याचा समज ब्रँडिंगमुळे पुसून टाकला गेला आणि आज आधुनिक आणि तत्पर सेवा देणारी देश पातळीवरील बँक म्हणून या बँकेचे ब्रँडिंग झाले आहे,’ असे ‘सारस्वत बँके’चे अध्यक्ष गौतम ठाकूर यांनी सांगितले. 

‘खाद्यपदार्थांची गुणवत्ता राखण्यासोबतच व्यवसायाचा विस्तार करताना ब्रँडिंग, ट्रेडमार्क याबाबत आम्ही आग्रही असतो,’ असे श्रीकृष्ण चितळे यांनी सांगितले. परदेशात पेप्सी, चॉकलेट्स, कॅडबरीज हे पदार्थ व्हेंडिंग मशीनद्वारे मिळत असतील, तर तिकडे ‘बाकरवडी’ची व्हेंडिंग मशीन्स बसवता येतील का, याचा विचार करत असल्याचेही चितळे यांनी सांगितले.
 
मनोगत व्यक्त करताना ‘ब्रँडनामा’चे लेखक अभिजित जोग

‘पूर्वी आमची टॅगलाइन ‘प्रेरणा सचोटीची, विश्वासाची’ अशी होती. या गोष्टी आमचे प्रेरणास्थान आजही आहेतच; पण बदलता काळ, राहणीमान, जीवनशैली, विभक्त कुटुंबपद्धती यानुसार आम्ही ‘प्रेरणा नव्या भारताची’ अशी नवी ब्रँडलाइन अंगीकारली. ‘अथश्री’ हा ज्येष्ठांसाठीचा प्रकल्प उभारून आणि जाहिरातीतही त्याचा कल्पकतेने वापर करून ज्येष्ठांसाठी, वृद्धांसाठी सेवा देणारा वास्तुउद्योजक म्हणून ‘ब्रँडिंग’ केले,’ असे शशांक परांजपे यांनी सांगितले. 

‘‘ब्रँड अँबेसेडर’ म्हणून सलमान खानला निवडणे ही एक प्रकारे रिस्कच होती; मात्र ‘पीएनजी’च्या दुबई, अबूधाबी येथील शाखेत येणारे ग्राहक डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला. ‘भाई यहाँ से सोना लेता है’ असे म्हणून तेथील ग्राहक दुकानात येतात. परंपरागत ग्राहक दूर जाणार नाही, याची काळजीही घेतली. अमेरिका, लॉस एंजलीस येथे ‘पीएनजी’चा विस्तार करताना तेथील ग्राहक ओळखून माधुरी दीक्षितला ब्रँड अँबेसेडर म्हणून निवडले,’ असे सौरभ गाडगीळ यांनी सांगितले.  

अनीश जोग आणि ‘रसिक आंतरभारती’चे योगेश नांदूरकर यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. नम्रता वागळे यांनी सूत्रसंचालन केले.

 (‘ब्रँडनामा’ हे पुस्तक आणि ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.)

 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link