Next
‘नव्या पिढीने पुरातत्त्व व मूर्तिशास्त्र संशोधनाचे काम पुढे न्यावे’
पुण्यभूषण पुरस्कार देऊन पुणेकरांनी विद्वानांच्या रांगेत बसविल्याची डॉ. गो. बं. देगलूरकरांची भावना
विवेक सबनीस
Saturday, March 30, 2019 | 11:00 AM
15 0 0
Share this article:

डॉ. गो. बं. देगलूरकरपुणे : ‘मी पुण्यात शिकायला जाण्यापूर्वी आईने बजावले होते, की पुणे हे पंडित व विद्वानांचे गाव आहे. तू किमान त्यांच्या पायाशी बसायची योग्यता निर्माण कर. आज या पुणेकरांनीच मला गौरवून अशाच विद्वानांच्या रांगेत बसवले आहे,’ अशी कृतज्ञ भावना ज्येष्ठ पुरातत्त्ववेत्ते आणि मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांनी ‘बाइट्स ऑफ इंडिया’शी बोलताना व्यक्त केली. नवीन पिढीने पुरातत्त्व व मूर्तिशास्त्रातील संशोधन पुढे न्यायला हवे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. ‘त्रिदल, पुणे,’ पुण्यभूषण फाउंडेशन आणि पुणेकर यांच्या वतीने देण्यात येणाऱ्या पुण्यभूषण पुरस्कारासाठी यंदा डॉ. देगलूरकरांची निवड करण्यात आली. त्यानंतर त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी ‘बाइट्स ऑफ इंडिया’तर्फे त्यांच्याशी संवाद साधण्यात आला. 

‘मी पुण्याला काय दिले, हे मला माहीत नाही; पण पुण्याने मात्र मला खूप भरभरून दिले. याच शहराने मला शांताराम भालचंद्र देव यांच्यासारखे मार्गदर्शक गुरू दिले. घरातील वारकरी संप्रदायातील तत्त्वज्ञान व अध्यात्माचे संस्कारही मला आजवरच्या वाटचालीला पोषक ठरले आहेत,’ असे डॉ. देगलूरकर म्हणाले. 

उस्मानाबाद जिल्ह्यातील हिप्परगा येथे परमभागवत देगलूरकर घराण्यात त्यांचा जन्म झाला. शालेय शिक्षणानंतर पुढील शिक्षणासाठी ते पुण्यात आले. डॉ. देगलूरकर हे पुण्यभूषण पुरस्काराचे ३१वे मानकरी आहेत. एक लाख रुपये, सोन्याच्या फाळाने पुण्याची भूमी नांगरत असलेल्या बालशिवाजीची प्रतिमा, कसबा गणपती आणि तांबडी जोगेश्वरी या पुण्याच्या ग्रामदेवतांसह असलेले स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ‘या पुरस्काराने मला खूप आनंद झाला आहे,’ असे सांगून डॉ. देगलूरकर म्हणाले, ‘क्षणभर मनात विचार आले, की यापूर्वी ज्यांना पुरस्कार मिळाले, त्यात मी खरंच बसतो का? या पुरस्काराने मला आधीच्या सर्व विद्वानांजवळ बसण्याची संधी दिली आहे!’ 

डॉ. देगलूरकरांशी साधलेल्या संवादाचा काही भाग येथे देत आहोत.

सर, पुण्यभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रथम तुमचे अभिनंदन! 
डॉ. देगलूरकर : धन्यवाद! 

प्रश्न : तुमचे महाविद्यालयीन शिक्षण पुण्यात स. प. महाविद्यालयात झाले. पुरातत्त्वशास्त्राशी व त्याला जोडून येणाऱ्या कला व मूर्तिशास्त्राशी तुमचा संबंध तेव्हापासून जोडला गेला का? 
डॉ. देगलूरकर : पुण्यात मी १९५१ ते ५५ या काळात शिकत होतो. ‘बीए’ला माझे मुख्य विषय इतिहास व राज्यशास्त्र असे होते. तेव्हा डॉ. चोक्सी, ओतूरकर, फडके, दीक्षित यांच्यासारखे नाणावलेले प्राध्यापक शिकवायला होते. पुढे उस्मानिया विद्यापीठातून एमए करतानाही मी हेच विषय घेतले होते. एमए झाल्यावरही मला महाविद्यालयात इतिहासाचा प्राध्यापक म्हणूनच नेमण्यात आले होते. तेव्हा इतिहासातील एक छोटा भाग म्हणून पुरातत्त्वशास्त्र व कलांचा समावेश त्यात होता; पण त्यानंतर पुणे विद्यापीठा ‘पीएचडी’साठी अभ्यास करताना मराठवाड्याचा सांस्कृतिक इतिहास हा विषय घेतला. तेव्हा मला डॉ. शां. भा. देव यांचे मार्गदर्शन लाभले. माझा प्रबंध ज्येष्ठ इतिहास संशोधक ग. ह. खरे आणि एम. एन. देशपांडे यांच्यासारख्यांच्या कौतुकास पात्र राहिला. पुढे नागपूर विद्यापीठाकडून मला देवळांचे वास्तुरचनाशास्त्र आणि शिल्पकला यामध्ये मानाची डी. लिट. पदवी मिळाली. या साऱ्यातून माझी पुरातत्त्व व मूर्तिशास्त्र या दोन्ही विषयांतील आवड वाढीस लागली. 

प्रश्न : बालपणापासून तुमची वैयक्तिक जडणघडण वारकरी संप्रदायाच्या संस्कारात झाली. त्याचा या संशोधनात काही उपयोग झाला का?
डॉ. देगलूरकर : हो. वारकरी विचारांनी मला स्थापत्य व मूर्तिकलेकडे पाहण्याची नजर दिली. कारण मंदिर स्थापत्य व मूर्ती हाताळताना केवळ तेवढे पाहणेच पुरेसे नसते. या दोन्ही गोष्टी जेव्हा प्रगत होत गेल्या, तेव्हा त्यामागे असणारा सांस्कृतिक ठेवाही लक्षात घ्यायला माझ्या पार्श्वभूमीची मदत झाली. उदाहरणार्थ, एखादी मूर्ती साकार होताना ती मूर्ती भक्तांना व तेव्हाच्या समाजाला ज्या गुणांची आवश्यकता आहे ते गुण साकारते. कारण मूर्तिपूजा म्हणजे केवळ मूर्तिपूजा नसून, ती गुणांची, तसेच त्यामागच्या तत्त्वज्ञानाची पूजा असते. हे सर्वसामान्यांच्या लक्षात येत नाही. वारकरी संप्रदायातील अभंग-निरुपणांमध्ये यातील अनेक गोष्टींचे खुलासे मिळतात. अंगावर विंचू चढताना त्याला झटकणाऱ्या सुरसुंदरीची मूर्ती ही तिच्या शरीरसौष्ठवासाठी नसून, या विंचवाच्या निमित्ताने काम-क्रोध या विकारांचे दर्शन घडवणारी नाथांची भारूडे त्यामागे आहेत. हा अर्थ त्या मूर्तीतून व्यक्त होतो; पण काहींना मात्र त्या मूर्तीतील स्त्री-सौष्ठव दिसते. हा दृष्टिकोनातला फरक आहे. 

प्रश्न : हा मुद्दा अधिक विस्ताराने मांडता येईल?
डॉ. देगलूरकर : नक्कीच. दुसरे उदाहरण म्हणजे अर्धनारीनटेश्वराचे शिल्प. या शिल्पात केवळ स्त्री व पुरुष नाहीत, तर त्यातून प्रकती आणि पुरुष ही तत्त्वं एकत्र दाखवली आहेत. यातून सांख्य तत्त्वज्ञान समूर्त झाले आहे! या मूर्तीचे दर्शन घेताना हे सारे तत्त्वज्ञान आठवायला हवे. या तत्त्वज्ञानाप्रमाणे वागलात, तर मोक्षप्राप्ती होईल, याची आठवण करून देणारी ही मूर्ती आहे. मला लाभलेल्या परंपरेतून मी मूर्ती घडवण्यामागचा अर्थ लावत असतो. 

प्रश्न : प्राच्यविद्येच्या अभ्यासाला तुम्ही मराठवाड्यावरील प्रबंधापासून सुरुवात केली. यामागचे कारण काय? 
डॉ. देगलूरकर : याचे कारण म्हणजे प्राचीन महाराष्ट्राचा उगम म्हणजे बृहत्तर मराठवाड्याची संस्कृती आहे. याचे कारण इसवी सनापूर्वीपासून सातवाहन ते अगदी नंतरच्या यादवकालीन राजांच्या राजधान्या मराठवाड्यात होत्या. इथे या राजांच्या संस्कृतींचे मानदंड नंतर महाराष्ट्रात पसरत गेले. या संशोधनाला अगदी ग. ह. खरे यांच्यासारख्या ज्येष्ठ संशोधकांनीही मान्यता दिली आहे. या संशोधनाची सत्यता यापूर्वी मराठवाड्यातील तेर, पैठण आणि भोकरदन येथील उत्खननातून झाली आहे. बीड व परभणी येथेही अधिक संशोधन झाले पाहिजे. मूर्तिशास्त्राच्या दृष्टीनेही अजिंठ्याच्या वाटेत अन्व या गावातील मंदिरावर विष्णूच्या २४ विभवांच्या (नावे) व त्यांच्या शक्तींचे शिल्पांकन आहे. असे शिल्पांकन भारतात अन्यत्र कुठेही मिळालेले नाही. विष्णूची जी केशव, नारायण अशी २४ नावे आहेत, ती त्यांच्या अनुक्रमे कीर्ती व कांतीच्या रूपात स्त्रीशिल्पातून दाखवली आहेत. त्यांच्या हातातील शंख, चक्र, गदा व कमळ या आयुधांच्या क्रमवारीनुसार अर्थ निघतो. या २४ स्त्रिया विष्णूच्या पत्नी नसून, शक्ती किंवा प्रेरणा आहेत. या अर्थाच्या जोड्या पोथ्यांमधून, तसेच संस्कृत शब्दांमधून प्रतीत होतात. 

प्रश्न : मूर्तिशास्त्राप्रमाणेच मंदिरस्थापत्याचा अभ्यासही त्याच पद्धतीने करता येतो का? 
डॉ. देगलूरकर : मुळात मूर्ती आहे म्हणून मंदिर आहे. ‘देह देवाचे मंदिर, त्यात आत्मा परमेश्वर’ या उक्तीनुसार या दोन्हींचा संबंध आपले अध्यात्म व हरिपाठाशी येतो. ‘देवाचिये द्वारी, उभा क्षणभरी, तेणे मुक्तिचारी साधियेल्या’ हा अनुभव मला खजुराहो येथील कंधारीय महादेव मंदिरापाशी आला. तोच अनुभव गोंदेश्वर आणि अंबरनाथ मंदिरापाशीही आला. यातून संपूर्ण देऊळ उभे राहते. देवासमोर या मंदिरात उभे राहताना त्यातील स्वरूपता आणि सायुज्यता या दोन्ही तत्त्वांशी मी जोडला जातो. मी व देव एक झालो. मूर्ती माझ्यासाठी आहे व तो मीच आहे, ही अनुभूती त्यातून आली! हा सारा विचार मंदिराच्या स्थापत्यामागे केला गेल्यामुळेच त्या स्थापत्याचे कौतुक करावे लागेल. या मंदिर स्थापत्यात मंदिराच्या बाहेरही देवतांची शिल्पे आहेत. त्यांची पूजा करून मगच आतल्या रचनेत आपण प्रवेश करतो. आतल्या मूर्तीकडे केवळ चर्मचक्षूंनी न बघता भावचक्षूंनी पाहायला आपल्या संतांनीच शिकवले! त्या अर्थाने मूर्ती व देवालय हे भिन्न नाही. 

प्रश्न : आपल्याकडे मंदिरे बांधण्याच्या भिन्न शैली पाहायला मिळण्यामागचे कारण?
डॉ. देगलूरकर : मंदिरस्थापत्यात असणारी नागर शैली उत्तरेकडून आली, तर दक्षिणेकडे द्राविड पद्धतीची मंदिरे उभारली गेली. या दोन्ही शैली त्यांच्या शिखरांच्या ठेवणीवरून समजतात. महाराष्ट्रातील मंदिरे मात्र नागर भूमीज किंवा हेमाडपंती आहेत. उत्तरेकडे ओडिशा, गुजरात, राजस्थान येथील नागर पद्धत महाराष्ट्रात आल्यावर तिला थोडा वेगळा आकार प्राप्त झाला. आपल्याकडे मूर्तिशास्त्र हे मंदिरस्थापत्यापेक्षा जुने असून, त्याचे उल्लेख इसवी सनपूर्व चौथ्या शतकापर्यंत सापडतात. 

प्रश्न : परकीय आक्रमणातून आपल्याकडे देवळे व मूर्तिभंजन झाले. यामागची मानसिकता काय असावी? 
डॉ. देगलूरकर : देवळे व मूर्ती फोडणारे हे मूर्तिपूजक नाहीत. यामागे आक्रमण करणाऱ्या परधर्मीयांची हिंसक प्रवृत्ती दिसते. यातून आपले खूप नुकसान झाले. हिंदुस्थानात संस्कृती संपन्नतेचा कालखंड १३व्या शतकापर्यंत होता. आर्य चाणक्याचा अर्थशास्त्रावरचा ग्रंथ याच कालखंडातला आहे. चाणक्य, बुद्ध, महावीर ते समुद्रगुप्त अशी ही परंपरा आहे. त्यातला चौथे ते सातवे शतक हा आपल्याकडचा सुवर्णकाळ समजला जातो. या काळात आपली संस्कृती, कला, अध्यात्म, तत्त्वज्ञान यावर खूप अभ्यास झाला. १३व्या शतकापासून परकीय मुस्लिम आक्रमणांमुळे आपली जीवनशैली अस्थिर बनली व हे नवनिर्मितीचे काम थांबले. या शास्त्रांकडे दुर्लक्ष झाले. पु. ग. सहस्रबुद्धे यांच्या शब्दात सांगायचे, तर आपला जीवनरस आटला आणि विजिगिषू वृत्ती संपली; पण येथूनच प्रेरणा देणारी संत परंपरा सुरू झाली. तीही तितकीच महत्त्वाची आहे. 

प्रश्न : आपल्याकडे पुरातत्त्व या विषयावरील वस्तुसंग्रहालये फार नाहीत. त्यासाठी सरकारी मदतीने प्रयत्न करावेसे वाटतात का? 
डॉ. देगलूरकर : असे एखादे मोठे म्युझियम असावे, ही कल्पना नक्कीच चांगली आहे. त्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. महाराष्ट्रात असे प्रयत्न स्थानिक पातळीवर त्या त्या ठिकाणांपुरते मर्यादित पातळीवर आहेत. पुण्यात जसे राजा केळकर संग्रहालय आहे, तसेच औंधच्या पंतप्रतिनिधींचे संग्रहालय आहे. महाराष्ट्र शासनाने तेर येथे सातवाहनकालीन वस्तूंचे संग्रहालय उभारले आहे. रागलिंगप्पा यांच्या मदतीने ही संकल्पना साकार होऊ शकली. महाराष्ट्र वस्तुसंग्रहालयाचे आणखी एक ठिकाण म्हणजे डेक्कन कॉलेज. यात महाराष्ट्रातील अनेक उत्खननांमध्ये सापडलेल्या वस्तू आहेत. पुरातन युगापासून ते आजपर्यंतची हत्यारे त्यात आहेत. विदर्भात नायकुडे या गावातील उत्खननात सापडलेली लोखंडाची भट्टीही आहे. आपल्याकडे राजस्थानपाशी कालिबंधन येथे उत्खनानात नांगरलेले शेत व यज्ञकुंड सापडले. यातून पाच हजार वर्षांपूर्वीच्या आपल्याकडच्या यज्ञसंस्कृतीचे दर्शन घडते. तोच मुद्दा गुप्त सरस्वती नदीची संस्कृती शोधताना येतो. मोहेंजोदडोपेक्षाही जुनी असणारी ही संस्कृती सिंधू-सरस्वती संस्कृती आहे. त्यासंबंधात आणखी उत्खनने व्हायला हवीत. आपले पुरातत्त्व व मूर्तिशास्त्र यांसंबंधीचे सरकारी धोरण व्यवस्थित आहे. हे काम सरकारबरोबरच लोकसहभागातून होणे शक्य आहे. पश्चिम महाराष्ट्रात काही प्रमाणात पडलेल्या मंदिरांचे काम चालू आहे. कर्नाटकात पडझड झालेल्या सुमारे ४० मंदिरांची पुनर्उभारणी लोकसहभागातून होत आहे. हेही एक प्रकारे पुरातत्त्व व मूर्तिशास्त्राचे जतन आहे. 

प्रश्न : आज मागे वळून पाहताना पुरातत्त्व व मूर्तिशास्त्रात जे काही काम झाले आहे, त्याच्या आणखी पुढे जाण्यासाठी नवीन पिढीकडून तुमच्या कोणत्या अपेक्षा आहेत?
डॉ. देगलूरकर : माझ्यासारख्या माणसाला डेक्कन कॉलेजात भारतीय पुरातत्त्वशास्त्राचे जनक समजल्या जाणाऱ्या एच. डी. सांखलिया यांचा सहवास लाभला. त्यांच्या प्रेरणेतून तेव्हा भारतात ठिकठिकाणी पुरातत्त्व या विषयावर अभ्यासक्रम सुरू झाले. हे काम त्यांच्याच विद्यार्थ्यांनी केले. आज माझ्या हाताखाली तयार झालेल्यांनीही त्यांची कामे मुंबई विद्यापीठ व सोलापूर येथे सुरू केली आहेत. नवीन पिढीच्या सहभागातून ही कामे पुढे चालू राहिली पाहिजेत, यात शंका नाही. या क्षेत्राकडे कमी विद्यार्थी येत असले, तरी त्यांची गुणवत्ता चांगली आहे. सुदैवाने या क्षेत्रातील संशोधनासाठी नवनवे तंत्रज्ञान उपलब्ध होत आहे. यातून शिलालेखशास्त्र, नाणकशास्त्र, मंदिर स्थापत्यशास्त्र आणि मूर्तिशास्त्रात आता नवीन पिढी रस घेऊ लागली आहे, हे सुचिन्ह समजावे लागेल. अशी काम करणारी पिढी केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतभर निर्माण होताना दिसते आहे. माझ्यासारख्याची दृष्टी ही आदिभौतिकापेक्षा आध्यात्मिक पातळीवरची असल्यामुळे मला हे शास्त्र माझ्या नजरेतून पाहता आले. आज यात आणखी नवीन भर घालण्याची आव्हाने आहेत. नवीन संशोधक ती नक्कीच पेलतील, अशी माझी खात्री आहे! 

(सोबत व्हिडिओ देत आहोत. डॉ. गो. बं. देगलूरकर यांची पुस्तके ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून थेट घरपोच मागविण्यासाठी येथे क्लिक करा.)

 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Bal Gramopadhye About 143 Days ago
Nice to know that there are studious people like him . May the tradition continue . A break will be disaster .
0
0

Select Language
Share Link
 
Search