Next
देव-घैसास-कीर महाविद्यालयात फळप्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळा
पटवर्धन हायस्कूल माजी विद्यार्थी संघाकडून आयोजन
BOI
Friday, May 17, 2019 | 02:27 PM
15 0 0
Share this article:रत्नागिरी :
रत्नागिरीतील भारत शिक्षण मंडळाच्या देव-घैसास-कीर कला, वाणिज्य, विज्ञान वरिष्ठ महाविद्यालयामध्ये १५ मे रोजी विद्यार्थ्यांसाठी फळप्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. कोकणातील फळांवर प्रक्रिया करण्याची माहिती विद्यार्थ्यांना व्हावी, त्यांना सुट्टीत त्याचे प्रयोग करता यावेत आणि भविष्यात त्यांच्यातून उद्योजक घडावेत, या हेतूने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

भारत शिक्षण मंडळाच्या पटवर्धन हायस्कूलचा माजी विद्यार्थी संघ, पटवर्धन हायस्कूल, श्यामराव पेजे स्मृती न्यास, देव-घैसास-कीर वरिष्ठ महाविद्यालयाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने दुपारी १२ ते सायंकाळी पाच या वेळेत ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. अशा प्रकारच्या कार्यशाळेचे हे दुसरे वर्ष होते. 

मार्गदर्शन करताना डॉ. गोविंद जोशी

या कार्यशाळेची सुरुवात मान्यवरांचे स्वागत करून करण्यात आली. त्यानंतर माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष डॉ. दिलीप नागवेकर यांनी प्रास्ताविकातून मान्यवरांचा परिचय करून दिला. भारत शिक्षण मंडळाचे सदस्य विश्वनाथ उर्फ बाबा शिंदे यांनी औपचारिकरीत्या फळप्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळेचे उद्घाटन केले. श्यामराव पेजे स्मृती न्यासाचे विश्वस्त हरिश्चंद्र गीते यांनी या फळप्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळेच्या माध्यमातून कौशल्यविकास साधला गेला पाहिजे, असे आवाहन करून फळप्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळेसाठी शुभेच्छा दिल्या.या कार्यक्रमाला दापोलीच्या डॉ. बाळासाहेब कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर, विद्यापीठाचे माजी शिक्षण संचालक डॉ. गोविंद जोशी, सौ. गीतांजली जोशी, पटवर्धन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाचे उपमुख्याध्यापक मिलिंद कदम, पटवर्धन हायस्कूलचे शिक्षक सत्यवान कोत्रे, महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्या नीलोफर बन्नीकोप आदी मान्यवर उपस्थित होते. 

फळप्रक्रिया प्रशिक्षण कार्यशाळेमध्ये गीतांजली जोशी यांनी काजू सरबत, काजू खजूर (कँडी), आंब्याचे पन्हे, छुंदा, करवंद लोणचे, करवंद सरबत (सिरप), कोकम सरबत (सिरप) आदी पदार्थ तयार करून दाखविले. त्यामुळे फळप्रक्रिया मुलांना प्रत्यक्ष पाहता आली. ‘काजू बोंडे सर्वप्रथम शिजवली जातात. त्यामुळे खवखवणारा पदार्थ त्यातून काढला जातो आणि त्यापासून वर्षभर टिकणारे पदार्थ तयार करता येतात,’ असे गीतांजली जोशी यांनी सांगितले.समारोपप्रसंगी डॉ. श्रीरंग कद्रेकर म्हणाले, ‘कोकणातील सर्व फळे पोषणद्रव्यांनी समृद्ध आहेत. या फळांमध्ये अनेक जीवनसत्त्वे आहेत. त्यामुळे ती आरोग्यासाठी अत्यंत गुणकारी आहेत. तरीही कोकणातील ३० ते ४० टक्के फळे प्रक्रियेअभावी वाया जातात. ती वाचविण्यासाठी प्रक्रिया करणे आवश्यक आहे.’ कार्यशाळेमध्ये शिकलेले पदार्थ स्वयंसेवकांनी उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये तयार करावेत, असे आवाहनही त्यांनी केले. 

‘काजू हे कोकणामधील महत्त्वाचे पीक आहे. काजू बी आणि काजू बोंड या दोन्हींपासून उत्पादन मिळते. काजू बोंडापासून सिरप व उरलेल्या चोथ्यापासून कँडी तयार करता येते,’ असे डॉ. गोविंद जोशी यांनी सांगितले. ‘असे प्रशिक्षण म्हणजे बौद्धिक सुविधा आहे. समृद्ध समाज घडविण्यासाठी ते फार महत्त्वाचे आहे,’ असेही त्यांनी सांगितले.‘कोकणातील फळांपासून प्रक्रिया पदार्थ करायला शिकल्यास विद्यार्थ्यांना निश्चितच अर्थार्जनासाठी फायदा होईल. याच हेतूने पटवर्धन हायस्कूलच्या माजी विद्यार्थी संघाकडून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले,’ असे संघाचे अध्यक्ष डॉ. दिलीप नागवेकर म्हणाले. 

मरीनर दिलीप भाटकर म्हणाले, ‘बदलत्या जीवनात बदलत्या शिक्षणपद्धतीमध्ये व्यावसायिक शिक्षण फार महत्त्वाचे आहे. कोकणामधील कोकणीपणा (आपलेपणा) जिवंत ठेवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.’ या वेळी संतोष कुष्टे, बाळकृष्ण साळवी, महाविद्यालयाच्या उपप्राचार्या व राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख मधुरा पाटील, ऋतुजा भोवड, प्रथमेश भागवत, विनय कलमकर, वैभव कीर यांच्यासह अन्य प्राध्यापकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे स्वयंसेवक उपस्थित होते. 

‘माजी विद्यार्थ्यांनी आताच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला हा सुंदर, उपयुक्त उपक्रम आहे,’ अशी प्रतिक्रिया पटवर्धन हायस्कूलचे उपमुख्याध्यापक मिलिंद कदम यांनी व्यक्त केली. 

‘खेड्याकडे चला ही कल्पना प्रत्यक्षात आणायची असेल, तर महाविद्यालयीन पातळीवर असे उपक्रम व्हायला हवेत,’ असे मत राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. मधुरा पाटील यांनी मांडले.

देवराज सुर्वे (प्रथम वर्ष, वाणिज्य) याने विद्यार्थ्यांच्या वतीने आपले मत मांडले. ‘वेगवेगळ्या फळांचा उपयोग कसा करता येईल, याचे ज्ञान आम्हाला या कार्यशाळेतून मिळाले. याचा भविष्यात आम्हाला नक्कीच फायदा होईल,’ असे तो म्हणाला. प्रा. ऋतुजा भोवड यांनी शिक्षकांच्या वतीने आपले अनुभवकथन केले. 

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कौस्तुभ फाटक याने, तर आभारप्रदर्शन डॉ. दिलीप नागवेकर यांनी केले. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
D R Patil About 59 Days ago
Very useful program to students
0
0

Select Language
Share Link
 
Search