Next
जनजागृतीसाठी ‘तो’ करतोय देशभर सायकल प्रवास
प. बंगालचा अक्षय भगत पोहोचला महाराष्ट्रात
BOI
Saturday, December 08, 2018 | 03:57 PM
15 0 0
Share this article:

अक्षय भगतनाशिक : प्रत्येकाची प्रवास करण्यामागची कारणे वेगवेगळी असतात; मात्र एखाद्या ध्येयाने पछाडून प्रवासाला निघणारे विरळेच असतात. प. बंगालचा अक्षय भगत असाच एक ध्येयवेडा तरुण. अनिष्ट रूढी, प्रथांबाबत जनजागृती करण्यासाठी तो सध्या देशभर सायकलवरून प्रवास करत असून, नुकताच तो नाशिकला पोहोचला. 

मूळचा पश्चिम बंगालमधील कुरुलिया जिल्ह्यातील बुधडा गावचा रहिवासी असणारा अक्षय बालविवाह प्रतिबंध, बालकांचे लैंगिक शोषण, निसर्ग व पर्यावरणाची होणारी हानी आणि शेतकऱ्यांच्या होणाऱ्या आत्महत्या या मुद्द्यांवर लोकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने सायकलवरून देशभर प्रवास करण्यास निघाला आहे. पाच मार्च २०१८ रोजी अक्षयने आपल्या या मोहिमेचा शुभारंभ केला. आतापर्यंत तब्बल १६ हजार किलोमीटरचा प्रवास करून तो नुकताच नाशिकला पोहोचला.  नाशिकच्या सायकलिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष प्रवीण खाबिया यांच्या हस्ते त्याचा सत्कार करण्यात आला. 

 अक्षय जेमतेम दहावीपर्यंत शिकला असून, वाचनालयात अभ्यास करून त्याने हे शिक्षण घेतले आहे. घरची परिस्थिती बेताची असल्याने, पोटापाण्यासाठी काम करावे लागल्यामुळे त्याला शाळेत जाता आले नाही. समाजात होत असलेल्या बदलांकडे तो सजगपणे पहात असल्याने आजही आपल्या देशात बालविवाह, बालकांचे लैंगिक शोषण, पर्यावरणाची हानी, शेतकरी आत्महत्या असे प्रकार घडत आहेत, हे लक्षात आल्याने तो अस्वस्थ झाला. यासाठी काहीतरी केले पाहिजे असे त्याला सातत्याने वाटू लागले. काय करता येईल, याचा विचार करत असतानाच, त्याला सायकलवरून देशभर फिरून या बाबींबाबत जनजागृती करण्याची कल्पना सुचली आणि पाच मार्च २०१८ रोजी त्याने पश्चिम बंगाल येथून आपल्या सायकलमोहिमेला सुरुवात केली. 

त्याच्या सायकलवर त्याने वेगवेगळ्या मुद्द्यावर जनजागृतीपर फलक लावलेले आहेत. लोकांना या अनिष्ट प्रथमपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे. रस्त्याने लागणाऱ्या शाळा-महाविद्यालयात जाऊन तो शेतकरी आत्महत्या, बाललैंगिक शोषण आणि बालविवाह आदी मुद्द्यांबाबत जनजागृती करत आहे. 

आतापर्यंत त्याने पश्चिम बंगाल, झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू काश्मीर, पंजाब, राजस्थान, गुजरात आदी १४ राज्ये पार करून महाराष्ट्रात प्रवेश केला आहे. आता तो नाशिकहून मुंबई, पुणे, गोवा, कर्नाटक, केरळ असा प्रवास करणार असून, २९ राज्यांमधील तीस हजार किलोमीटरचा प्रवास चारशे दिवसात पूर्ण करणार आहे. 

पश्चिम बंगालमधून त्याने जेव्हा प्रवास सुरू केला होता, तेव्हा त्याच्या खिशात केवळ दोन हजार रुपये होते; मात्र आता ज्या ठिकाणी तो जात आहे त्या ठिकाणचे नागरिक त्याला मदत करतात. तो दिल्लीला पोहोचल्यावर त्याला एका वकिलांनी चाळीस हजार रुपये किमतीची सायकल घेऊन दिली. तो प्रवासादरम्यान मंदिरे, धर्मशाळा, वेळ पडल्यास फुटपाथवर मुक्काम करतो. त्याच्या या मोहिमेला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, लोक त्याचे कौतुक करत आहेत. 
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link
 
Search