Next
बापट यांनी घेतला मेट्रो कामाचा आढावा
प्रेस रिलीज
Saturday, April 07, 2018 | 04:10 PM
15 0 0
Share this storyपुणे : पालकमंत्री गिरीश बापट यांनी पुणे मेट्रोच्या कामाचा आढावा घेतला. पाच एप्रिलला सकाळी शिवाजीनगर धान्य गोदाम, कृषी महाविद्यालयाचे मैदान, रेंजहिल्स तसेच खडकी स्टेशन येथे जाऊन प्रत्यक्ष कामाची पाहणी केली. मेट्रोच्या कामाला आणखी गती देण्यासाठी त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या.  

वनाज ते रामवाडी तसेच पिंपरी-चिंचवड ते स्वारगेटपर्यंत मेट्रो पहिल्या टप्प्यात करण्यात येणार आहे. अतिशय जलद गतीने मेट्रोची कामे सुरू आहेत. शिवाजीनगर येथील धान्य गोदामाजवळ मेट्रोचे स्टेशन करण्यात येणार आहे, तर कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर मेट्रोचा डेपो करण्यात येणार आहे.

शिवाजी नगर येथे धान्याची २१ गोदामे असून, तेथे १५ इमारती आहेत. या पंधरापैकी हवेली सेतू केंद्राच्या जागेसह चार गोदामांचे महामेट्रोकडे हस्तांतरण करण्यात आले आहे. येथे असणाऱ्या सेतू केंद्राची जागा रिकामी करण्यात आली असून, हे सेतू केंद्र लवकरच एसटीच्या जागेवर स्थलांतरीत करण्यात येणार आहे.

पुणे जिल्हा नागरी सुविधा केंद्र वैकुंठभाई मेहता महाविद्यालयाशेजारी असणाऱ्या जागेत हलवण्यात येणार आहे. अन्य दोन इमारतींचा ताबाही लवकरच मेट्रोकडे देण्यात येणार आहे. उर्वरीत इमारतींमध्ये पुरवठा विभाग, अन्न धान्य वितरण विभाग तसेच जिल्हा प्रशासनाचे साहित्य तसेच अन्न धान्य असल्याने या इमारती अद्याप मेट्रोकडे हस्तांतरीत करण्यात आल्या नाहीत.

या इमारती मेट्रो देण्याबाबत काय अडचणी आहेत याची पालकमंत्र्यांनी जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेतली. येथील गोदामांसाठी एकत्रित जागा न मिळाल्यास वेगवेगळ्या ठिकाणी विभागानुसार ही गोदामे स्थलांतरीत करण्याची  सूचना बापट यांनी या वेळी केली. कृषी महाविद्यालयाच्या मैदानात मेट्रोचा डेपो करण्यात येणार आहे. पिंपरी-चिंचवड ते कृषी महाविद्यालयापर्यंत मेट्रो जमिनीवरून जाणार आहे, तर कृषी महाविद्यालयाच्या मैदानातून येथून स्वारगेटपर्यंत मेट्रो भुयारी मार्गातून जाणार आहे. या कामाच्या प्रगतीबद्दल त्यांनी माहिती घेतली.

या कामामुळे कामगार पुतळा येथील २०० झोपड्या बाधित होणार आहेत; तसेच राजीव गांधीनगर येथे ३६ झोपड्या बाधित होणार आहेत. या झोपड्यांचे पुनर्वसन तसेच मेट्रोच्या मार्गात येणाऱ्या ४०० झाडांचे पुर्नरोपण मेट्रोकडून करण्यात येणार असल्यायाबाबत ही बापट यांनी माहिती घेतली.

गोदामांमध्ये कार्यरत असणाऱ्या हमालांना ही मेट्रोने त्यांच्या सेवेत सहभागी करून घ्यावे, अशा सूचना त्यांनी मेट्रोच्या अधिकाऱ्यांना केल्या. त्याचप्रमाणे त्यांनी खडकी स्टेशन, तसेच रेंजहिल्स येथील संरक्षण विभागाच्या जागेवर जाऊन मेट्रो मार्गाची पाहणी केली.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link