Next
...झाले मोकळे आकाश!
BOI
Tuesday, May 15, 2018 | 06:45 AM
15 0 0
Share this story‘ईशान्य भारतात दहा वर्षे काम करूनही येत असलेल्या विचित्र अनुभवांमुळे नकारात्मक विचार मनात येत होते आणि त्यामुळे मन विषण्ण होत होते; पण मग तेथे ५०-६० वर्षे काम करणाऱ्या संस्थांचा विचार मनात आला आणि सकारात्मक बाजूही दिसू लागल्या. त्यातूनच कामाला पुन्हा उभारी आली. तेथून केव्हाही बोलावणे आले, की जायची तयारी करून बसलो आहे. त्यामुळे ‘फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश’ अशी भावना मनात निर्माण झाली आहे,’ वाचा ईशान्यवाटेचा वारकरी’ या लेखमालेचा शेवटचा भाग...
..............
मनात येत असलेल्या नकारात्मक विचारांनी मन विषण्ण होत होते. यातील सकारात्मक बाजू शोधताना अनेक नवीन कोपरे दिसू लागले. मनात आले, की आपण सुमारे १० वर्षांच्या संपर्कातून ईशान्य भारताप्रति असा ग्रह करत आहोत; पण विवेकानंद केंद्र, विद्या भारती, रामकृष्ण मठ, वनवासी कल्याण आश्रम यांसारख्या ज्या संस्था गेल्या ५०-६० वर्षांपासून तेथे काम करत आहेत, त्या तर ईशान्य भारताचा एक भरवशाचा भाग बनले आहेत. त्यांच्या शाळेतून भारताचे कितीतरी सुपुत्र तयार झाले आहेत, होत आहेत. आपणही दुसऱ्या बाजूने विचार करून पाहू. या नव्या विचारानेच मनाला उभारी आली.

भाजपमुळे ईशान्य भारतात प्रगती आणि विकास होत असल्याच्या बातम्या मनाला सुखवत होत्या व पुन्हा त्या भागात जाण्यासाठी मन आतुर झाले होते. मनात दुर्दम्य इच्छाशक्ती असली, की मार्ग आपोआप प्रशस्त होत जातात.


हडपसर येथील सचिन धांदे यांच्याशी सौर ऊर्जेच्या एका ट्रेनिंग प्रोग्राममध्ये ओळख झाली. त्यांनी शारदाश्रम नावाची एक संस्था स्थापन केली आहे. ‘केरोसीन दिव्यांऐवजी सौरदिवे’ असा प्रकल्प संस्थेतर्फे राबवण्यात येत आहे. दुर्गम भागातील खेड्यांमध्ये जेथे केरोसीन दिवे वापरले जातात, त्यापासून होणारे दुष्परिणाम टाळण्यासाठी व विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगला प्रकाश मिळावा यासाठी सौरदिव्यांचा वापर वाढविण्यावर भर दिला जात आहे. ग्रामीण भागासाठी ईशान्य भारतातील खेड्यांना प्राधान्य देण्याचे ठरविले. त्याप्रमाणे विवेकानंद केंद्राच्या ईशान्येतील शाळेतील विद्यार्थी व त्यांचा परिवार असे लक्ष्य निर्धारित करण्यात आले. त्याप्रमाणे अरुणाचल प्रदेशातील विवेकानंद केंद्राद्वारे चालवल्या जाणाऱ्या दहा शाळांमध्ये ‘केरोसीन दिव्यांऐवजी सौरदिवे’ या उपक्रमाला सुरुवात करण्यास सांगितले. त्याप्रमाणे, श्री. धांदे, त्यांचे सहकारी आणि मी अशा सर्वांनी फेब्रुवारी २०१८मध्ये अरुणाचलला जाण्याचे ठरविले. एकूण १५ दिवसांचा कार्यक्रम होता. त्यात विद्यार्थ्यांना सौरऊर्जा व दिवे यांचे महत्त्व, तसेच सौर दिव्यांची असेंब्ली व निगा या गोष्टी शिकवायच्या होत्या.

पाच फेब्रुवारी २०१८ रोजी आम्ही पाच जण दिब्रुगडमार्गे तिनसुखियाला विवेकानंद केंद्रात आलो. शाळेचे विस्तीर्ण पटांगण, तेथील स्वच्छता, टापटीपपणा व फुलांची सुंदर बाग पाहून मन हरखून गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी अरुणाचलमध्ये जाण्यासाठी निघालो. रस्त्यात ‘दिग्बोईची रिफायनरी’ आणि चहाचे प्रशस्त मळे पाहून आसामला आल्याचे सार्थक झाले होते. अरुणाचलच्या शाळेमधील शिक्षक भारताच्या प्रत्येक प्रांतातून आले होते. विवेकानंद केंद्राची शिस्त पावलोपावली दिसत होती. विद्यार्थ्यांचे छोटे ग्रुप करून आम्ही त्यांना सौर दिव्यांची माहिती देत असू. अशा वेळी इतर मुले कुतूहलाने खिडकीच्या बाहेरून डोकावत असत. मग त्या मुलांना मी वेगळ्या हॉलमध्ये गोळा करून सौर ऊर्जेची माहिती देताना कागदाचे पक्षी (ओरिगामी) तयार करून घेत असे. त्याची मुलांना व अध्यापकांना खूप गंमत वाटे. त्यामुळे माझ्याभोवती कायम मुलांचा घोळका असे. याचाच फायदा घेऊन मी मुलांचे प्रबोधन करत असे. अगदी पुढे काय होणार, कसे होणार, त्याची तयारी कशी करायची ही सर्व माहिती देत असे.

एकूण १० शाळांपैकी तीन शाळा मुलींच्या होत्या. याअगोदरची मुले-मुली मला ‘मामाजी’ म्हणायची; पण येथे सर्व ‘दादाजी’ म्हणायला लागले. हे संबोधन म्हणजे माझ्यासाठी पदोन्नती होती. या विद्यार्थ्यांचा स्नेह मनाला हुरहुर लावून जायचा. मनावर आलेले मळभ दूर झाले होते. अरुणाचल प्रदेशात आल्यावर माझ्या मनात पुन्हा नवा अरुणोदय झाला होता. ईशान्य भारतातील कोणत्याही भागात शैक्षणिक कार्य करण्याची मानसिकता तयार झाली होती. तेथून केव्हाही बोलावणे आले, की जायची तयारी करून बसलो आहे. त्यामुळे ‘फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश’ अशी भावना मनात निर्माण झाली आहे.

- अरुण सरस्वते, दापोडी, पुणे
मोबाइल : ९४२३० ०२२१५

(‘ईशान्यवाटेचा वारकरी’ ही लेखमालिका आता समाप्त झाली असून, त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/cej71cया लिंकवर उपलब्ध आहेत.)
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Suman Kirloskar About 278 Days ago
तुम्ही किती मोठे काम केले व करत आहात याची तुम्हाला कदाचित कल्पना नसेल. तुमच्या कामाला शुभेच्छा
0
0
Ramchandra Deshpande About 279 Days ago
Best
0
0
arun bapar About 279 Days ago
Nice series. Great job. Weldone. Shabas !
0
0

Select Language
Share Link