Next
‘... तर शशी ‘व्हिलन’ दिसला असता!’
BOI
Sunday, December 10, 2017 | 09:45 AM
15 0 0
Share this story

क्रिकेटर फारुख इंजिनीअर हा शशी कपूरचा शाळेतला बेंचवरचा सख्खा मित्र. एकदा वर्गात गोंधळ करणाऱ्या शशीवर सरांनी डस्टर फेकलं. पुढे भारतीय टीमचा विकेटकीपर झालेल्या फारुखनं ते शशीच्या नाकापासून एक इंचावर ‘कॅच’ केलं नसतं, तर शशीच्या नाकाची ‘विकेट’ गेली असती... नि आपल्याला देखण्या हिरोऐवजी चेहऱ्यावर व्रण असलेला व्हिलनच बघायची वेळ आली असती... राजबिंडे अभिनेते शशी कपूर यांचा जीवनपट उलगडणारे ‘प्रिन्स चार्मिंग’ हे प्रसन्न पेठे लिखित पुस्तक ‘कॉन्टिनेन्टल’तर्फे लवकरच प्रकाशित होत आहे. त्यातीलच हे काही किस्से... शशीच्या लहानपणचे.... 
...................
दिवाळीचे दिवस होते. शशी आणि त्याच्या मित्रमंडळींचा गल्लीत फटाके फोडत हैदोस चालू होता. आणि अचानक शशीला कल्पना सुचली, आपल्याच घराच्या जिन्यात जाऊन फटाके (अॅटम बॉम्ब) फोडायचे, म्हणजे मस्तपैकी आवाज येईल. दरम्यान, ‘बरसात’ आणि ‘अंदाज’च्या पाठोपाठच्या शूटिंगमध्ये रात्रीपर्यंत व्यग्र असलेले राजजी घरी येऊन त्यांच्या वरच्या मजल्यावरच्या खोलीत विश्रांती घेत झोपले होते. शशी ते विसरलाच होता. त्यानं जिन्यात फटाके लावायला सुरुवात केल्यावर त्या बंदिस्त जागेत आवाज घुमल्यानं प्रचंड धाडधुडूम आवाज येत राहिले. कृष्णाभाभीनं बाहेर येऊन शशीला समजवण्याचा प्रयत्न केला; पण मुलांचा दंगा सुरूच. मग आईसाहेबांनी बाहेर येऊन शशीला दटावलं; पण त्या मस्तीत तो कुठचा ऐकायला? उलट त्यानं आईलाच काहीतरी दुरुत्तरं केली नि नेमकी ती सगळी लाललाल डोळे घेऊन संतापून खाली उतरत असलेल्या राजजींनी ऐकली आणि त्यांचा पारा चढलाच! त्यांनी थडाथड दोन-तीन कानफटात लगावल्या शशीच्या आणि ते तरातरा वर निघून गेले. झालं! इकडे शशीनं भोकाड पसरलं. अक्षरशः बेंबीच्या देठापासनं कोकलायला सुरुवात केली. पठ्ठ्या रडणं थांबवेचना! मग कृष्णाभाभी बाहेर आल्या ते राजजींचा निरोप घेऊन, की त्याने रडणं थांबवलं तर त्याला चायनीज खायला मिळेल आणि वर एक मूव्हीसुद्धा बघायला मिळेल म्हणून! मग काय? एका सेकंदात त्याचं रडणं थांबलं आणि राजजी आणि कृष्णाभाभीबरोबर चर्चगेटला ‘कॅम्लिंग’मध्ये जाऊन मस्तपैकी चायनीज हादडून वर पुन्हा ‘इरॉस’ला जेन रसेलचा ‘दी स्लेव्ह गर्ल’ बघायला मिळाला. राजजींचं विलक्षण प्रेम होतं शशीवर. 

तसाच एकदा शम्मीशी भांडण झाल्याचा प्रसंग! शम्मीनं त्याची काहीतरी खोड काढली नि त्याला चिडवलं... आणि मस्करी करता करता त्याच्या हातून शशीच्या शर्टवर आमटी सांडली. झालं! शशी बिथरलाच. त्यानं रागाच्या भरात आत बेडरूममध्ये धाव घेतली आणि शम्मीचं कपाट उघडून त्याचे हाताला मिळतील तेवढे शर्टस् भराभर बाहेर ओढले आणि कात्रीनं कापून त्यांचे तुकडे तुकडे केले. मग काय? शम्मी खवळला आणि त्यानं शशीच्या पाठीत रट्टे हाणले. मग झाली शशीची रडारड सुरू! मग पापाजींना मध्ये पडावं लागलं. नेमकी त्याच वेळी शशीची शाळेची ट्रिप गोव्याला जाणार होती. मग पापाजींनी डिक्लेअर केलं – शशीनं शम्मीची कान पकडून माफी मागितली नाही, तर त्याची गोवा ट्रिप कॅन्सल! मग नाईलाजानं शशीला कान पकडून माफी मागावी लागली शम्मीची आणि वर शिवाय स्वतःच्या पॉकेटमनीतले काही पैसे पापाजींनी शिक्षा म्हणून कापून घेतले ते वेगळेच! 

शशी आणि राजजींच्या वयात १४ वर्षांचं अंतर, तर शम्मी आणि त्याच्यात सात वर्षांचं. त्यामुळे दोघे मोठे भाऊ क्वचित चिडले, तरी शशीवर खूप जीव होता दोघांचा! शम्मी लाडानं शशीला ‘साशा’ म्हणत असे! शशीनं लहान वयातच पापाजींबरोबर नाटकं बघायला आणि पृथ्वी थिएटरच्या नाटकांत कामं करायला सुरुवात केली. त्याचं नाटकांचं वेड हळूहळू वाढत जाऊन मोठेपणी स्टेज अॅक्टर व्हायचं त्यानं मनाशी पक्कं ठरवून टाकलं होतं.

माटुंग्याला त्याची शाळा होती डॉन बॉस्को स्कूल. आणि शाळेत त्याच्याच बेंचवर बसणारा आणि त्याला साथ देणारा घट्ट मित्र होता फारुख इंजिनीअर. दोघांच्या खूप गप्पा चालायच्या आणि मस्तीही! फारुखला तेव्हाच क्रिकेटचं वेड होतं, तर शशीला सिनेमे पाहण्याचं. मग कधीकधी दोघं जण शाळेचे शेवटचे तास बुडवून बाहेर सटकायचे. फारुख क्रिकेटसाठी आणि शशी ‘ब्रॉडवे’ किंवा ‘पॅलेस’मध्ये सिनेमे पाहण्यासाठी. त्या वेळी तिथे पाच आणे, दहा आणे असे तिकिटांचे दर असत. वेगवेगळे इंग्लिश सिनेमे पाहून शशीची आवड समृद्ध होत गेली. त्या वेळी त्याला विशेषकरून वेस्टर्न सिनेमे जास्त आवडायचे. हेडी लमार, रॉबर्ट वॉकर त्याला फार आवडायचे. तसा तो हिंदी सिनेमेही बघत असे. स्टंटपट आणि जादू असलेले सिनेमे त्याला आवडायचे. शाळेत इतिहास आणि इंग्लिश हे विषय त्याचे आवडते होते. त्याची चित्रकलाही चांगली होती. एका स्पर्धेत त्याला चित्रकलेचं बक्षीसही मिळालं होतं. 

फारुख इंजिनीअरनं त्यांच्या लहानपणीचा एक किस्सा सांगितलाय. फ्रेंचचा तास सुरू होता. सर वर्गात शिरेपर्यंत मुलांचा गलका-गोंधळ सुरूच होता. सर चांगलेच संतापले आणि त्या गोंधळात सामील असलेल्या शशीवर त्यांनी लांबूनच डस्टर फेकून मारलं! ते सरसरत येऊन शशीच्या नाकावर आपटणार... तोच... मोठ्या चपळाईने फारूखनं पटकन हात लांब करत शशीच्या नाकापासून जेमतेम एक इंचावर त्या डस्टरचा चपळाईनं ‘कॅच’ घेतला! फारुख सांगतो, ‘त्या दिवशी प्रसंगावधान राखून मी चपळाईनं ते डस्टर हवेतच कॅच केलं नसतं, तर ते शशीच्या नाकावर धडकन आपटून, तो जखमी होऊन, आपल्याला एका देखण्या हिरोऐवजी चेहऱ्यावर व्रण असलेला व्हिलनच बघायची वेळ आली असती...’

(‘प्रिन्स चार्मिंग’ हे पुस्तक आणि ई-बुक ‘बुकगंगा डॉट कॉम’वरून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. या पुस्तकाच्या प्रकाशनाची बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)


 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
Milind Bhatkhande About
Aware waah khup chaan. Pustak Bandal abhinandan
0
0

Select Language
Share Link