Next
रत्नागिरीत ‘ग्रंथोत्सव २०१८’चे आयोजन
२९ डिसेंबरला पालकमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्घाटन
BOI
Wednesday, December 26, 2018 | 03:44 PM
15 0 0
Share this story

रत्नागिरीतील शासकीय विभागीय ग्रंथालय, लोकमान्य टिळक स्मारक मंदिर

रत्नागिरी : ग्रंथालय संचालनालय आणि उच्च व तंत्रशिक्षण विभागाच्या आधिपत्याखालील रत्नागिरी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयातर्फे २९ व ३० डिसेंबर या कालावधीत ‘रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सव २०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. शहरातील शासकीय विभागीय ग्रंथालय, लोकमान्य टिळक स्मारक मंदिर येथे हा ग्रंथोत्सव होईल.

ग्रंथोत्सवाचे उद्घाटन गृहनिर्माण, उच्च आणि तंत्रशिक्षण राज्यमंत्री तथा पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या हस्ते २९ डिसेंबरला सकाळी १० वाजता होईल. या वेळी जिल्हाधिकारी तथा ग्रंथोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष सुनील चव्हाण, जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी, ज्येष्ठ साहित्यिक अ‍ॅड. विलास कुवळेकर यांसह जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींची प्रमुख उपस्थिती असणार आहे. उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष ज्येष्ठ साहित्यिक डॉ. विलास कुवळेकर आहेत. तत्पूर्वी सकाळी आठ वाजता ग्रंथदिंडी निघणार आहे. ही ग्रंथदिंडी मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथून शासकीय रुग्णालय, जयस्तंभ मार्गे शासकीय विभागीय ग्रंथालय, लोकमान्य टिळक स्मारक मंदिर येथे येईल. यामध्ये अनेक मान्यवर, शाळेतील विद्यार्थी, शिक्षक, साहित्यिक व ग्रंथप्रेमी सहभागी होणार आहेत. या सोहळ्याचा शुभारंभ साहित्यिका नमिता कीर यांच्या हस्ते ग्रंथपूजनाने होईल.

२९ डिसेंबरला दुपारी २.३० ते सायंकाळी चार या वेळेत शासकीय विभागीय ग्रंथालयाच्या सभागृहात ‘वाचता वाचता आम्ही घडलो’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमामध्ये गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाच्या प्रा. डॉ. निधी पटवर्धन, ‘कोमसाप’चे जिल्हाध्यक्ष प्रशांत परांजपे, रत्नागिरी आकाशवाणीचे कार्यक्रम अधिशासी सुहास विद्वांस हे सहभागी होणार आहेत.

३० डिसेंबरला सकाळी ११ ते दुपारी एक या वेळेत शासकीय विभागीय ग्रंथालयात ‘स्पर्धा परीक्षेला सामोरे जाताना’ या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे. यामध्ये जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे हे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतील. यानंतर दुपारी तीन ते सायंकाळी पाच या वेळेत काव्यवाचन व समारोप हा कार्यक्रम ज्येष्ठ कवी बाळासाहेब लबडे यांच्या अध्यक्षेतेखाली होईल. यात कैलास गांधी, राजेंद्र आरेकर, मोहन पाटील, सागर पाटील, सुनेत्रा जोशी, अतुल पित्रे, दामोदर घाणेकर, प्रवीण सावंतदेसाई, चेतन राणे, मोहन कुंभार, अजित कांबळे, मनोज मुळ्ये व गौरी सावंत आदी कवींचा सहभाग असेल.

२९ व ३० डिसेंबर या दोन दिवसांच्या कालावधीत सकाळी १० ते रात्री आठ या वेळेत ग्रंथजत्रेमध्ये ग्रंथ प्रदर्शन व विक्रीचे स्टॉल’ ठेवण्यात येणार असून, यामध्ये राज्यातील नामांकित प्रकाशन संस्था, तसेच शासकीय मुद्रणालय, पाठ्यपुस्तक प्रकाशनांची पुस्तके विक्रीसाठी उपलब्ध असतील. या ग्रंथोत्सव सोहळ्यात जिल्ह्यातील साहित्यप्रेमी, ग्रंथप्रेमी, वाचक, विद्यार्थी, शिक्षण, महिला, सार्वजनिक ग्रंथालयांचे पदाधिकारी व कर्मचारी आदींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा ग्रंथोत्सव समन्वय समितीतर्फे करण्यात आले आहे.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link