Next
... आणि त्यांचे चेहरे ‘सौभाग्या’ने उजळले!
संदेश सप्रे
Thursday, December 27, 2018 | 01:19 PM
15 0 0
Share this article:

सौभाग्य योजनेचा लाभ मिळालेल्या फोंडे कुटुंबीयांसमवेत मंगेश दळवी.देवरुख : देशाच्या स्वातंत्र्याला ७० वर्षे होऊन गेली, तरी अजूनही काही दुर्गम भागांमध्ये अद्याप वीज पोहोचलेली नाही. रत्नागिरीच्या संगमेश्वर तालुक्यातील साखरप्याजवळची दख्खन पूर्व धनगरवाडी हा त्यापैकीच एक भाग. नैसर्गिक अडचणींमुळे येथे अजूनही वीजपुरवठा होऊ शकला नव्हता; मात्र अलीकडेच ‘सौभाग्य’ योजनेमुळे आणि माजी सरपंच मंगेश दळवी यांच्या प्रयत्नांतून या वाडीतील तीन घरे सौर ऊर्जेवर प्रकाशमान झाली आहेत. अनेक पिढ्यांचे स्वप्न सत्यात उतरल्यामुळे त्यांच्या डोळ्यांत आनंदाश्रू तरळले!

दख्खन पूर्व धनगरवाडी हे गाव रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावरील आंबा घाटाजवळ निबिड अरण्यात वसले आहे. त्यामुळे बिबट्या, गवा रेडे, रानडुकरे यांचा उपद्रव कायमच. अशा स्थितीत रात्रीच्या वेळी वीज असणे अत्यंत आवश्यक; मात्र दुर्गमतेमुळे २१व्या शतकातही येथील नागरिक अंधारात होते. या धनगरवाडीची लोकसंख्या केवळ ५७ आहे. या गावात नऊ कुटुंबे जीव मुठीत घेऊन दिवस काढताहेत. विजेसह पायाभूत सोयीसुविधा सहजासहजी उपलब्ध नसल्याने अनेकांनी स्थलांतर केल्याने येथील लोकसंख्या कमी झाली आहे. सध्या येथे वास्तव्याला असलेली कुटुंबे शेती करतात. तसेच कुक्कुटपालन आणि दुग्धव्यवसायावर उदरनिर्वाह करतात. ही वाडी गावातील मुख्य वस्तीपासून काही किलोमीटर दूर आहे. त्यामुळे नवीन जोडणीसाठी विजेचे खांब नेण्याकरिता काही लाख रुपयांचा खर्च अपेक्षित होता. त्यामुळे या गावात वीज देण्यास ‘महावितरण’ने असमर्थता दर्शवली.  

या भागात विजेची सुविधा मिळावी, यासाठी तत्कालीन सरपंच मंगेश दळवी यांनी पाच वर्षांपूर्वी पाठपुरावा सुरू केला. स्थानिक पातळीवर काही होत नाही हे पाहून त्यांनी हा विषय थेट केंद्रीय ऊर्जामंत्र्यांपर्यंत नेला. मंत्रालयातून आदेश आल्यावर ‘महावितरण’ने सर्वेक्षण केले. मात्र नैसर्गिक अडचणींपुढे कुणाचे काहीच चालेना. विजेचे खांब उभारण्यासाठीचे आर्थिक गणित परवडण्यासारखे नव्हते. 

यातून मार्ग काढण्यासाठी दळवींनी पुन्हा प्रयत्न सुरू केले. अखेर महाऊर्जा – ‘मेडा’च्या वतीने (महाराष्ट्र ऊर्जा विकास यंत्रणा) ‘सौभाग्य’ योजनेअंतर्गत या कुटुंबांना सौर ऊर्जेच्या मदतीने वीज देण्याचे निश्चिहत करण्यात आले. सध्या गावात वास्तव्याला असलेल्या नऊ कुटुंबांपैकी रवींद्र धोंडू फोंडे , सोमा बिराजी फोंडे, पांडुरंग विठू फोंडे या तीन कुटुंबांना प्रत्येकी एक सौर ऊर्जा युनिट देण्यात आले. त्यात पाच ट्यूब, एक पंखा, एक चार्जर, एक अतिरिक्त पॉइंट या गोष्टींचा समावेश आहे. याची जोडणी करून नुकतीच धनगरवाडीतील ही तीन घरे कायमस्वरूपी प्रकाशमान झाली आहेत. रात्रीच्या काळोखात चमकणारे दिवे पाहून ग्रामस्थांच्या डोळ्यात पाणी आले. या कामी ‘महावितरण’च्या साखरपा कार्यालयाचे मोठे सहकार्य लाभले.

‘अजूनही वाडीतील सहा कुटुंबे यापासून दूर आहेत. या सर्वांनाच या योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी मी प्रयत्नशील आहेत. जेव्हा ही संपूर्ण वाडी प्रकाशमान होईल, तेव्हा मला शांतता लाभेल. या कामात सहकार्य करणाऱ्या ‘महावितरण’चे खूप आभार,’ अशी प्रतिक्रिया माजी सरपंच मंगेश दळवी यांनी व्यक्त केली. 

संपर्क : मंगेश दळवी – ९४२३२ ९३०६०
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
अमान कापड़ी About 233 Days ago
सरपंच मंगेश दलवी साहेब यांचा खूप हार्दिक अभिनंदन व हार्दिक शुभेच्छा
0
0

Select Language
Share Link
 
Search