Next
‘मुंबई येथे जेम अँड ज्वेलरी विद्यापीठ स्थापन करणार’
महापे येथे जागतिक दर्जाच्या इंडिया ज्वेलरी पार्कचे भूमिपूजन
प्रेस रिलीज
Thursday, March 07, 2019 | 04:24 PM
15 0 0
Share this storyमुंबई : ‘वर्ष २०२५पर्यंत महाराष्ट्राची ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था करण्याचे उद्दिष्ट्य आम्ही ठेवले असू,न जेम एंड ज्वेलरी क्षेत्राचे यात फार मोठे योगदान असणार आहे. म्हणूनच मुंबई येथे जेम अँड ज्वेलरी विद्यापीठ स्थापन करणार आहे,’ अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

नवी मुंबईच्या महापे येथे इंडिया ज्वेलरी पार्कच्या भूमिपूजनप्रसंगी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनीदेखील या पार्कसाठी तातडीने जागा उपलब्ध करून देण्याची कार्यवाही केल्याबद्धल मुख्यमंत्री, तसेच उद्योगमंत्री सुभाष देसाई त्यांचे आभार मानले.

फडणवीस म्हणाले, ‘गेल्या वर्षी जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलच्या परिषदेच्या समारोहात मी आलो असताना या पार्क संदर्भात चर्चा झाली होती आणि अतिशय कमी कालावधीत सर्व प्रक्रिया पूर्ण करून आता या प्रकल्पाचे भूमिपूजन होत आहे ही समाधानाची बाब आहे. जगात भारत या क्षेत्रात निर्यातीत आघाडीवर असल्याने हा पार्कदेखील एक वैशिष्ट्यपूर्ण पार्क म्हणून संपूर्ण जगात नावारूपाला यावे.’

‘सुमारे एक लाख लोक यात काम करणार आहेत, त्यात अनेक कारागीरदेखील असतील. त्या सर्वांना पार्कच्या जवळपासच्या भागात प्रधानमंत्री आवास योजनेतील घरे उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल. जेम अँड ज्वेलरी क्षेत्रातील व्यापार १०० बिलियन डॉलर्सच्यावर नेण्याची आपली क्षमता आहे. महाराष्ट्राला ट्रिलियन डॉलर्स अर्थव्यवस्था बनविण्यात याचे मोठे योगदान होईल. या क्षेत्रात कौशल्य आवश्यक आहे, अनेक व्यक्ती, तरुण यात काम करतात. यासाठी जेम अँड ज्वेलरी विद्यापीठ मुंबई तसेच परिसरात स्थापन करण्यात येईल. खासगी विद्यापीठ कायद्यासंदर्भातील निकषांप्रमाणे तिची केंद्रे सुरू करता येतील,’ असे त्यांनी सांगितले.

‘या ज्वेलरी पार्कमध्ये एक खिडकी व्यवस्था करण्यात येईल त्यामुळे सर्व प्रकारच्या परवानग्या या याठिकाणीच मिळतील. त्यासाठी कुठेही ‘एमआयडीसी’ किंवा इतर कुठेही प्राधिकरणात जाण्याची गरज नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शन आणि नेतृत्वाखाली देशात स्पीड आणि स्केल अशा दोन्ही बाबींचा विचार करून विकास सुरू आहे. त्यामुळे एक नवीन भारत उदयास येतो आहे,’ असे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.

केंद्रीय वाणिज्य मंत्री प्रभू म्हणाले, ‘एकेकाळी आपल्या देशात ‘सोने की चिडीया बसेरा करती थी,’ असे म्हटले जायचे. आपल्याला आज ते प्रत्यक्षात साकार करावयाचे आहे. रशिया व इतर देशांतून कच्च्या स्वरूपातील हिरे-रत्ने आणून त्यावर मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया करून ती निर्यात करण्याबाबत आमचे नियोजन आहे. एकदाही साधे मंत्रीपद न भूषविलेले देवेंद्र फडणवीस आज थेट मुख्यमंत्री म्हणून जो कारभार करीत आहे त्याचे उदाहरण मी अनेक ठिकाणी देत असतो.’

उद्योगमंत्री देसाई यांनी हा पार्क उभारण्यात उद्योग विभाग सर्वतोपरी सहकार्य करेल असे सांगून उद्योग विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले.

जेम अँड ज्वेलरी एक्स्पोर्ट प्रमोशन कौन्सिलचे अध्यक्ष प्रमोद अग्रवाल यांनी मनोगतात या क्षेत्राला अधिक लाभ देण्याबाबत काही सूचना केल्या. पार्कमध्ये सामायिक सुविधा केंद्राला २५० कोटी देण्याची, तसेच सीमा शुल्क कमी करण्याची मागणी केली.  

महापे येथे एका छताखाली चालविल्या जाणाऱ्या इंडिया ज्वेलरी पार्कमध्ये १४ हजार ४६७ कोटी रुपयांची गुंतवणूक येणार आहे. यामुळे ४१ हजार ४६७ कोटींची उलाढाल होईल. चीनमधील शेनझेन मॉडेलप्रमाणे हे पार्क विकसित केले जाणार असून, यामुळे विखुरलेला हा व्यापार एका ठिकाणी येईल व निर्यातीला अधिक चांगले प्रोत्साहन मिळेल. याठिकाणी साडेचार हजार उद्योग–व्यवसाय सुरू होतील; तसेच एक लाखापेक्षा जास्त लोकांना रोजगार मिळेल. सध्या रत्न आणि दागिने व्यापाराचा देशातील एकूण निर्यातीत १५ टक्के वाटा असून, हे क्षेत्र पूर्णत: कारागीर आणि कामगारांवर आधारित आहे.

या भूमिपूजन कार्यक्रमाला आमदार राज पुरोहित, ‘एमआयडीसी’चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनबलगन, वाणिज्य मंत्रालयाच्या आर्थिक सल्लागार रूपा दत्ता, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आदींची उपस्थिती होती.
 
15 0 0
Share this story

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email
 
Notify me once my comment is published
Comment *
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.

Select Language
Share Link