Next
गुणी बाळ असा...
BOI
Tuesday, May 23, 2017 | 06:45 AM
15 0 0
Share this article:

राम गणेश गडकरी (चित्र : http://ramganeshgadkari.com/)‘गुणी बाळ असा, जागसी का रे वाया, नीज रे नीज शिवराया....’ ही गोविंदाग्रज यांनी साक्षात छत्रपती शिवरायांसाठी लिहिलेली अंगाई ऐकली की आपल्याही अंगावर रोमांच उभे राहतात. गोविंदाग्रज अर्थात राम गणेश गडकरी यांची उद्या, २४ मे रोजी जयंती आहे. त्या निमित्ताने ‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’च्या आजच्या भागात, त्यांनी लिहिलेल्या ‘पाच देवींचा पाळणा’ या अपुऱ्या राहिलेल्या, पण अनमोल अशा कवितेबद्दल...
.......
रात्रीची नीरव शांतता, अवघं विश्व निद्रादेवीच्या कुशीत शांत झोपलेलं आणि बाळाला झोपवण्यासाठी अंगाई गाणारी आई, हे दृश्य घराघरात असतं. एक अंगाई अशी, की प्रत्येक शब्द, प्रत्येक सूर वात्सल्यानं ओतप्रोत असा तर आहेच; पण एका आईची स्वराज्यस्थापनेच्या स्वप्नपूर्तीची अपेक्षा व्यक्त करणारी, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं रोमांचकारी निवेदन, हृदयनाथ मंगेशकर यांचं संगीत आणि लतादीदींच्या स्वरांनी मोहरलेली गोविंदाग्रजांची 

गुणी बाळ असा 
जागसी का रे वाया

ही कविता ‘शिवकल्याण राजा’ या ध्वनिमुद्रिकेतून अवघ्या महाराष्ट्रातील मातृहृदयापर्यंत पोहोचली. ही अंगाई सामान्य बाळासाठी नव्हती, तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवरायांसाठी लिहिलेली होती...

अपरात्रीचा प्रहर लोटला बाई,
तरी डोळा लागत नाही
हा चालतसे चाळा एकच असला
तिळ उसंत नाही जिवाला...

ही अंगाई आई जिजाऊंच्या तोंडी आहे; पण महाराष्ट्रातल्या पाच प्रमुख देवता जणू शिवरायांसाठी पाळणा म्हणताहेत अशी कवीची कल्पना! म्हणून या कवितेचं शीर्षक ‘पाच देवींचा पाळणा’ असं आहे. गोविंदाग्रजांच्या ‘वाग्वैजयंती’ या काव्यसंग्रहातील ही कविता दोन कडव्यांचीच, कारण ती कविता अपूर्णच राहिली. 
राम गणेश गडकरी यांच्या कवितांवर आधारित रूपक मला आकाशवाणीसाठी सादर करायचं होतं. त्याचं शीर्षक होतं ‘क्षण एक पुरे कवितेचा.’ त्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांनी या कवितेसंबंधी मनोगत व्यक्त केलं. या कवितेवर बाबासाहेब इतक्या जिव्हाळ्यानं बोलले, की ते ऐकताना शिवकाळातलं ते दृश्य डोळ्यासमोर उभं राहिलं. यासंबंधी बोलताना बाबासाहेब गहिवरले. म्हणाले, ‘गोविंदाग्रजांनी ही कविता पूर्ण लिहिली असती तर शिवकाळातलं वर्णन करणारी एक अपूर्व आणि अलौकिक अशी अंगाई अनुभवायला मिळाली असती. तरीसुद्धा गोविंदाग्रजांनी लिहिलेली दोन कडव्यांची अपूर्ण कविता महाराष्ट्रशारदेच्या गळ्यातील एक अनमोल रत्न आहे.’ 

खरंच मला आजही आठवतोय शिवशाहीर बाबासाहेबांचा तो चेहरा, गोविंदाग्रजांच्या काव्यप्रतिभेनं तेजाळलेला आणि शिवकालीन इतिहासाच्या अभिमानानं फुललेला...क्षणभर वाटलं ‘पुणे आकाशवाणी’तला आमचा तो माइकही रोमांचित झालाय...खरंच विषयच तसा होता ‘गोविंदाग्रजांची कविता.... ‘पाच देवींचा पाळणा,’ महाराष्ट्रातल्या पाच देवी गाताहेत जिजाऊंच्या तोंडून...

निजवायाचा हरला सर्व उपाय
जागाच तरी शिवराय
चालेल जागता चटका
हा असाच घटका घटका
कुरवाळा किंवा हटका
का कष्टविसी तुझी सावळी काया

राम गणेश गडकरी शिवरायांचे निस्सीम भक्त! कवी केशवसुत यांचा प्रभाव गडकरी यांच्या कवितेवर दिसतो. केशवसुतांविषयी ते असं लिहितात

‘शिवरायांच्या मागे आम्ही लाल महालि फिरणे
तसेच तुमच्या मागे आम्ही नवीन कविता करणे’

प्रतिभासंपन्न कवी म्हणून अर्वाचीन मराठी कविवर्गात ज्यांनी अत्युच्च स्थान मिळवलं, ते गोविंदाग्रज श्रेष्ठ नाटककार आणि विनोदी लेखकही होते. २४ मे १८८५ रोजी गुजरातमधील नवसारी तालुक्यात गणदेवी या गावी त्यांचा जन्म झाला. बालपणीच पितृछत्र हरवल्यामुळं दारिद्र्य शिक्षणाच्या आड येत राहिलं. मॅट्रिक झाल्यानंतर त्यांनी शिक्षकाची नोकरी केली. ‘किर्लोस्कर नाटक मंडळी’त मुलांनाही शिकवलं. दरम्यान, जी नाटकं लिहिली त्यामुळे त्यांना अफाट कीर्ती मिळाली. सोबत ‘गोविंदाग्रज’ या नावानं काव्यलेखन आणि ‘बाळकराम’ या नावाने विनोदी लेखनही ते करत होते. लालित्य, कल्पनासंपन्नता आणि भावनोत्कटता यांनी सजलेली ‘कृष्णाकाठी कुंडल’ किंवा ‘महाराष्ट्र देशा’ ही कविता अवघ्या मराठी मनावर कोरली गेली आहे. प्रेमविषयक कवितांमुळे त्यांना ‘प्रेमाचा शाहीर’ म्हणून संबोधलं गेलं. गोफ, गोड निराशा, गुलाबी कोडे, प्रेमपाठ या सर्व कवितांपैकी ‘प्रेम आणि मरण’ ही कविता म्हणजे उत्कट, अलौकिक प्रेमाची सर्वोच्च अनुभूती...

निष्प्रेम चिरंजीवन ते
जगी दगडालाही मिळते । धिक तया ।।
क्षण एक पुरे प्रेमाचा
वर्षाव पडो मरणाचा । मग पुढे ।।

एक झाड आणि वीज या दोन प्रतीकांच्या रूपातून प्रेमाची उत्कट भावना व्यक्त करणारी गोविंदाग्रजांची ही प्रदीर्घ अशी कविता, ज्या कवितेत कथात्मकता आणि नाट्यमयताही आहे. गोविंदाग्रजांची कविता म्हणजे त्यांची अफाट कल्पनाशक्ती, अलौकिक काव्यप्रतिभा, यासोबतच त्यांचं भाषाप्रभुत्व...कविता असो की नाटक, ते लिहायला बसले की शब्द त्यांच्यापुढे हात जोडून उभे राहत होते की काय असा प्रश्न पडतो. लाडक्या छत्रपती शिवरायांसाठी ‘पाच देवींचा पाळणा’ त्यांनी लिहिला, तेव्हा त्यांनी कल्पनाशक्तीनं शिवकाल उभा केला. अंगाई गाऊन जिजाऊ शिवरायाला ‘नीज रे नीज शिवराया’ असं म्हणता म्हणता स्वराज्य स्थापनेच्या स्वप्नाचं स्मरण करून देत आहेत असं वाटतं. चहूबाजूंनी शत्रूचं आक्रमण रोखायचंय, त्यापासून राज्याचं रक्षण करायचंय, गड-किल्ले राखायचेत, रयतेचं दुष्ट शक्तींपासून संरक्षण करायचंय....प्रत्येक घटका स्वराज्यासाठी महत्त्वाची आहे, हेच जणू जिजाऊसाहेब शिवरायांना सांगताहेत. त्याबरोबरच आपल्या शिवबाला आई भवानीमातेचा आणि देवदेवतांचा आशीर्वाद मिळावा, असंही त्या मातेला वाटतंय.

ही शांत निजे बारा मावळ थेट
शिवनेरी जुन्नरपेठ
त्या निजल्या ना, तशाच घाटाखाली
कोकणच्या चवदा ताली
ये भिववाया बागुल तो बघ बाळा
किती बाई काळा काळा
इकडे हे सिद्धि-जमान
तो तिकडे अफझुलखान
पलीकडे मुलुख मैदान
हे आले रे तुजला बाळ धराया
नीज रे नीज शिवराया...

‘मराठी भूमीचा रक्षणकर्ता असलेल्या शिवरायाला अंगाई गाऊन जणू जागतं राहण्याचीच सूचना जिजाऊसाहेब करताहेत,’ असं शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे या कवितेबद्दल म्हणतात. या कवितेबरोबर गोविंदाग्रजांची ‘राजहंस माझा निजला’ या कवितेचीही आठवण त्यांनी काढली. एक विधवा माता आणि तिच्या मांडीवर तिच्या बाळाचा मृतदेह, अशा प्रसंगी झालेली आईच्या मनाची अवस्था गोविंदाग्रजांनी अशी काही व्यक्त केलीय, की करुणरसानं भिजलेली कविता आपल्याही डोळ्यात आसवांची दाटी करते. 

ते हृदय कसे आईचे । मी उगाच सांगत नाही ।
जे आनंदेही रडते । दु:खात कसे ते होई ।।

हे मातृहृदयीचे बोल गोविंदाग्रजांच्या काव्यप्रतिभेची अनमोल शक्ती आहे, असं वाटतं. गोविंदाग्रजांची उद्या, २४ मे रोजी जयंती आहे. त्यांचं स्मरण करताना त्यांनी शिवरायांसाठी लिहीलेली ‘पाच देवींचा पाळणा’ ही कविता आवर्जून ऐकू या. अंगाई या काव्य प्रकारातील ही चिरंतन अनुभूतीची कविता असं म्हणता येईल. ही कविता त्यांनी पूर्ण लिहिली असती तर...गोविंदाग्रजांनी काय लिहिलं असतं पुढे....? कल्पनाशक्तीला आपणही थोडा ताण देऊ या... 

- डॉ. प्रतिमा जगताप
संपर्क : ९४२२२ ९२३८४

(लेखिका पुणे आकाशवाणी केंद्रात वरिष्ठ उद्घोषिका म्हणून कार्यरत आहेत.)
 
(‘कविता...स्वरांनी मोहरलेल्या’ हे सदर दर मंगळवारी प्रसिद्ध होते.)
 
15 0 0
Share this article:

Post Your Comment
मराठी English
Your Name *
Email (Optional)
 
Notify me once my comment is published
Comment * Note: Comment will be published after review.
Content limited to 1000 characters,1000 characters remaining.
COMMENTS
प्राजक्ता कुलकर्णी About
अतिशय सुरेख अंगाई आणि तितकंच सुरेख ,सार्थ भावार्थ !! मस्त !!
1
0
कैलस शिन्दे About
एकुनचअंगाई गीत हा दुर्लक्षित प्रान्त गोविंदाग्रज यांनी या निम्मितान लिहेलेला हा पालना विर रसचि अनुभूति देवुन कनखर नेत्त्रुत्व घडवन्या साठी. ममता मात्रुत्व मायभूमिच रक्षण कर्नरया विराच दरशन घडवतो.
0
0

Select Language
Share Link
 
Search